सागर भस्मे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मागील लेखातून आपण भारतातील औषध निर्मिती उद्योगाबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण स्वयंचलित वाहन उद्योग व जहाजबांधणी क्षेत्र या उद्योगांबाबत सविस्तरपणे जाणून घेऊया.
स्वयंचलित वाहन उद्योग :
भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये स्वयंचलित वाहन उद्योग हा महत्त्वाची भूमिका बजावत आहे. विक्रीच्या दृष्टीने डिसेंबर २०२२ मध्ये भारताने स्वयंचलित वाहनांच्या बाजारपेठेमध्ये जपान आणि जर्मनी या देशांना मागे टाकून तिसरा क्रमांक पटकावला आहे. २०२१ मध्ये भारत हा प्रवासी मोटारींच्या उत्पादनामध्ये जगामध्ये चौथा तर दुचाकी आणि तीन चाकी वाहनांच्या उत्पादनांच्या बाबतीमध्ये भारत हा सर्वात मोठा उत्पादक देश होता. आर्थिक पाहणी २०२२-२३ नुसार स्वयंचलित वाहन उद्योग क्षेत्राचे महत्त्व आकडेवारीच्या वस्तूस्थितीवरून मोजण्यात येते. एकूण जीडीपीमध्ये या क्षेत्राचा वाटा हा ७.१ टक्के इतका आहे, तर वस्तूनिर्माण जीडीपीमध्ये ४९ टक्के इतका वाटा आहे. २०२१ च्या शेवटी या क्षेत्रामध्ये ३.७ कोटी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण झाला आहे.
हेही वाचा – UPSC-MPSC : भारतातील औषध निर्माण उद्योगाची विद्यमान परिस्थिती काय? त्यासाठी कोणत्या योजना राबवल्या जातात?
हरित ऊर्जेकडे वाटचाल करीत असताना स्वयंचलित वाहन उद्योग अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या बाजारपेठेची २०२२ ते २०३० दरम्यान ४९ टक्के या वार्षिक दराने चक्रवाढ पद्धतीने वाढ होण्याचा अंदाज असून २०३० मध्ये या वाहनांची वार्षिक १ कोटी वाहने इतकी विक्री होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २०३० पर्यंत विजेवरील वाहनांच्या उद्योगांमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे ५ कोटी रोजगार निर्माण होतील. या विकासाला हातभार लावण्याकरिता सरकारने अनेक पावले उचलली आहेत.
जहाजबांधणी क्षेत्र :
जहाजबांधणी हा उद्योग एक महत्त्वाचा उद्योग असून ऊर्जा सुरक्षा, राष्ट्रीय संरक्षण, अवजड अभियांत्रिकी उद्योग इत्यादी क्षेत्रांमध्ये या उद्योगाची भूमिका महत्त्वाची आहे. तसेच यामुळे उद्योग आणि सेवांच्या मागणीमध्ये देखील वाढ होते. जहाजबांधणी क्षेत्राचा ॲल्युमिनियम, पोलाद, विजेवर चालणारी यंत्रसामग्री आणि उपकरणे इत्यादी अनेक अग्रेसर उद्योगांशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दृढ संबंध असल्यामुळे आणि अर्थव्यवस्थेमधील पायाभूत सेवा आणि सुविधांच्या क्षेत्रावर हे क्षेत्र प्रचंड प्रमाणात अवलंबून असल्याने या क्षेत्रामध्ये ‘आत्मनिर्भर’ भारत अभियान मजबूत करण्याची क्षमता आहे.
जहाजबांधणी क्षेत्र हे इतर पूरक उद्योगांशी संबंधित असल्याने या क्षेत्राची संयुक्त उत्पादन परिसंस्था निर्माण करण्याची क्षमता आहे. जहाजबांधणीमध्ये शिपबोर्डचे, उपकरणांचे आणि व्यवस्थेचे उत्पादन करणारे उत्पादक मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे जवळपास ६५ टक्के एवढे मूल्यवर्धन करतात.
हेही वाचा – UPSC-MPSC : भारतात कोळसा उद्योगाची सुरुवात कधी झाली? त्यासाठी सरकारद्वारे कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या?
युद्धनौकांच्या बांधणीच्या संदर्भात भारतीय नौदलाने केलेल्या एका अध्ययनानुसार एकूण प्रकल्पीय खर्चाच्या ७५ टक्के भागाची भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पुनर्गुंतवणूक करण्यात येते. ही पुनर्गुंतवणूक कच्च्या मालाचा वापर, जहाजावर बसवलेली उपकरणे व व्यवस्थेचा विकास आणि मनुष्यबळाशी संबंधित इतर सेवा यांच्या माध्यमातून करण्यात येते. आंतरराष्ट्रीय जहाजबांधणी संख्याशास्त्रानुसार जहाजबांधणी क्षेत्राकरिता जर पुरोगामी सीमांत उपभोग आणि जीडीपी यांचे गुणोत्तर ०.४५ इतके घेतले तर गुंतवणूक ‘गुणक’ सुमारे १.८२ इतका असेल. वस्तूनिर्माण उपक्रमांमध्ये जहाजबांधणी व्यवसायाचा रोजगार गुणक सर्वात जास्त म्हणजेच ६.४८ इतका आहे. जहाज बांधणी क्षेत्राची दुर्गम, किनारी आणि ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्याची क्षमता आहे. भारतीय जहाज बांधणी उद्योगाच्या विकासामुळे भारतीय वाहतुकीचा खर्च वाचेल आणि परकीय चलनामध्ये बचत होईल, तसेच परिणामी चालू खात्यावरील तूट कमी होईल, अशी अपेक्षा आहे.