सागर भस्मे

मागील लेखातून आपण महाराष्ट्राच्या भूगर्भरचनेविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण महाराष्ट्रातील खनिज क्षेत्रे व तेथील खनिज संपत्तीविषयी जाणून घेऊया. मागील लेखात बघितल्याप्रमाणे महाराष्ट्राचा जवळपास ८१-८७ टक्के भाग बेसाल्ट खडकाने व्यापलेला आहे. या खडकावर जास्त करून खनिजसंपत्ती आढळत नाही, तर महाराष्ट्राच्या पूर्व भागात म्हणजेच, विदर्भात आणि दक्षिण भागात म्हणजेच कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये खनिजसंपत्तीचे साठे एकवटलेले दिसतात. म्हणजेच १२.३३% भागात खनिजसंपत्ती आढळते. प्रशासकीय विभागानुसार बघितल्यास नागपूरमध्ये ६०%, कोकण २०%, अमरावती १०%, औरंगाबाद ५%, पुणे ३% तर नाशिक विभागात सर्वात कमी २% महाराष्ट्राची खनिज साधनसंपत्ती आहे.

Thirumayam Fort
‘या’ किल्ल्यावरील अंडाकृती खडकाखाली दडलंय काय?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
wall-painted calendar in the Roman Republic
भूगोलाचा इतिहास : एका खेळियाने…
the survey team of the administration seized gold worth 35 lakhs In Ratnagiri
रत्नागिरीत प्रशासनाच्या सर्वेक्षण पथकाने ३५ लाखांचे सोने पकडले
konkan hapus mango season likely to deley due to prolonged monsoon
लोकशिवार: लांबलेल्या पावसाने ‘आंबा’ही लांबवला
bjp leader ashish shelar article allegations on shiv sena ubt for plot grab in dharavi
पहिली बाजू : भूखंड खादाडांचा डाव उद्ध्वस्त
oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड

खनिजसंपत्तीच्या मुख्य क्षेत्रामध्ये खालील जिल्ह्यांचा समावेश होतो :

  • पूर्व विदर्भ : चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर व यवतमाळ जिल्हे.
  • दक्षिण महाराष्ट्र : कोकण व दक्षिण महाराष्ट्रात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व कोल्हापूर जिल्हे.

वरील दोन क्षेत्रांत प्रामुख्याने महाराष्ट्राची खनिजसंपत्ती केंद्रीत झालेली आहे. महाराष्ट्रात प्रमुख खनिजांच्या उत्खननासाठी २८५ खनिजपट्टे आहेत.

हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्राची भूगर्भ रचना नेमकी कशी आहे?

महाराष्ट्रात आढळणारी खनिजे :

१) मॅगनीज : भारतात मॅगनीजचा साठा सुमारे १६१ दशलक्ष टन असून, यापैकी ४० टक्के साठा एकट्या महाराष्ट्रात आहे. भंडारा व गोंदियातील मॅगनीज साठे हे भारतातील मोठ्या साठ्यांपैकी एक आहेत. नागपूर जिल्ह्यात मॅगनीजचा पट्टा सावनेर तालुक्यापासून तो पूर्वस रामटेक तालुक्यापर्यंत आहे. पूर्व विदर्भात मॅगनीजच्या काही महत्त्वाच्या खाणी, गुमगाव, रामडोगरी, कांदेगाव, मनसळ, सीतासावंगी या ठिकाणीसुद्धा आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी येथे मॅगनीजचे साठे आढळतात.

२) लोहखनिज : लोहखनिजाचे चार प्रकार भारतात आढळतात. मॅग्नेटाइट, हेमाटाईट, लिमोनाईट व सिडेराईट. भारतात लोहखनिजाचा अंदाजे साठा १.३४६ कोटी टनांचा आहे. यापैकी २० टक्के लोहखनिज महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात लोहखनिजाचे महत्वाचे साठे गडचिरोली, गोंदिया, नागपूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आहेत. उत्तम प्रकारचे लोहखनिज धारवाडी खडकात असते. हेमेटाईट हे महत्त्वाचे खनिज चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात आहे. चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर व गोंदिया या जिल्ह्यांमध्ये टेकोनाईट आणि रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सातारा या जिल्ह्यांमध्ये जांभा खडकात लोहखनिज आढळते. लोहारा, असोला, देवळगाव, पिंपळगाव, रत्नपूर, सुरजागड, ग्रामकोट, मुखारा, हितपार, गुंदावास, पोयारकोटी इत्यादी ठिकाणी लोहखनिजाचे साठे आहेत. येथील लोह पाषाण स्थूल असून, यामध्ये ६१ ते ७१ टक्के लोह असते.

