सागर भस्मे
मागील लेखातून आपण महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण महाराष्ट्रातील उद्योगाविषयी जाणून घेऊया. राज्याच्या आर्थिक विकासामध्ये बळकटी देण्यात औद्योगिक क्षेत्र महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. औद्योगिक क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचे द्वितीय क्षेत्र मानले जाते. ज्यात प्राथमिक क्षेत्रातील निर्मित वस्तूंवर तंत्रज्ञानाचा वापर करून, योग्य प्रक्रिया करून अधिक उपभोगाची वस्तू तयार केली जाते.
भारतातील औद्योगिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने आपले आघाडीचे स्थान कायम राखले आहे. भारतातील एकूण २८ राज्यांत महाराष्ट्र राज्य औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर आहे. तसेच औद्योगिकदृष्ट्या मागासलेल्या भागात जलद औद्योगिकीकरणास चालना व विकासास प्रोत्साहन देण्याकरिता धोरण अवलंबिणाऱ्या राज्यांपैकी ‘महाराष्ट्र’ हे एक अग्रेसर राज्य आहे. ऑगस्ट १९९१ मध्ये महाराष्ट्राने उदारीकरणाचे धोरण अंगीकारले आणि यामुळे राज्यातील औद्योगिकीकरणाला वेगानं चालना मिळालेली दिसते. राज्यातील महत्त्वाच्या उद्योगांमध्ये रसायने व रासायनिक उत्पादने, विद्युत व बिगरविद्युत यंत्रे, कापड, पेट्रोलिअम व पेट्रोलिअम उत्पादने आणि माहिती-तंत्रज्ञान यांचा समावेश होतो. इतर महत्त्वाच्या उद्योगांमध्ये धातू उत्पादने, दारू, जडजवाहीर, औषधे, अभियांत्रिकी वस्तू, पोलाद व लोखंडाचे ओतीव काम आणि प्लास्टिक वस्तू यांचा समावेश होतो.
हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत? त्यांची वैशिष्ट्ये कोणती?
माहिती-तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) आणि विशाल प्रकल्प, द्राक्ष प्रक्रिया इत्यादींबाबतच्या अनुकूल धोरणांचा परिणाम राज्यातील औद्योगिक क्षेत्राचा विकास आणखी वाढण्यामध्ये झाला आहे. चांगल्या दर्जाच्या विकसित पायाभूत सुविधा, विपूल नैसर्गिक साधनसंपत्ती, सर्व महत्त्वाच्या प्रदेशांशी संदेशवहन सुविधा, कुशल मनुष्यबळ व चांगल्या दर्जाच्या शैक्षणिक सुविधा यांनी नवीन उद्योग स्थापित करण्यासाठी महाराष्ट्रास आदर्श ठिकाण बनविले आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे याशिवाय नाशिक, औरंगाबाद, नागपूर व कोल्हापूर यांसारख्या दुय्यम स्तरावरील शहरांचा औद्योगिक केंद्र म्हणून झालेल्या उदयामुळे राज्याच्या औद्योगिक वाढीमध्ये उल्लेखनीय वाढ झाली आहे.
महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांचे प्रकार :
- कृषी उत्पादनांवर आधारित उद्योग : या उद्योगामध्ये साखर उद्योग, कापड उद्योग, तेल गिरण्या यांचा समावेश होतो.
- खनिज उत्पादनावर आधारित उद्योग : यामध्ये खाणीतून उत्पादित घटकावर आधारित उद्योग समाविष्ट आहेत. जसे की, लोहपोलाद उद्योग, खनिज तेलशुद्धीकरण, सिमेंट उद्योग यंत्रोद्योग यांचा समावेश होतो.
- वन उत्पादनावर आधारित उद्योग : वनातून उत्पादित वस्तूंवर प्रक्रिया करून मिळवलेल्या वस्तूंचा समावेश यामध्ये होतो. उदाहरणार्थ लाकूड कापण्याच्या गिरण्या, कागद कारखाने, आगपेट्यांचे कारखाने, फर्निचरनिर्मिती, औषधे, खेळांचे साहित्य, इ.
- प्राणिज उत्पादनावर आधारित उद्योग : प्राण्यांपासून मिळणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून अधिक उपभोगाची वस्तू तयार करण्यासाठी उभारलेले उद्योग. यामध्ये लोकरी कापडाच्या गिरण्या, कातडी उद्योग, रेशीम उद्योग, दुधापासून पदार्थ बनविणे यांचा समावेश होतो.
महाराष्ट्रात कापड गिरण्या मोठ्या प्रमाणात एकवटलेल्या आहेत. याची नेमकी कारणे कोणती? व त्या कुठे कुठे आहेत? या प्रश्नांचा उलगडा आपण करू.
