सागर भस्मे
मागील लेखात आपण महाराष्ट्रात आढळणाऱ्या ग्रामीण वसाहतीचे प्रकार बघितले. या लेखातून आपण ग्रामीण वसाहतीची प्रारूपे म्हणजेच वसाहतीचा आकार (Shape) व बाह्य विस्तार याबाबत जाणून घेऊ.
रेषाकृती / रेखाकृती प्रारूप (Linear Pattern) :
कालवा, रस्ता यांच्या दुतर्फा, नदी व समुद्रकिनाऱ्याच्या काठांवर आणि पर्वतीय प्रदेशाच्या एका पंक्तीत घरे वसलेली असतात. अशा अरुंद पट्टीच्या आकाराच्या वसाहतीला ‘रेषाकृती प्ररूप’ असे म्हणतात. त्यांची प्रवेशद्वारे परस्परांना समांतर असतात. महाराष्ट्रात मुंबई-पुणे रस्त्यावर अशी अनेक खेडी आहेत.
- रेषाकृती / रेखाकृती प्रारूप वैशिष्ट्ये
१) ही घरे बहुधा एका रांगेत असतात. कालांतराने त्यांच्या अनेक रांगा होतात.
२) वसाहतीवरील रस्ते व गल्ल्या परस्परांना समांतर असतात.
३) घरांची प्रवेशद्वारे एकाच दिशेला असतात.
हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्रातील ग्रामीण वसाहतीचे प्रकार कोणते?
२) केंद्रत्यागी/त्रिज्याकार प्रारूप (Radial Pattern)
वसाहतीमधील प्रमुख चौकात किंवा मध्यवर्ती महत्त्वाच्या ठिकाणापाशी अनेक मार्ग एकत्र येऊन मिळतात किंवा येथून विविध दिशांना मार्ग बाहेर गेलेले असतात. त्याला ‘केंद्रत्यागी/त्रिज्याकार प्रारूप’ असे म्हणतात. हे मार्ग जेथे एकवटलेले असतात, तेथे घरांची गर्दी झालेली असते.
- केंद्रत्यागी / त्रिज्याकार प्रारूपाची वैशिष्ट्ये
१) वसाहतीच्या केंद्रभागापासून बाहेर जसा रस्त्यांचा विकास होत जातो, त्याचबरोबर नवीन घरांची स्थापना होत जाते.
२) वसाहतीमधील रस्ते व गल्ल्या परस्परांना समांतर नसतात.
३) वसाहतीच्या मध्यभागी व्यापारी केंद्रे असतात.
४) केंद्रभागी घरे अत्यंत दाटीने व अनियंत्रितपणे वसलेली असतात; तर बाहेरच्या बाजूला रस्त्याला अनुसरून घरे बांधलेली असतात.
३) बाणाकृती प्रारूप (Arrow Type Pattern) :
वसाहती नदीच्या टोकदार अग्र वळणाच्या अंतर्गत भागात किंवा समुद्रात घुसलेल्या जमिनीच्या उंच निमुळत्या भूभागावर स्थापन झालेली जी घरे असतात; त्यांना ‘बाणाकृती प्रारूप’ असे म्हणतात.
- बाणाकृती प्रारूपाची वैशिष्ट्ये :
१) वळणाच्या अग्रभागावर घरांची संख्या कमी असते, तर पार्श्वभागावर तुलनेने घरांची संख्या जास्त असते.
२) या प्रकारच्या वसाहतींचा विकास पार्श्वभागावरच होत असतो.
४) ताराकृती / तारकाकृती प्रारूप (Star Pattern) :
सुरुवातीला केंद्रत्यागी / त्रिज्याकार स्वरूपाच्या वसाहतीचा विकास होऊन, पुढील काळात वसाहती वाढत गेल्यावर, त्या वसाहतींचे रूपांतर तारकाकृती वसाहतीमध्ये होते. सुरुवातीला घरे अनियमित स्वरूपाने गावाच्या मध्यभागातून जाणाऱ्या रस्त्याला अनुसरून असतात; परंतु गावाचा जसा विकास होत जातो, त्याबरोबर रस्त्यांना अनुसरून नियमबद्ध घरे बांधली जातात.
- ताराकृती/तारकाकृती प्ररूपाची वैशिष्ट्ये :
१) वसाहतीचा आकार ताऱ्याप्रमाणे / चांदणीप्रमाणे असतो.
२) वसाहतीच्या बाहेरील बाजूला रस्ते परस्परांना समांतर असतात.
