सागर भस्मे
मागील लेखातून आपण महाराष्ट्राची भौगोलिक रचना आणि महाराष्ट्रातील प्रादेशिक विभागांबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचना नेमकी कशी आहे? याबाबत जाणून घेऊ. पृथ्वीची निर्मिती जवळपास ४.५ बिलियन वर्षांपूर्वी झाली; तर ३.५ बिलियन वर्षांपासून पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्वात आली. तेव्हा पृथ्वीचा भूभाग वर्तमान स्थितीत जसा आहे तसा नव्हता, तो एक ‘पंजिया’ नावाचा अखंड भूभाग होता. त्याचे विखंडन अनेक भागांमध्ये होऊन स्थानांतर झाले. त्या भागांपैकी एक म्हणजे सध्याचा दख्खन भाग होय. या भूभागावर काही प्रमाणात भूगर्भीय हालचाली झालेल्या आहेत.
द्वीपकल्पीय पठार हा पृथ्वीवरील सर्वांत प्राचीन आणि स्थिर असा भूभाग मानला जातो. द्वीपकल्पीय पठाराचा एक भाग महाराष्ट्र पठार आहे. महाराष्ट्र राज्याचा भूभाग एकूण क्षेत्रफळाच्या ८६.७ % क्षेत्रफळ द्वीपकल्पीय पठाराने व्यापलेला आहे. सुरुवातीपासूनच महाराष्ट्राचा प्राथमिक किंवा पायाभूत खडक आर्कियन (Archian) आहे. या प्राथमिक खडकावर २९ वेळा झालेल्या ज्वालामुखी उद्रेकाचे थर साचत गेले आणि त्यामुळे काळानुसार बेसाल्टचे संचयन होऊन महाराष्ट्र भूमीचा मुख्य खडक बेसाल्ट बनला. असे असले तरी महाराष्ट्रातील खडकांचे पुढील प्रकार पडतात, त्यांचा आपण थोडक्यात आढावा घेऊ…
हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्रातील एकूण किनारपट्टीवर किती बेटे आणि खाड्या बघायला मिळतात?
१) आर्कियन खडक :
दख्खनचा पायाभूत खडक मानला जाणाऱ्या आर्कियनची निर्मिती ४,६०० ते २,५०० दशलक्ष वर्षांपूर्वीची आहे. त्यालाच वेदकालीन खडकसुद्धा म्हणतात. त्यात प्रामुख्याने निस, ग्रॅनाईट व शिस्ट खडक आहेत. महाराष्ट्रात दक्षिण व पूर्व भागात थोड्या ठिकाणी पायाभूत खडक आढळत असून, त्यावर त्यानंतरच्या काळातील खडकांचे आवरण आहे. विदर्भात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र आर्कियन प्रकारचे खडक आढळता आणि त्यांचा काही भाग उत्तरेस भंडारा व गोंदिया जिल्ह्यात पसरलेला आहे. कोकणात सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यात आर्कियन काळातील खडक आढळतात. या खडकामध्ये उत्तम प्रतीचे लोहखनिजाचे पट्टे आहेत; त्यास ‘लोहखनिज सीरिज’ असे म्हणतात.
२) धारवाड सीरिज किंवा खडक :
या खडकाची निर्मिती सुमारे २०० ते २५० कोटी वर्षांपूर्वी झाली. अग्निजन्य खडकाच्या स्फटिकमय खडकाबरोबर मोठ्य प्रमाणात रूपांतर व जलजन्य प्रकारची प्रक्रिया होऊन, तयार होणाऱ्या खडकास धारवाड खडक, असे म्हणतात. या खडकात उच्च प्रतीचे मॅंगनीज व लोहखनिज आढळते. त्यामध्ये प्रामुख्याने ग्रॅन्युलाइट्स, डोलोमाइट, संगमरवर, अभ्रक, सिलिमनाइट व हॉर्नब्लेंड शिस्ट आढळतात. पूर्व नागपूर व भंडारा व गोंदिया जिल्ह्यात या खडकाच्या थरास ‘सौसार सीरिज’, ‘चिलपी घाट थर’ व ’गोंडाईट सीरिज’ या नावांनी ओळखले जाते. तसेच या खडकाला महाराष्ट्राच्या उत्तर पूर्व भागात ‘साकोली सीरिज’, असे म्हणतात. हे थर भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिण भागात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, सावंतवाडी या तालुक्यांत धारवाडकालीन खडक आहेत.