•लोहखनिजाचे काही प्रमुख जिल्हे बघूया –

  • चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात पिंपळगाव, भिसी व असोला; ब्रह्मपुरी तालुक्यात रत्नपूर, लोहारडोंगरी येथे लोहखनिजांच्या खाणी आहेत.
  • गडचिरोली : चंद्रपूरप्रमाणेच खनिजसंपत्तीने विपुल असलेला जिल्हा म्हणजे गडचिरोली होय. सुरजागड, भामरागड, दमकोट व पडवी या भागांत उच्च प्रतीचे लोहखनिज आढळते.
  • गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात अग्निजन्य खडकात लोहखनिज सापडते. गोरेगाव तालुक्यात आंबेतलाव व खुर्सीपार येथे मॅग्नेटाइट प्रकारचे लोहखनिज आढळते.
  • सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला तालुक्यातील रेडी, टाका, आजगाव, शिरोडा व नानोसा येथे लोहखनिजाचे साठे आढळतात. रेड्डी व बांदा या भागांतील लोहखनिज धारवाड संघातील खडकात असून यावर जांभा खडकाचा थर आहे. यामध्ये ५० टक्के लोह आहे.
  • कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी व राधानगरी तालुक्यात लोहखनिजाचे साठे आहेत.

३) बॉक्साइट : भरपूर पर्जन्य, उष्ण व दमट हवामान असणाऱ्या जांभा खडकाच्या प्रदेशात बॉक्साइटचे साठे आढळतात. राज्यात बॉक्साइटचे सुमारे ६८ दशलक्ष साठे असून, ते उच्च प्रतीचे आहेत. बॉक्साइटचा उपयोग मुख्यत्वे करून (सुमारे ८० टक्के) ॲल्युमिनिअम निर्मितीमधे केला जातो. उर्वरित बॉक्साइट हे सिमेंट, लोह व पोलाद उत्पादनासाठी वापरतात. भारतातील जवळजवळ २१ टक्के बॉक्साइटचे उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. राज्यात कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, सांगली व सातारा या जिल्हयांमध्ये बॉक्साइटचे साठे आहेत.

याबरोबरच मुंबई उपनगरमध्ये बोरिवली, जोगेश्वरी व गोरेगाव भागातसुद्धा बॉक्साइटचे साठे आहेत. रायगड जिल्ह्यात बॉक्साइटचे सुमारे दहा दशलक्ष टन साठे आहेत. येथील बॉक्साइट हे रासायनिक व धात्विक प्रतीचे असून त्यात ॲल्युमिनिअमचे प्रमाण ४५ ते ५२ टक्के आहे. रायगड जिल्ह्यातील काही बॉक्साइट निर्यात केले जाते. ठाणे जिल्ह्यात सालसेट बेट व तुगार टेकड्यांच्या प्रदेशात बॉक्साइटचे साठे आहेत. सातारा जिल्ह्यातील साठे अल्प प्रमाणात व कनिष्ठ प्रतीचे असल्याने विशेष महत्त्वाचे नाहीत. तसेच सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यात अल्प प्रमाणात बॉक्साइट आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्राची भौगोलिक रचना कशी आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशात राज्याचा कितवा क्रमांक लागतो?

४) क्रोमाईट : क्रोमाईट हे खनिज धातू उद्योग, किमती खड्यावर प्रक्रिया करणारे उद्योग व रसायन उद्योगात याचा उपयोग होतो. भारतातील एकूण क्रोमाईटच्या साठ्यांपैकी सुमारे १०% साठा महाराष्ट्रात असून ते भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, जानोली; तर नागपूर जिल्ह्यात टाका येथे क्रोमाईटचे साठे आहेत.

