सागर भस्मे
मागील लेखातून आपण ग्रामीण वसाहतींबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण महाराष्ट्रातील मुख्य पर्वतरांगांविषयी जाणून घेऊया. महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतरांग म्हणजेच पश्चिम घाट व त्याच्या उपरांगा पसरलेल्या आहेत. तसेच महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा पर्वतरांग पूर्व ते पश्चिम दिशेने स्थित आहे.
१) सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट :
सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट हे महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे एक वैशिष्ट्य आहे, असे म्हणावयास हरकत नाही. महाराष्ट्राच्या पश्चिम कोकण किनारपट्टीस सह्याद्री पर्वत समांतर पसरलेला आहे. त्याची भारतातील एकूण लांबी सुमारे १,६०० कि. मी. असून यापैकी महाराष्ट्रात ४४० कि. मी. लांबीचा सह्याद्री पर्वताचा भाग आहे. यास ‘पश्चिम घाट’ या नावानेही ओळखले जाते. हा पर्वत दख्खनच्या पठाराची पश्चिम सीमा निश्चित करतो. ज्याची सरासरी उंची ९१५ मी. ते १.२२० मीटर आहे. महाराष्ट्रामध्ये उत्तरेकडे जाताना सह्याद्रीची उंची उत्तरेकडे वाढत जाते, तर याउलट दक्षिणेकडे कमी होत जाते. समुद्रकिनाऱ्यास समांतर असणारा हा पर्वत किनाऱ्यापासून सरासरी ३० ते ६० कि. मी. अंतरावर आहे.
हेही वाचा – UPSC-MPSC : अपरंपरागत ऊर्जासंपत्ती म्हणजे काय? या ऊर्जेची निर्मिती महाराष्ट्रात कुठे केली जाते?
पश्चिम किनारपट्टीच्या मैदानी प्रदेशाकडून म्हणजेच कोकणकडून पर्वताकडे पाहिल्यास सह्याद्री सरळ भिंतीसारखा दिसतो. किनाऱ्याच्या सखल प्रदेशावरून कड्यासारख्या दिसणाऱ्या भूप्रदेशाची उंची काही ठिकाणी १.००० मीटर आहे. पश्चिमेकडे सह्याद्रीचा उतार इतका तीव्र आहे. पूर्वेकडून पाहिल्यास पठारावर सह्याद्रीचा उतार मंद आहे. दख्खनचा पठार हळूहळू सह्याद्रीत विलीन होत जातो. वैतरणा व सावित्री नद्यांच्या उगमाजवळ सह्याद्री कंकणाकृती होत जातो.
सह्याद्रीपर्वत नद्यांचा जलविभाजक म्हणून काम करतो. अरबी समुद्रास मिळणाऱ्या पश्चिमवाहिनी नद्यांचे आणि बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या पूर्ववाहिनी नद्यांचे खोरे आणि प्रवाह यामुळे वेगवेगळे झालेले आहेत. याशिवाय किनारपट्टीचा सखल प्रदेश आणि देशावरचा पठारी प्रदेश अलग झालेला आहे. परंतु, नद्यांच्या अपक्षरण (खनन) कार्यामुळे जलविभाजकांचे स्थान बदललेले आहे. दख्खनच्या पठारावरील महत्त्वाच्या नद्यांची उगमस्थाने सह्याद्री पर्वतामध्ये आहेत. जसे की दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी महत्त्वाची असलेली गोदावरी नदी महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम पावून पूर्वेकडे वाहते.
कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी भीमा आहे. सह्याद्रीमध्ये गोदावरी नदीच्या उगमाच्या दक्षिणेस सुमारे १०० कि. मी. अंतरावर भीमाशंकर येथे भीमा नदी उगम पावते. भीमा नदीच्या दक्षिणेस महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचा उगम आहे, तसेच कोयना नदीही तेथूनच उगम पावते. या महत्त्वाच्या नद्यांप्रमाणेच गोदावरी, भीमा आणि कृष्णा नद्यांच्या बऱ्याच उपनद्यांचा उगम सह्याद्री पर्वतामध्ये झाला आहे.
सह्याद्री पर्वतामधील महत्त्वाची शिखरे :
अ) सह्याद्री पर्वतात अनेक महत्त्वाची शिखरे आहेत. त्यापैकी एक म्हणजे कळसूबाई आहे. या शिखराची उंची १,६४६ मी. असून त्याचे स्थान गोदावरीची उपनदी प्रवरा नदीच्या उगमाजवळ (इगतपुरीजवळ) अहमदनगरमध्ये आहे. या शिखराला महाराष्ट्रातील एव्हरेस्ट शिखर म्हणून संबोधले जाते.
ब) नाशिकच्या उत्तरेस सुमारे ९० कि. मी. अंतरावर दुसऱ्या क्रमांकाचे साल्हेर शिखर आहे. त्याची उंची १,५६७ मी. आहे. हरिश्चंद्रगडाची उंची १,४२४ मी. आहे. नाशिकच्या उत्तरेस सप्तश्रृंगी, त्र्यंबकेश्वर ही महत्त्वाची शिखरे आहेत. याशिवाय नाशिक जिल्ह्यात तौला, धुळे जिल्ह्यात हनुमान, नंदुरबार जिल्ह्यात अस्तंभा, पुणे जिल्ह्यात तोरणा यांसारखी शिखरे महत्त्वाची आहेत.