३) कडाप्पा प्रकारचा खडक :
त्यानंतरच्या खडकसमूहाच्या कालखंडास पुराणकाल म्हणजेच लोअर पॅलिओझोइक म्हटले जाते. हा कालखंड ५७० दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे. त्यास कडाप्पा व विंध्ययन प्रकारचे खडक असेही म्हणतात. त्यामध्ये कडाप्पा प्रकारचा जुना खडक असून, महाराष्ट्रात तो दक्षिण व पूर्व भागात अनुक्रमे कोल्हापूर व विदर्भातील काही जिल्ह्यांत आढळतो; त्याला ‘कलाडगी सीरिज’ असेही म्हणतात. त्याचप्रमाणे फोंडा घाटाच्या पायथ्यालगत बेसाल्टचा वरच्या थरावर कलाड्गी सीरिजचे खडक आढळतात. कडाप्पा प्रकारचे खडक यवतमाळ जिल्ह्यात पैनगंगा नदी खोऱ्यात ‘पैनगंगा थर’ म्हणून आढळतात. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात चुनखडी व शेल आहेत. याच कारणास्तव यवतमाळ जिल्ह्यामध्ये चुनखडीचे सर्वाधिक साठे सापडतात.
४) विंध्ययन प्रकारचे खडक :
विंध्य खडकाची निर्मिती ६० कोटी वर्षांपूर्वी लोअर पॅलिओझाईक काळात कडाप्पा श्रेणीच्या खडकानंतर झाली. या प्रकारचे खडक सुबक बांधकामासाठी विशेष प्रसिद्ध असून, दीर्घकाळ टिकणारे असतात. परंतु, महाराष्ट्रात या प्रकारचे खडक फारसे आढळत नाहीत. चंद्रपूर जिल्ह्यात उत्तरेकडे त्याचे तीन लहान पट्टे आहेत.
५) आर्यन किंवा गोंडवानाकालीन खडक :
अप्पर कार्बोनिफेरसबरोबर ३६० ते २८६ दशलक्षपूर्वदरम्यान याच या खडकाची निर्मिती झालेली आहे. या काळात दख्खनच्या पठारावर स्थानिक पातळीवर तणावक हालचाली निर्माण होऊन खोऱ्याच्या आकारासारखे खोलगट भाग निर्माण झाले. द्वीपकल्पाच्या पठारावरील नद्यांच्या गाळाने ते भाग हळूहळू भरू लागले. यादरम्यान अनेक वनस्पती या खोलगट भागांमध्ये जमा होऊन आज कोळशाचे जाड थर या खडकात आढळतात. विदर्भात कन्हान खोऱ्यात अशा प्रकारचे कोळशाचे पट्टे आढळतात; ज्याला ‘कामटी सीरिज’ असे म्हणतात. वर्धा खोऱ्यात चंद्रपूर व यवतमाळ जिल्हात विस्तीर्ण क्षेत्रात या प्रकारचे खडक आहेत. गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुका व अमरावतीच्या उत्तर भागात गोंडवाना खडक सापडतो.
हेही वाचा – UPSC-MPSC : महासागरातील भरती व ओहोटीची प्रक्रिया कशी असते? त्याची नेमकी कारणे कोणती?
६) दख्खन लाव्हा खडक :
जेव्हा भारताचा भूभाग दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धाकडे परिवहन करीत होता, तेव्हा सध्याच्या मादागास्करजवळ स्थित असलेल्या बेटाजवळ ज्वालामुखीचे २९ वेळा भ्रंशमूलक उद्रेक होऊन, लाव्हा व मॅग्मा महाराष्ट्र भूभागावर पसरून बेसॉल्ट खडक असलेले दख्खनचे पठार निर्माण झाले. या सर्व प्रक्रियेमध्ये यापूर्वीच्या काळातील भूप्रदेशावरील सर्व भूदृश्ये लाव्हारसाच्या संचयनामुळे गाडली गेली. महाराष्ट्रातील लाव्हारसाचा विस्तार पश्चिम घाटापासून पूर्वेकडे नागपूरपर्यंत पसरलेला आहे. समांतर दिशेने पसरलेल्या या बेसाल्ट खडकाची सर्वांत जास्त जाडी मुंबईजवळ तीन हजार मीटरपेक्षा जास्त आहे.
७) गाळाचे संचयन :
प्लायस्टोसीन कालखंडात म्हणजेच दोन दशलक्ष वर्षांपूर्वी तापी-पूर्णांच्या खचदरीमध्ये आणि गोदावरी, वर्धा, वैनगंगा, प्राणहिता, कृष्णा, भीमा या नदीखोऱ्यामध्ये गाळाचे संचयन झाले असून, गाळाचा खडक निर्माण झाला आहे.
अशा प्रकारे महाराष्ट्राची भूगर्भ रचना आहे.