५) गोलाकार / वर्तुळाकार प्रारूप (Circular Pattern)
तलाव, सरोवर, वटवृक्ष किंवा गावातील एखादी महत्त्वाची वास्तू / घर यांच्याभोवती गोलाकार स्वरूपात घरे बांधलेली असतात; त्याला ‘गोलाकार/वर्तुळाकार प्रारूप’ असे म्हणतात. या वसाहतीचे पुढील दोन प्रकार पडतात एक नाभिक/ केंद्रीय वसाहत; तर दुसरी निहारकाय /नेब्युलर वसाहत.
- गोलाकार / वर्तुळाकार प्रारूपाची वैशिष्ट्ये
१) वसाहतीमधील घरांची प्रवेशद्वारे मध्यवर्ती भागाकडे असतात. प्रत्येक घराला एकच प्रवेशद्वार असते.
२) घरांना दारे-खिडक्या कमी असतात.
६) चौकोनाकृती / चौकपट्टीय प्रारूपे (Checkerboard Pattern)
सपाट मैदानी प्रदेशात ज्या ठिकाणी रस्ते किंवा लोहमार्ग परस्परांना ओलांडतात, तेथील वसाहतींना ‘चौकोनाकृती/चौकपट्टीय प्रारूप’ असे म्हणतात. इतर रस्ते व गल्ल्यादेखील समांतर असतात आणि एकमेकांस समकोनात मिळतात. वसाहतीमधील घरे पंक्तीबद्ध असतात.
हेही वाचा – UPSC-MPSC : साखर उद्योगात महाराष्ट्र अग्रेसर असण्याची मुख्य कारणे कोणती?
७) ठोकळाकृती प्रारूप (Block Pattern)
या प्रकारच्या वसाहती वाळवंटी व निमओसाड प्रदेशात आढळतात. वसाहतीच्या चारही बाजूंना उंच संरक्षक तटबंदी बांधलेली असते.
- ठोकळाकृती प्रारूपाची वैशिष्ट्ये
१) वसाहतीमधील घरांच्या भिंती उंच असतात.
२) एखाद्या प्राचीन किल्ल्याप्रमाणे ही वसाहत दिसते. वसाहत शक्यतो उंच जागी असते.
८) शिडीच्या आकाराचे / वेदिकायुक्त प्रारूप (Terraced Pattern)
पर्वतीय भागात उताराला अनुसरून टप्याटप्प्याने घरांच्या रांगा बांधलेल्या असतात. त्यामुळे त्यांची रचना शिडीसारखी दिसते; याला ‘शिडीच्या आकाराचे प्रारूप’ असे म्हणतात. दूरवरून पाहिल्यास या घरांच्या ओळी परस्परांना समांतर वाटतात. पर्वतीय प्रदेशांमध्ये अशा प्रकारची वसाहत आढळते.
- शिडीच्या आकाराच्या / वेदिकायुक्त प्रारूपाची वैशिष्ट्ये
१) उताराच्या टप्प्यानुसार पायऱ्या पायऱ्यांप्रमाणे घरे बांधलेली असतात. घरे व शेतजमीन यांच्यादरम्यान रस्ते पूर्वनियोजित नसतात.
२) नापीक क्षेत्रावर घरे मुख्यतः लाकूड, गवत, दगडांपासून बनविलेली असतात.
हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्रातील कोकण रेल्वे महत्त्वाची का? त्याची मुख्य वैशिष्ट्ये कोणती?
९) मधमाश्यांच्या पोळ्याच्या आकाराचे / मोहोळसदृश्य प्रारूप (Bee-hive Pattern)
ज्या भागात आक्रमणाची किंवा हिंस्र पशूंची भीती असते, अशा ठिकाणी लोक अगदी जवळजवळ राहतात. तसेच घरांची / झोपड्यांची दारे मध्यभागाकडे असतात; याला ‘मधमाश्यांच्या पोळ्याच्या आकाराचे प्रारूप’ असे म्हणतात. उदाहरणार्थ- भारतातील ‘तोडा’ या आदिवासी जमातीच्या वसाहती.
१०) अनियमित / अनाकार प्रारूप (Irregular Pattern)
या प्रकारच्या वसाहतींना विशिष्ट असा आकार नसतो. लोकांच्या सोईनुसार घरे बांधलेली असल्यामुळे घरे कोठेही असू शकतात. रस्त्यांचा विचार केलेला नसतो. घरांना अनुसरून नंतर रस्ते केले जातात.