५) चुनखडी : याला कॅल्शिअम कार्बोनेट असे म्हणतात. बांधकामात लागणारा मूलभूत पदार्थ चुनखडक आहे. बांधकामात जोडण्यासाठी लागणारा चुना हा चुनखडक भाजून तयार केला जातो. विखुरलेल्या मातीत चुनखडीच्या रूपात असलेल्या कंकरापासून चुना उपलब्ध होतो. ट्रॅव्हरटीन किंवा काल्फ टुफा, सागरातील शंख-शिंपले, अर्वाचीन काळातील पोवळ्यांचा चुनखडक भट्टीत भाजून चुना तयार करतात. योग्य प्रकारचा टुफा, मृण्मय चुन्याचा खडक किंवा बहुधा त्याचे खडक, चुनखडक व माती योग्य प्रमाणात मिसळून सिमेंट तयार करतात. महाराष्ट्रात भारताच्या चुनखडीचा नऊ टक्के साठा आहे, परंतु उत्पादन फक्त दोन टक्के आहे. यवतमाळ जिल्ह्यात चुनखडीचे साठे सर्वांत जास्त असून त्याचे अंदाजे साठे २९०० दशलक्ष टन आहेत. बारीक कणांचा आणि करड्या रंगाचा चुनखडक चंद्रपूर जिल्ह्यात वरोडा तालुक्यात सापडतो. चंद्रपूर जिल्ह्यात चुनखडीचे अंदाजे साठे १,०२६ दशलक्ष टन आहेत. अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यात ७५ टक्के कॅल्शिअम कार्बोनेट असलेला टुफा व कामूर, कंडुर व खांडेरावाडी येथे आढळतो.

६) डोलोमाइट : विंध्ययन युगातील चुनखडीच्या खडकाबरोबर डोलोमाईट व डोलोमाईटयुक्त चुनखडीचे साठे प्रामुख्याने यवतमाळ, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आहेत. याशिवाय रत्नागिरी व नागपूर जिल्ह्यात डोलोमाईट आढळते. सौसर प्रस्तर समूहाशी निगडित असलेले डोलोमाईटचे साठे मात्र केवळ नागपूर जिल्ह्यात आहेत. भारताच्या डोलोमाईटचा एकूण साठ्यांपैकी फक्त एक टक्का साठा महाराष्ट्रात आहे. याच्या एकूण उत्पादनापैकी ९० टक्के उत्पादन लोह-पोलादनिर्मितीसाठी वापरले जाते व उरलेले खत कारखान्यात वापरतात.

७) कायनाईट व सिलेमनाईट : हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या उद्योगात याचप्रमाणे काचसामान, रसायन उद्योग, सिमेंट उद्योग व विजेची उपकरणे निर्मिती उद्योगात कायनाईटचा उपयोग होतो. भारताच्या कायनाईटच्या एकूण उत्पादनापैकी १५ टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रात भंडारा-गोंदिया जिल्ह्यात कायनाईटचे साठे आहेत. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात दहेगाव, पिंपळगाव, गरकाभोंगा येथे सिलिमनाईटचे साठे आहेत.

हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्रातील एकूण किनारपट्टीवर किती बेटे आणि खाड्या बघायला मिळतात?

अशाप्रकारे महाराष्ट्राच्या पूर्व भागात खनिजसंपत्तीचे केंद्रीकरण झालेले आहे. दगडी कोळसा, मॅगनीज, लोहखनिज व चुनखडक हे प्रामुख्याने आढळतात. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वांत जास्त प्रमाणात खनिजसंपत्ती आहे. यामध्ये चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर, भद्रावती, चिमूर व वरोडा परिसर प्रसिद्ध आहे. यानंतर नागपूर जिल्ह्यात नागपूर, रामटेक, सावनेर, उमरेड, कामठी व यवतमाळ जिल्ह्यात दिग्रस, मारेगाव व वणी, उमरखेड भंडारा जिल्ह्यात भंडारा व तुमसर आणि गोंदिया जिल्ह्यात गोरेगाव परिसरात महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती आढळते.