क) सह्याद्री पर्वताच्या लहान-मोठ्या डोंगररांगा सह्याद्रीपासून सर्वसाधारणपणे पूर्वेकडे जातात. या सर्व डोंगररांगांची निर्मिती मुख्य सह्याद्री पर्वतापासून झालेली आहे. पठारावरून वाहणाऱ्या नद्यांचे या डोंगररांगा उपजलविभाजक आहेत. महत्त्वाच्या डोंगररांगा तसेच त्यांच्या लहान टेकड्यांना भिन्न-भिन्न स्थानिक नावे आहेत.
सह्याद्री पर्वताच्या खालील तीन मोठ्या डोंगररांगा आहेत.
अ) सातमाळा-अजिंठा डोंगररांगा : गोदावरी व तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळी करणारी सातमाळा-अजिंठा डोंगररांग नाशिक जिल्ह्यात उगम पावतात. पूर्वेकडे हिची उंची कमी-कमी होत जाते. देवगिरीचा (दौलताबाद) किल्ला याच रांगेत आहे. ही डोंगररांग तुटक तुटक असून तिची साधारण दिशा पश्चिम-पूर्व आहे. डोंगररांगांच्या पूर्वेस उतार मंद असून गोदावरी नदीच्या खोऱ्याकडे तो अधिकाधिक मंद होत जातो.
ब) हरिश्चंद्र-बालाघाट डोंगररांगा : गोदावरीच्या दक्षिणेस हरिश्चंद्र-बालाघाट डोंगररांगा आहेत. या डोंगररांगांच्या पश्चिम भागास ‘हरिश्चंद्र घाट’ व पूर्व भागास ‘बालाघाट’ या नावाने ओळखले जाते. पुढे हीच रांग आग्नेयेस वळून तेलंगणामधील हैदराबादपर्यंत जाते. या डोंगररांगांवरही सपाट माथ्याचे प्रदेश आहेत. उदा. अहमदनगर जिल्ह्यातील जेऊरजवळ बालाघाट पठार आहे.
क) शंभू महादेव डोंगररांगा : सह्याद्री पर्वतापासून ही डोंगररांग सुमारे १८° उत्तर अक्षवृत्तापासून आग्नेय दिशेने जाते. रायरेश्वरापासून शिंगणापूरपर्यंत पसरलेल्या रांगेला ‘शंभू महादेव डोंगररांग’ असे म्हणतात. या डोंगररांगा सातारा व सांगली जिल्ह्यांतून पुढे कर्नाटकात जातात. भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेस शंभू-महादेव डोंगर आहे. यामुळे भीमा व कृष्णा या नद्यांची खोरी वेगवेगळी झालेली आहे. शंभू महादेव डोंगरावर काही ठिकाणी सपाट माथ्याचे प्रदेश आहेत. येथे महाबळेश्वर ‘टेबललँड’ या नावाचे पाचगणी पठार प्रसिद्ध आहे.
हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्रातील ग्रामीण वसाहतीची प्रारूपे अन् वैशिष्ट्ये कोणती?
२) सातपुडा पर्वतरांग व डोंगररांगा :
महाराष्ट्राच्या उत्तर सीमेजवळ सातपुडा रांग पसरलेली आहे. राज्यात सातपुडा पर्वतरांगेचा फारच थोडा भाग समाविष्ट होतो. पूर्व-पश्चिम दिशेने पसरलेल्या सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा व तापी नदीचे खोरे अलग झालेले आहे. महाराष्ट्रामध्ये सातपुड्याच्या काही डोंगररांगा उत्तर महाराष्ट्रात विखुरलेल्या आहेत. नंदुरबार जिल्ह्यात पश्चिम भागात तोरणमाळ हे एक लहान आकाराचे पठार असून त्याची उंची १,०३६ आहे; तर त्या भागातील सर्वात जास्त उंचीचे शिखर अस्तंभा डोंगर असून त्याची उंची १,३२५ मी. आहे. सातपुडा पर्वतरांगांचा काही भाग अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागात आढळतो. त्यास गाविलगड टेकड्या असे म्हणतात. या ठिकाणी डोंगरांची उंची १,००० मी. पेक्षा जास्त आहे. येथील वैराट शिखराची उंची १,१७७ मी., तर चिखलदराची उंची १,११५ मी. आहे. अमरावतीच्या गाविलगड टेकड्यांचा दक्षिण उतार अतिशय तीव्र स्वरूपाचा आहे. १,२०० मी. पासून एकदम ३०० मी. कमी होतो.
३) अन्य डोंगर किंवा टेकड्या :
महाराष्ट्रात काही वैशिष्ट्यपूर्ण डोंगर किंवा टेकड्या पठारावर आढळतात. उदा. धुळे जिल्ह्यात गाळणा डोंगर, औरंगाबाद जिल्ह्यात वेरूळ डोंगर, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात अनुक्रमे हिंगोली व मुदखेड डोंगर आहेत. विदर्भातील नागपूर जिल्ह्यात गरमसूर टेकड्या, गोंदिया जिल्ह्यात दरकेसा टेकड्या, भंडारा जिल्ह्यात गायखुरी डोंगर, गडचिरोली जिल्ह्यात चिरोली टेकड्या, भामरागड व सूरजागड डोंगर आहेत. पूर्वेकडे अजिंठ्यापासून डोंगरांचे दोन सुळके होतात. त्यापैकी एक रांग देवगिरी सिंदखेडवरून दक्षिणेस परभणी व नांदेड जिल्ह्यातून जाते, तिला ‘निर्मल रांग’ असे म्हणतात; तर उत्तरेस असणारी रांग यवतमाळ जिल्ह्यातून जाते.