मागील लेखातून आपण महाराष्ट्रातील शेती, पर्यटन व सहकार क्षेत्राबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण महाराष्ट्रातील लोकसंख्येबाबत जाणून घेऊ. कोणत्याही प्रदेशात तेथे असणारी मानवी लोकसंख्या हे त्या प्रदेशाचे महत्त्वपूर्ण संसाधन असते. मानव हा आर्थिक, सामाजिक, भौगोलिक, पर्यावरणीय घटकांवर परिणाम करीत असतो. त्यामुळे एखाद्या विशिष्ट प्रदेशातील लोकसंख्येच्या रचना, आकार व विकास या तीन घटकांचा आढावा घेणे उपयुक्त ठरते. दर १० वर्षांनी भारतात जनगणना केली जाते. त्याबरोबरच महाराष्ट्राचीही जनगणना केली जाते. या लेखातून आपण २०११ मधे झालेल्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१) महाराष्ट्राची लोकसंख्या टक्केवारी

सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११,२३,७४,३३३ (सुमारे ११.२४ कोटी) आहे. भारतातील लोकसंख्येत प्रथम क्रमांक उत्तर प्रदेश (१९.९६ कोटी), दुसरा क्रमांक महाराष्ट्र व तिसरा क्रमांक बिहार (१०.४१ कोटी) या राज्याचा लागतो. महाराष्ट्रात देशातील ९.२९% लोकसंख्या वास्तव्य करते.

लोकसंख्येनुसार महाराष्ट्रातील पहिले व शेवटचे पाच जिल्हे :

सन २०११ च्या जनगणनेनुसार पुणे जिल्ह्याची लोकसंख्या सर्वांत जास्त म्हणजे ९४,२९,४०८ आहे. राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी ८.३९ टक्के लोक पुणे जिल्ह्यात राहत होते. (ठाणे जिल्ह्याच्या विभाजनापूर्वी महाराष्ट्रात लोकसंख्येमध्ये ठाणे जिल्ह्याचा पहिला क्रमांक होता). पुणे जिल्ह्यानंतर दुसरा क्रमांक मुंबई उपनगर जिल्ह्याचा आणि त्याची लोकसंख्या सुमारे ९३.५७ लाख म्हणजे ८.३ टक्केवारी होती. त्यानंतर तिसरा क्रमांक ठाणे, नाशिक व नागपूर जिल्ह्याचा होता. महाराष्ट्रातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये राज्यातील सुमारे ३७ टक्के लोकसंख्या वास्तव्य करते. २००१ साली महाराष्ट्रातील लोकसंख्येत पहिला क्रमांक मुंबई उपनगर (८.९%), दुसरा क्रमांक ठाणे (८.४%) व तिसरा क्रमांक पुणे (७.५%) अशी जिल्ह्यांची क्रमवारी होती.

सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्याची सर्वांत कमी लोकसंख्या म्हणजे फक्त ८.५० लाख होती. त्याची राज्यामधील टक्केवारी जेमतेम ०.८% होती. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्याचा फक्त एक टक्का आणि लोकसंख्येच्या दृष्टीने अन्य छोटे जिल्हे असलेल्या हिंगोली, वाशीम व भंडारा यांचा प्रत्येकी वाटा सुमारे १.१ टक्का होता.

हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्रात सहकार क्षेत्राची स्थापना कधी झाली? त्याची वैशिष्ट्ये व तत्त्वे कोणती?

२) महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता

सन २०११ च्या अंतिम जिल्हा स्वतंत्र जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता दर चौ.कि.मी.ला ३६५ आणि राष्ट्रीय स्तरावर ती घनता ३८२ होती. राष्ट्रीय स्तरापेक्षा महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता १७ बिंदूंनी कमी होती. सन २००१ मध्ये महाराष्ट्राची घनता ३१५ होती. याचा अर्थ दशवार्षिक कालखंडात लोकसंख्येच्या घनतेमध्ये ५० बिंदूंनी वाढ झालेली आहे.

महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिले पाच जिल्हे

सन २०११ च्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येची सर्वांत जास्त घनता मुंबई उपनगर जिल्ह्याची (२०,९८०) होती. (२००१ साली ही घनता १९,३७३ होती). लोकसंख्येच्या घनतेमध्ये दुसरा क्रमांक मुंबई शहराचा होता. मुंबई शहराच्या लोकसंख्येच्या घनतेत २००१ च्या तुलनेत १,६०९ ने घट झाली. मुंबई शहरातील काही लोकांनी मुंबई उपनगर व ठाणे या जिल्ह्यात स्थलांतर केले. त्यामुळे हा परिणाम झाल्याचे दिसून येते. लोकसंख्येच्या घनतेमध्ये तिसरा क्रमांक ठाणे जिल्ह्याचा लागतो. लोकसंख्येच्या घनतेमध्ये चौथा क्रमांक पुणे जिल्ह्याचा, तर लोकसंख्येच्या घनतेमध्ये पाचवा क्रमांक कोल्हापूर जिल्ह्याचा लागला.

महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या घनतेनुसार शेवटचे पाच जिल्हे :

  • गडचिरोली (७४)
  • सिंधुदुर्ग (१६३)
  • चंद्रपूर (१९३)
  • रत्नागिरी (१९७)
  • यवतमाळ (२०४)

३) लोकसंख्या दशवार्षिक वाढीसंदर्भात काही निष्कर्ष :

सन २००१ ते २०११ या दशवार्षिक काळामधील लोकसंख्यावाढीचे स्वरूप

सन २००१ ते २०११ या दशवार्षिक काळात महाराष्ट्रात लोकसंख्यावाढीचा दर १५.९९ टक्के होता; तर राष्ट्रीय स्तरावर वाढीचा दर १७.६४% होता. भारतात लोकसंख्यावाढीच्या दरात महाराष्ट्राचा २१ वा क्रमांक होता. लोकसंख्या दशवार्षिक वाढीत भारतीय स्तरापेक्षा महाराष्ट्रात लोकसंख्यावाढीचा दर २.६५% कमी आढळला. सन १९९१ ते २००१ या दशवार्षिक कालखंडात लोकसंख्यावाढीचा दर २२.७३ टक्के होता. याचा अर्थ लोकसंख्यावाढीचा दर ६.७४% नी घटला.

वाढीच्या दरामधील फेरबदल

सन १९०१ ते १९४१ या कालावधीत महाराष्ट्राच्या लोकसंख्यावाढीच्या दरामध्ये वारंवार फेरबदल झाले होते. सन १९०१ ते १९११ या दशकात लोकसंख्यावाढीचा दर १०.७४ टक्के होता; परंतु पुढील दशकामध्ये तो २.९१ टक्क्यांपर्यंत खाली आला होता. १९३१ ते १९४१ या दशकात पुन्हा ११.९९ टक्क्यांपर्यंत खाली आला. त्यानंतर सातत्याने पुढील जनगणना वर्षामध्ये लोकसंख्यावाढीचा दर वाढत गेला. सन १९६१ ते १९७१ दरम्यान वाढीचा सर्वोच्च दर २७.४५ टक्के होता. त्यानंतर वाढीचा दर कमी कमी होत गेला. सन १९८१ ते १९९१ या दशकात १.२ टक्के अल्पशी वाढ झाली.

महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या दशवार्षिक वाढीनुसार पहिले पाच जिल्हे

  • ठाणे (३६.०१%)
  • पुणे (३०.३७%)
  • औरंगाबाद (२७%)
  • नंदुरबार (२५.५%)
  • नाशिक (२३%).

महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या दशवार्षिक वाढीनुसार शेवटचे पाच जिल्हे

  • मुंबई शहर (-७.५६%)
  • रत्नागिरी (-४.८%)
  • सिंधुदुर्ग (-२.२%)
  • वर्धा (+५.१७%)
  • भंडारा (+५.६%)

