सागर भस्मे

मागील लेखांमधून आपण महाराष्ट्राच्या लोहमार्गाची माहिती बघितली. या लेखातून आपण कोकण रेल्वे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीला समांतर असलेल्या रेल्वेमार्गाविषयी जाणून घेऊ. महाराष्ट्राच्या विकासाचा समतोल साधण्यासाठी स्वातंत्र्योत्तर काळात जे प्रकल्प हाती घेतले गेले, त्यापैकी एक कोकण रेल्वे प्रकल्प होता. कोणत्याही प्रदेशाचा विकास होताना जर त्या प्रदेशाला किनारपट्टी लाभलेली असेल, तर त्या किनारपट्टीला रेल्वेमार्ग असणे अत्यंत आवश्यक असते; अन्यथा त्या प्रदेशाचा विकास रडखडतो.

हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कापड गिरण्या का सुरू झाल्या? याची नेमकी कारणे कोणती?

कोकण रेल्वेची योजना सन १९६५ च्या दरम्यान करण्याचा विचार होता; परंतु भारत- पाकिस्तान युद्ध व इतर काही कारणांमुळे हा प्रकल्प मागे पडला. त्यानंतर सन १९९० मध्ये हा आंतरराज्यीय कोकण रेल्वे प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व केरळ या चार राज्यांच्या संमतीने या योजनेला चालना मिळाली. मुंबई ते मंगलोर या मार्गाने धावणारी कोकण रेल्वेची लांबी ८४३ कि.मी. आहे. रेल्वे प्रकल्पासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना त्याच वर्षी १९९० मध्ये करण्यात आली. अशा प्रकारे देशामध्ये रेल्वेची उभारणी आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी महामंडळ स्थापन करण्याची ही पहिलीच वेळ होती. रेल्वे प्रकल्पासाठी लागणारी जमीन राज्य शासनाने मोफत दिली आहे. तर, सामूहिक भागीदारीतून लागणारा खर्च अथवा त्यातील भांडवल वाटा केंद्र शासन ५१%, महाराष्ट्र २२%, गोवा ६%, कर्नाटक १५% व केरळ ६% असा उचलला गेला.

महाराष्ट्रातील कोकण रेल्वेची वैशिष्ट्ये

राज्यात कोकण रेल्वेची लांबी सुमारे ३८१ कि.मी. आहे. कोकण रेल्वे पूर्णपणे कार्यान्वित झाल्यामुळे मुंबई ते कोचीनदरम्यानचे अंतर ५१३ कि.मी.ने कमी झाले आहे. त्याचप्रमाणे मुंबई – मंगलोर मार्गावरील १,१२७ कि.मी. अंतर कमी झाले आहे. तसेच मुंबई-गोवादरम्यानचे अंतर १८५ कि.मी.ने कमी झाले आहे. या रेल्वेमार्गावर एकूण ६८ रेल्वेस्थानके असून, त्यापैकी महाराष्ट्रात ३४ स्थानके आहेत. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, करंजाडी व विन्हेरे ही स्थानके; रत्नागिरी जिल्ह्यातील दिवाणखवटी, खेड, अंजनी, चिपळूण, कामठे, सावर्डा, अरवली, संगमेश्वर, निवसर, वेरावली (नवीन स्थानक), तलवडे, आडवली, विलवडे, राजापूर रोड ही स्थानके; तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण, नाधवडे लिंगेश्वर, साकेडी, कणकवली, रानबाबुली, हवेली निरवडे व शेर्ला ही स्थानके आहेत. तसेच मोठे पूल १२६; तर लहान पूल १,३५९ आहेत. या मार्गावर एकूण बोगद्यांची संख्या ७३ असून, लांबी ३७ कि.मी. आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : भूमी उपयोजन म्हणजे काय? महाराष्ट्रातील भूमी उपयोजनेचे स्वरूप कोणते?

रत्नागिरीजवळ ‘पानवळ’ या ठिकाणी आशियातील सर्वांत उंच पूल असून, त्याची उंची ६५ मीटर आहे. कोकण रेल्वे प्रकल्प पूर्ण झाल्याने कोकणातील मासेमारी, फळफळावळ, पेट्रोरसायन उद्योग, खनिज उत्पादन व त्यावरील उद्योगधंद्यांना चालना मिळाली आहे.

Story img Loader