सागर भस्मे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील लेखातून आपण महाराष्ट्रातील रस्ते वाहतुकीविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण महाराष्ट्रातील रेल्वे वाहतुकीविषयीची माहिती जाणून घेऊ. महाराष्ट्रात रस्त्यांनंतर रेल्वेमार्गाला महत्त्व आहे. कारण- रेल्वे, तसेच सर्वच वाहतूक यंत्रणेला राज्याच्या कानाकोपऱ्यांत आवश्यक वस्तू वर्षभर सातत्याने पुरवावयाच्या असतात. ज्याप्रमाणे रस्त्यांना महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतापासून निघालेल्या काही डोंगररांगा मर्यादित करतात, त्याचप्रमाणे त्या रेल्वेबांधणीसही मर्यादा घालतात. तसेच मराठवाड्याचा औद्योगिकदृष्ट्या मागासलेला प्रदेश आणि सातारा-सांगली भागातील शुष्क प्रदेश रेल्वेच्या विकासासाठी अजून तरी फारसा अनुकूल झालेला नाही. असे असले तरीही महाराष्ट्रातील इतर भागांत जसे की खानदेश, वऱ्हाड व मुंबई संलग्न क्षेत्र या भागांत रेल्वे वाहतुकीचा विकास झालेला दिसतो.

ऐतिहासिकदृष्ट्या भारतातील रेल्वे विकास बघितल्यास भारतात पहिली रेल्वे १८५३ साली मुंबई ते ठाणेदरम्यान सुरू झाली. ३१ मार्च २०१८ रोजीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सुमारे ६,११४ कि.मी. लांबीचे रेल्वेमार्ग आहेत. (कोकण रेल्वेची ३८१ कि.मी. लांबी मिळून) जे भारतातील रेल्वेमार्गांच्या लांबीच्या एकूण ८.९% आहेत.

हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्रातील रस्ते वाहतुकीची रचना कशी? राज्यातील रस्त्यांचे किती प्रकार पडतात?

रेल्वेमार्गांचे प्रकार

रेल्वेमार्गाचे रेल्वे रुळाच्या रुंदीनुसार तीन प्रकार पडतात. १) रुंद मार्ग (ब्रॉड गेज), २) मध्यम रुंद मार्ग (मीटर गेज) व ३) अरुंद मार्ग (नॅरो गेज). त्यापैकी रुंद मार्गावरील दोन रुळांमध्ये १.६७ मीटर अंतर असते. मध्यम रुंद मार्गावरील रुळांमध्ये एक मीटरचे अंतर असते. तसेच अरुंद मार्गावरील रुळांमध्ये ०.७६२ मीटर अंतर असते.

१) महाराष्ट्रातील महत्त्वाचे ब्रॉडगेज रेल्वेमार्ग

  • मुंबई-दिल्ली हा अहमदाबादमार्गे असलेला पश्चिम रेल्वेचा मार्ग मध्य रेल्वेपेक्षा कमी वेळेचा आणि कमी अंतराचा आहे.
  • मुंबई-चेन्नई हा मध्य रेल्वेचा मार्ग कल्याणनंतर बोरघाटातून पुणे-सोलापूरमार्गे चेन्नईला महाराष्ट्रातील भीमा खोऱ्यातून जातो.
  • मुंबई-सिकंदराबाद हा मार्ग वरील मार्गाप्रमाणेच मुंबई-पुणे-सोलापूरपर्यंत जाऊन, पुढे सिकंदराबादला जातो.
  • मुंबई-कोल्हापूर मार्ग पूर्वी पुणे-बंगळुरू असलेला रेल्वेमार्ग मीटरगेजचा होता. आता तो ब्रॉडगेज करण्यात आला आहे.
  • दिल्ली-चेन्नई (ग्रँट ट्रंक मार्ग) या मार्गाची सुरुवात महाराष्ट्रातून होत नाही; परंतु विदर्भाच्या दृष्टीने हा मार्ग महत्त्वाचा आहे. कारण- विदर्भात नागपूर, वर्धा, चंद्रपूर व बल्लारपूरवरून हा मार्ग पुढे आंध्र प्रदेशातून चेन्नईला जातो.
  • भुसावळ-सुरत रेल्वेमार्ग तापी खोऱ्यातून भुसावळ-जळगावमार्गे गुजरातमधील सुरतकडे जातो.
  • निजामुद्दीन एक्स्प्रेस गोव्याहून दिल्लीला जाणारी गाडी महाराष्ट्रातून जाते. राज्यात मिरज-पुणे-मनमाड मार्गाने ती पुढे दिल्लीला जाते.

२) मीटरगेज रेल्वे :

महाराष्ट्रात मीटरगेज रेल्वेमार्गाचे रूपांतर आता ब्रॉडगेजमध्ये होत आहे. परभणी-अकोट-खांडवा हा मार्ग मीटरगेज रेल्वेचे उदाहरण आहे. हा मार्ग परभणी-पूर्णा-हिंगोली-वाशीम, अकोटवरून मध्य प्रदेशात खांडव्यापर्यंत जातो.

३) अरुंद मार्ग (नॅरोगेज) :

महाराष्ट्रात सुमारे ७३३ कि.मी. लांबीचे नॅरोगेज रेल्वेमार्ग आहेत. उदाहरणार्थ- नेरळ-माथेरान, लातूर-चंद्रपूर, पाचोरा-जामनेर, मूर्तिजापूर-अचलपूर, मूर्तिजापूर-यवतमाळ, पुलगाव-आर्वी इ.

हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्रातील वनक्षेत्रांचे प्रकार कोणते? त्यांचे वर्गीकरण कसे केले जाते?

महाराष्ट्रातील रेल्वे /लोहमार्गाची वैशिष्ट्ये

महाराष्ट्रातील बहुतेक सर्व महत्त्वाची शहरे लोहमार्गांनी जोडलेली आहेत. असे असले तरीही पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेने कोकण, मराठवाडा व विदर्भात रेल्वेचे जाळे फारसे विकसित झालेले नाही. मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, विदर्भातील बुलडाणा व गडचिरोली ही जिल्ह्यांची ठिकाणे अद्याप कोणत्याही लोहमार्गावर नाहीत. मुंबई बंदरामध्ये भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार मोठ्या प्रमाणात चालतो आणि त्याची बरीचशी वाहतूक रेल्वेद्वारे होते. अशा प्रकारे लोहमार्गाच्या जाळ्यामुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्था विकासाला चालना मिळते.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc geography railway transportation in maharashtra and tyes of railroute mpup spb
First published on: 19-10-2023 at 12:39 IST