कापड उद्योगधंद्याची उभारणी : सन १८१८ मध्ये हावडा जिल्ह्यात हुगळी नदीवर कोलकत्त्याजवळ ‘चुरसी’ येथे फोर्ट ग्लॉस्टर मिलची स्थापना होऊन भारतात पहिली कापड गिरणी उभारण्याचा मान बंगालला मिळाला होता. मुंबई येथे सन १८५१ मध्ये कावसजी नानाभाई दावर यांनी ‘बॉम्बे स्पिनिंग आणि विव्हिंग कंपनी लि.’ नावाची पहिली कापड गिरणी उभारली.
कापड उद्योगधंद्यांचे स्थानिकीकरण : कापड गिरण्यांचे स्थान हे कापूस उत्पादक प्रदेश आणि बाजारपेठा यावर अवलंबून असते. कापूस व तयार कापड पाठविण्यास येणारा वाहतुकीचा खर्च साधारण सारखाच असतो. कापसाच्या गाठी आणि त्याचप्रमाणे कापड सहजरीत्या उत्पादन खर्चात फारशी वाढ न होता कित्येक कि.मी. पाठविता येते, म्हणून वाहतुकीचा कमीतकमी खर्च येण्यासाठी कापड गिरण्यांचे स्थान कापसाचे उत्पादक प्रदेश आणि बाजारपेठ या असू शकतात.
कापसाचा नियमित पुरवठा आधुनिक काळात वाहतुकीच्या सोई चांगल्या उपलब्ध असल्याने पूर्वीच्या बाजारपेठेत असणारे महत्त्व कमी होत आहे. उलट, कच्च्या मालाचा नियमित पुरवठा ही बाब कापड गिरण्यांच्या बाबतीत महत्त्वाचा घटक होऊ लागल्याने कापूस उत्पादनाच्या प्रदेशात कापड गिरण्या निर्माण होत असतात. देशातील २४ टक्के चाक्या व ३७ टक्के माग महाराष्ट्रात आहेत. मुंबईला कापड गिरण्या उभारण्यास अनेक भौगोलिक व आर्थिक कारणे आहेत. त्यामुळे इथे कापड गिरण्या मोठ्या संख्येने आहेत.
मुंबईत कापड गिरण्यांच्या निर्मितीची कारणे :
- भौगोलिक स्थान
- दमट हवामान
- कच्चा माल : मुंबईच्या रेल्वे वाहतुकीमुळे स्वस्तात कापूस उपलब्ध.
- भांडवल : कापसाच्या निर्यातीमुळे उपलब्ध झालेला पैसा हा भांडवल म्हणून वापरला जातो.
- मजूर पुरवठा व तंत्रज्ञ : कोकणातील रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यांमधून मजुरांचा पुरवठा प्रथम झाला.
- ऊर्जा साधने : खोपोली, आंद्र व्हॅली आणि पश्चिम घाटात वीजनिर्मितीची केंद्रे उभारून कापड गिरण्यांना वीज पुरविण्यास सुरुवात झाली. कोयनेची वीज निर्माण झाल्याने तिचाही पुरवठा मुंबईच्या कापड गिरण्यांना झाला.
- वाहतूक : रेल्वेची उत्कृष्ट सोय होऊन देशातून अंतर्गत भागात कापड पाठविणे आणि त्याचप्रमाणे कच्चा माल पुरविणे शक्य झाले.
- बाजारपेठ : मुंबईच्या कापडास देशाची मोठी बाजारपेठ व जागतिक बाजारपेठ मोठ्या प्रमाणात खुली आहे.
हेही वाचा – UPSC-MPSC : भूमी उपयोजन म्हणजे काय? महाराष्ट्रातील भूमी उपयोजनेचे स्वरूप कोणते?
महाराष्ट्रात विदर्भ प्रदेश कापसासाठी प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे इंधनासाठी कोळसा उपलब्ध आहे. स्वस्त मजूर आणि बाजारपेठ वगैरे घटकांचा विचार करून विदर्भामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया हे पूर्वेकडील चार जिल्हे वगळता उरलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये कापड गिरण्या उभारलेल्या आहेत. विदर्भातील प्रमुख कापड गिरण्यांची केंद्रे अकोला, हिंगणघाट व पुलगाव (जि. वर्धा), बडनेरा व अचलपूर (जि. अमरावती) येथे आहेत. खानदेशातून वाहणाऱ्या तापीच्या नदीच्या खोऱ्यातील धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, चाळीसगाव व जळगाव या ठिकाणी कापड उद्योग आहे. मुंबईला भारताचे मँचेस्टर, तर कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीला ‘महाराष्ट्राचे मँचेस्टर’ म्हणतात.