सागर भस्मे
मागील लेखातून आपण महाराष्ट्रातील हवामानाविषयीची माहिती घेतली. या लेखातून आपण महाराष्ट्रातील वनक्षेत्रांबाबत जाणून घेऊ. प्रत्येक प्रदेशाची वनसंपदा ही तेथील हवामान व पर्जन्याचे प्रमाण यांवर अवलंबून असते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील वने व त्यांचे प्रकार येथील पर्जन्यमानावर अवलंबून आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक भागात वेगळ्या स्वरूपाचा व वेगळ्या प्रमाणात पाऊस पडतो. जसे कोकण किनारपट्टी व सह्याद्री पर्वतरांगेचा पश्चिम माथा इथे ३०० सेंमी पाऊस पडतो. मराठवाड्यात काही ठिकाणी ७५ सेंमीपेक्षासुद्धा कमी पाऊस पडतो; तर विदर्भामध्ये अरबी सागर व बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या दोन्हीं शाखांमार्फत पाऊस मिळतो आणि तो १०० ते २०० सेंमीपर्यंत असतो. यावरून महाराष्ट्रात वनांचे एकूण सहा प्रकार आढळतात. ते खालीलप्रमाणे :
- उष्ण कटिबंधीय सदाहरित वने
- उष्ण कटिबंधीय निमसदहरित वने
- उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वने
- उष्ण कटिबंधीय दमट पर्णपाती वने / उष्ण कटिबंधीय पावसाळी वने
- उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी वने
- उष्ण कटिबंधीय काटेरी वने
हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्रातील कोणत्या भागांत सर्वाधिक पावसाची नोंद होते? राज्यातील पर्जन्याचे प्रकार कोणते?
१) उष्ण कटिबंधीय सदाहरित वने
वार्षिक पर्जन्य सुमारे २०० सें.मी. किंवा त्यापेक्षा जास्त असणाऱ्या प्रदेशात आणि जांभा मृदेच्या भागात उष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्ये पाहावयास मिळतात. महाराष्ट्राच्या कोकण भागात सह्याद्रीच्या पायथ्यालगत सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात सावंतवाडी परिसरात ही सदाहरित अरण्ये पाहावयास मिळतात. वृक्षांचे स्वरूप प्रदेशातील भरपूर पाऊस, आर्द्रतेचे जास्त प्रमाण व जमिनीमध्ये ह्युमसचे मुबलक प्रमाण असल्याने घनदाट वनस्पतींचे आच्छादन पाहावयास मिळते. या वनातील वृक्षांची उंची ४५ ते ६० मी.दरम्यान असते. सदाहरित अरण्यांमध्ये नागचंपा, पांढरा, सिडार, फणस, कावसी, जांभूळ वगैरे वृक्ष आढळतात. विशेष म्हणजे या वनातील वृक्षांचे मानवासाठी जास्त आर्थिक महत्त्व नाही. कारण- या वनस्पतींपासून तयार होणारे लाकूड अतिशय कठीण असल्याने ते टिंबर म्हणून वापरण्यास योग्य नसते; परंतु त्यांच्या साह्याने मृदसंधारण होऊन भूमिगत पाण्याची पातळी वाढते.
२) उष्ण कटिबंधीय निमसदाहरित अरण्ये
वार्षिक पाऊस २०० सेंमी.पेक्षा कमी असणाऱ्या प्रदेशात निमसदाहरित अरण्ये आढळतात. सदाहरित अरण्ये आणि पानझडीची अरण्ये यांच्या मध्य अवस्थेत ही अरण्ये आहेत. पश्चिम किनारपट्टीवर कोकणामध्ये त्यांचा एक सलग पट्टा पाहावयास मिळतो. त्याचप्रमाणे सह्याद्री पर्वताच्या घाटमाथ्यावरही काही वनस्पती आढळतात. विशेषतः आंबोली, लोणावळा, इगतपुरी या परिसरात निमसदाहरित अरण्ये आहेत. निमसदाहरित अरण्यात किंडल, रानफणस, नाना, कदंब, शिसम, बिबला वगैरे वृक्ष आढळतात; तर बांबूची बने कमी प्रमाणात आहेत. महत्त्वाचे म्हणजे निमसदाहरित अरण्यातील वृक्षांचा आर्थिकदृष्ट्या बराच उपयोग होतो.
३) उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वने
पर्वतावर २५० सें.मी.पेक्षा जास्त पाऊस असणाऱ्या प्रदेशात ही अरण्ये आहेत. महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान व भीमाशंकरच्या परिसरात उपोष्ण सदाहरित अरण्ये आहेत. उत्तर महाराष्ट्रात गाविलगड टेकड्यांवरही ही अरण्ये आहेत. उपोष्ण सदाहरित अरण्यात जांभळा, अंजन, हिरडा, आंबा, बेहडा, कारवी कौरे महत्त्वाचे वृक्ष आहेत. या वनातील वृक्षांची फार मोठ्या प्रमाणात तोड करण्यात आली असून, त्यांचे लहान लहान पट्टे राहिलेले आहेत.
४) उष्ण कटिबंधीय दमट पर्णपाती वने / उष्ण कटिबंधीय पावसाळी वने :
ज्या प्रदेशात वार्षिक पाऊस १२० ते १६० सें.मी. असून, तो प्रामुख्याने पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात नैर्ऋत्य मान्सून वाऱ्यांपासून पडतो; तिथे या प्रकारची अरण्ये बघायला मिळतात. महाराष्ट्रात ही अरण्ये प्रामुख्याने चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांच्या पूर्व भागात चिरोल व नवेगाव टेकड्यांवर आहेत. गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात आढळणाऱ्या या प्रकारच्या वनांना ‘आलापल्ली अरण्ये’ म्हणतात. त्याशिवाय भंडारा व गोंदिया जिल्ह्याचा काही भाग, सातपुडा पर्वतरांगांतील गाविलगड टेकड्या (मेळघाट) यांचा समावेश होतो. उत्तर कोकणातील ठाणे व पालघर जिल्ह्यातील डोंगररांगा, तसेच सह्याद्री पर्वतातील घाटमाथा ओलांडल्यानंतर ‘पर्जन्यछायेचा प्रदेश’; त्याशिवाय सह्याद्री पर्वतापासून निघणाऱ्या शंभू महादेव, हरिश्चंद्र बालाघाट व सातमाळा या डोंगररांगांच्या पश्चिम भागात दमट पानझडी अरण्ये पाहावयास मिळतात.
हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्राचे हवामान नेमके कसे आहे? उन्हाळ्यात राज्यातील काही भागांत तापमानवाढ का होते?
५ ) उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी वने
वार्षिक पर्जन्य ८० ते १२० सें.मी. असणाऱ्या प्रदेशात रुक्ष पानझडी अरण्ये आढळतात. सातपुडा पर्वतरांगा आणि अजिंठा डोंगररांगांत रुक्ष पानझडी अरण्ये आढळतात. घाटमाथ्याच्या पूर्वेस पायथ्यालगत असणाऱ्या कमी उंचीच्या टेकड्यांवरही ही अरण्ये पाहावयास मिळतात. अशाच प्रकारे विदर्भात डोंगराळ भाग या अरण्यांनी व्यापलेला आहे. उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी जंगलांमध्ये साग, धवडा, शिसम, तेंदू, ताड, बिळसाळ, लेंडी, हेडी, वेल, खैर, अंजन अशी झाडे आहेत.
६) उष्ण कटिबंधीय काटेरी अरण्ये
दख्खनच्या पठारावर मध्य महाराष्ट्रात नदीखोऱ्यांच्या लागवडीच्या परिसरात असणाऱ्या डोंगररांगांवर व कमी उंचीच्या पठारावर काटेरी झाडे आढळतात. पुणे, सातारा, सांगली व अहमदनगरच्या पूर्व भागात, तसेच सोलापूर, मराठवाडा व विदर्भ या भागांतही टेकड्यांवर काटेरी अरण्ये आहेत. काटेरी अरण्यात बाभूळ, खैर, हिवर हे वृक्ष सर्वत्र आढळतात. निंब हे झाडही अनेक ठिकाणी पाहावयास मिळते.