सागर भस्मे
पृथ्वीच्या पृष्ठभागापासून केंद्रापर्यंतचे अंतर ६३७० किमी असून खोलीनुसार त्याचे तीन भाग पडतात. शिलावरण/ कवच (Lithosphere / Crust), प्रावरण/ मध्यावरण (Middle Cover) आणि गाभा (Core) प्रत्येकाची स्वतःची रचना आणि गुणधर्म असतात. या स्तरांमध्ये त्यांची रासायनिक रचना, भौतिक स्थिती आणि यांत्रिक वर्तन यांसारख्या घटकांवर आधारित फरक केला जातो.
हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : भूखंडवहन आणि भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत
शिलावरण
पृथ्वीच्या सर्वात वरच्या बाह्य घनरूपास शिलावरण असे म्हणतात. शिलावरणाची जाडी ४० किमी असून शिलावरणाचा २९ टक्के भाग जमिनीने आणि ७१ टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. शिलावरणाचे सियाल आणि सायमा असे दोन भागात वर्गीकरण केले जाते. शिलावरणाचा वरचा भाग सियालचा बनलेला असून याची जाडी २९ किमी असते; तर सायमा थर हा सियालच्या खालचा थर आहे. सामान्यत: महासागरांचे तळ सायमानी बनलेले आहेत. महासागराखाली याची जाडी ३ ते ५ किमी असू शकते, तर भूखंडाखाली ती जाड़ी १३ किमीपर्यंत असू शकते. सियाल व सायमा यांची घनता ज्या भागात बदलते, त्यास कॉनरॉड विलगता असे म्हणतात. शिलावरणामध्ये ऑक्सिजन, सिलिकॉन, ॲल्युमिनियम, कॅल्शियम, सोडिअम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे घटक आढळतात.
प्रावरण / मध्यावरण
शिलावरणाच्या खालील थरास प्रावरण असे म्हणतात. या थराची घनता मध्यम असून तो ३३ किमी ते २९०० किमीपर्यंत विस्तारलेला आहे. पृथ्वीच्या एकूण घनफळापैकी ८३ टक्के भाग, तर पृथ्वीच्या एकूण वस्तुमानापैकी ६७ टक्के भाग प्रावरणाने व्यापलेला आहे. भूकंप लहरीपैकी प्राथमिक लहरींची गती ज्या भागात एकदम वाढते, त्याला ‘मोहो विलगता’ असे म्हणतात. प्रावरणाची खोली सागरतळाखाली १० ते १२ किमी व भूखंडाखाली ३५ किमी. असू शकते.
बाह्य प्रावरण
प्रावरणाच्या वरील भागास बाह्यप्रावरण असे म्हणतात आणि या भागामध्ये भूकंप लहरींचा वेग कमी होतो, म्हणून त्यास Low Velocity Zone म्हणून ओळखले जाते. बाह्य प्रावरणाच्या २५० किमी जाडीच्यावरील भागास दुर्बलावरण असे म्हणतात. येथे खडक अंशत: वितळलेले असतात.
हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : वाऱ्यांचे प्रकार कोणते?
अंत:प्रावरण
अंत:प्रावरणचा भाग उच्च दाब आणि तापमानाखाली असतो. या परिस्थितीमुळे खनिजांमध्ये विविध संरचनात्मक बदल होतात. अंत:प्रावरण मुख्यत्वे लोह आणि मॅग्नेशियम-समृद्ध सिलिकेट खनिजांनी बनलेले आहे. अंत:प्रावरणची जाडी सुमारे ७०० किमी ते २९०० किमी असून हा थर मुख्यतः वितळलेल्या स्वरूपात आहे. बाह्यप्रावरण आणि अंतःप्रावरण यांच्यामध्ये रेपट्टी विलगता आहे.
गाभा
२९०० किमी ते ६३७० किमीपर्यंत म्हणजेच पृथ्वीच्या केंद्रबिंदूपर्यंतच्या अंतरंगास गाभा असे म्हणतात.
बाह्य गाभा
बाह्य गाभ्यातून दुय्यम लहरी जाऊ शकत नसल्याने हा भाग द्रवरूप असावा, असे मानले जाते. येथील घनता १० ते १२.३ इतकी असू शकते. हा थर प्रामुख्याने वितळलेल्या लोह आणि निकेलचा बनलेला असून बाह्य गाभा अंदाजे २३०० किलोमीटर जाडीचा आहे आणि जिओडायनॅमो इफेक्ट म्हणून ओळखल्या जाणार्या प्रक्रियेद्वारे पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो.
आंतरिक गाभा
आंतरिक गाभा हा ५१५० किमी ते ६३७० किमी पर्यंत विस्तारलेला आहे. आंतरिक गाभा हा घन अवस्थेत आहे. आंतरिक गाभ्यात घनता १३.३ ते १३.६ पर्यंत वाढत जाते. आतील गाभा हा पृथ्वीचा सर्वात खोल थर आहे, जो केंद्रस्थानी आहे. अंदाजे १२२० किलोमीटर त्रिज्या असलेला हा एक घन गोल आहे. प्रचंड दाब आणि उच्च तापमान असूनही आतील गाभ्यामध्ये बहुतेक घन स्वरूपात लोह आणि निकेल असते. आतील गाभ्याचे तापमान ५५०० अंश सेल्सिअसपर्यंत असण्याचा अंदाज आहे.
हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : वातावरण म्हणजे काय? वातावरणातील थर कोणते?
संक्रमण विभाग
बाह्य गाभा आणि आंतरिक गाभा यांच्यामध्ये ४५० किमी जाडीचा जो थर आहे, त्यास संक्रमण विभाग असे म्हणतात. गाभा हा अतिशय कठीण अशा खनिज द्रव्यापासून बनलेला आहे. यात प्रामुख्याने निकल (Ni) आणि लोह (Fe) या धातूंचे मिश्रण असल्याने त्यास निफे असेही म्हणतात.