४) महाराष्ट्राची ग्रामीण व नागरी लोकसंख्या आणि वैशिष्ट्ये

सन २०११ च्या अंतिम जनगणनेनुसार, महाराष्ट्रात ग्रामीण लोकसंख्या सुमारे ६.१६ कोटी आढळली; जी २००१ सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात ग्रामीण लोकसंख्या सुमारे ५.७८ कोटी होती. याचा अर्थ महाराष्ट्रात या दशकात ग्रामीण लोकसंख्या सुमारे तीन टक्क्यांनी कमी झाली. म्हणजेच तीन टक्के लोकसंख्येने नागरी प्रदेशाकडे स्थलांतर केले. एकूण लोकसंख्येशी ग्रामीण लोकसंख्येची टक्केवारी ५४.७७% आहे. राष्ट्रीय स्तरावर हेच प्रमाण ६८.५४% आहे. राष्ट्रीय स्तराच्या मानाने महाराष्ट्रात ग्रामीण लोकसंख्या १३.७७% टक्क्यांनी कमी आढळली. ग्रामीण लोकसंख्येची सन २००१ ते २०११ या दशकात ग्रामीण लोकसंख्येच्या वाढीचा दर सर्वांत जास्त नंदुरबार जिल्ह्यात (२३.६२%) होता. या दशकात ग्रामीण लोकसंख्येच्या सर्वांत जास्त ऋणात्मक वाढीच्या दरामध्ये क्रमवारीने रत्नागिरी (- १०.३४%), रायगड (- ०.६३%), वर्धा (- ३.९९%) या जिल्ह्यांची क्रमांक लागले.

हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्रातील भौगोलिक व नैसर्गिंक पर्यटनस्थळे कोणती? त्यांची वैशिष्ट्ये काय?

महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्येची टक्केवारी :

महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्येनुसार पहिले पाच जिल्हे

  • गडचिरोली (८९%)
  • सिंधुदुर्ग (८७.४%)
  • हिंगोली (८४.८%)
  • रत्नागिरी (८४.७%)
  • नंदुरबार (८३.३%)

महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्येनुसार शेवटचे पाच जिल्हे

  • ठाणे-पालघर (२३%)
  • नागपूर (३१.७%)
  • पुणे (३९%)
  • औरंगाबाद (५६%)
  • नाशिक (५७.५%)

नागरी लोकसंख्येची वैशिष्ट्ये

सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात नागरी लोकसंख्या ५०,८१८,२५९ (सुमारे ५.०८ कोटी) इतकी आढळली. एकूण लोकसंख्येशी नागरी लोकसंख्येची टक्केवारी ४५.२३% होती. राष्ट्रीय स्तरावर हेच प्रमाण ३१.१६% आढळले. एकूण लोकसंख्येशी नागरी लोकसंख्येची राष्ट्रीय स्तराच्या मानाने महाराष्ट्रात नागरी लोकसंख्या १४.०७% टक्क्यांनी जास्त आढळली. २००१ सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात नागरी लोकसंख्या टक्केवारी ४२.४०% इतकी होती. सन २०११ च्या अंतिम जनगणनेनुसार भारतात नागरी लोकसंख्येच्या प्रमाणात प्रथम क्रमांक तमिळनाडू (४८.४५%), दुसरा क्रमांक केरळ (४७.७२%) तर तिसरा क्रमांक महाराष्ट्र (४५.२३%) राज्याचा आढळला. २००१ सालच्या जनगणनेनुसार नागरी लोकसंख्येच्या प्रमाणात प्रथम क्रमांक तमिळनाडू, तर दुसरा क्रमांक महाराष्ट्र राज्याचा होता. भारतातील नागरी लोकसंख्यादृष्ट्या विचार करता, महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक असून, २०११ सालीसुद्धा महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर होते. भारतामधील एकूण नागरी लोकसंख्येपैकी १३.१८ टक्के नागरी लोकसंख्या महाराष्ट्रात आढळली.

महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्येनुसार पहिले पाच जिल्हे

  • मुंबई शहर व उपनगर (१००%)
  • ठाणे-पालघर (७७%)
  • नागपूर (६८.३%)
  • पुणे (६१%)
  • औरंगाबाद (४३.८%)

महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्येनुसार शेवटचे पाच जिल्हे

  • गडचिरोली (११%)
  • सिंधुदुर्ग (१२.६%)
  • हिंगोली (१५.२%)
  • रत्नागिरी (१६.३%)
  • नंदुरबार (१६.७%)

अशा प्रकारे महाराष्ट्रातील लोकसंख्या रचना, वाढीचा दर व त्यांचे जिल्हावार वितरण आढळले.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc geography demography of maharashtra its density and characteristics mpup spb
Show comments