सागर भस्मे
मागील लेखातून आपण बिगरबँक वित्तीय संस्था म्हणजे काय? त्या कशा प्रकारे कार्य करतात; तसेच रिझर्व्ह बँक या संस्थांचे नियमन कशा प्रकारे करते, याबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण बँका आणि बिगरबँक वित्तीय संस्था यांच्यातील फरक, बिगरबँक वित्तीय संस्थांचे वर्गीकरण, बिगरबँक वित्तीय संस्थांमध्ये ठेवींकरिता काही निर्बंध असतात का? तसेच सहकारी ते सहकारी बिगरबँक कंपनी म्हणजे काय? याबाबत जाणून घेऊ या.
हेही वाचा- UPSC-MPSC : ‘एक्झिम बँक’ काय आहे? ती स्थापन करण्यामागचा उद्देश काय होता?
बँका आणि बिगरबँक वित्तीय संस्था यांच्यामध्ये फरक काय?
बँका आणि बिगरबँक वित्तीय संस्था या दोन्ही जवळजवळ सारख्याच जरी दिसत असल्या तरी त्यांच्यात काही प्रमाणात फरक आहेत, ते पुढीलप्रमाणे :
- बँका या नाणेबाजाराचा एक अविभाज्य घटक आहेत; तर बिगरबँक वित्तीय संस्था या भांडवली बाजाराचा भाग आहेत.
- बँका या आर्थिक समावेशनाकरिता महत्त्वाचे साधन म्हणून कार्यरत असतात. तर बिगरबँक वित्तीय संस्था हे भांडवलनिर्मिती करून आर्थिक वाढ करण्याकरिता महत्त्वाचे साधन आहे.
- बँकांची बँकिंग नियमन कायदा, १९४९ अन्वये बँक म्हणून नोंद करण्यात आलेली असते. परंतु, बिगरबँक वित्तीय संस्थांना बँकिंग नियमन कायदा, १९४९ हा लागू होत नाही. बिगरबँक वित्तीय संस्थांचे कामकाज हे बँकिंग नियमन कायदा, १९४९ अन्वये केले जात नसून प्रामुख्याने रिझर्व्ह बँक कायदा, १९३४ या कायद्यान्वये नियंत्रित केले जाते. रिझर्व्ह बँक या कायद्यानुसार नियम तयार करून नियंत्रण ठेवत असते.
- बँक म्हटले की, आपण त्यामध्ये सर्वच प्रकारच्या ठेवी ठेवू शकतो. परंतु, बिगरबँक वित्तीय संस्थांमध्ये आपण मागणी ठेवी आणि बचत ठेवी ठेवू शकत नाही. त्यामध्ये आपण केवळ मुदत ठेवीच ठेवू शकतो.
- बँकांचे मुख्य उद्दिष्ट ठेवी स्वीकारणे, ग्राहकांची देणी भागविणे, कर्जे देणे, तसेच लोकांपर्यंत बँक सेवा पोहोचविणे, असे असते. परंतु, बिगरबँक वित्तीय संस्थांचे उद्दिष्ट हे मुदत ठेवी स्वीकारणे, कर्जे देणे, भांडवलनिर्मिती करणे व गुंतवणूक करणे, अशा प्रकारचे असते.
- बँका या देणी व निरसन यंत्रणेचा भाग म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडतात. तसेच बँका या स्वतःला आदेशित चेक प्रस्तुत करू शकतात. परंतु बिगरबँक वित्तीय संस्था या देणी आणि निरसन यंत्रणेचा भाग नसून, त्या स्वतःला आदेशित चेक प्रस्तुत करू शकत नाहीत.
- बँकांमध्ये ठेवीदारांच्या ठेवींना विम्याचे संरक्षण असते; परंतु बिगरबँक वित्तीय संस्थांमधील ठेवींना कुठल्याही प्रकारचे विमा संरक्षण प्रदान केलेले नसते.
- बँकांचे ठेवी आणि कर्ज यांवरील व्याजदरांचे प्रमाण बिगरबँक वित्तीय संस्थांच्या तुलनेत कमी असते. बिगरबँक वित्तीय संस्थांचे ठेवी आणि कर्ज यांवरील व्याजदर बँकांच्या व्याजदरांपेक्षा दोन ते तीन टक्के जास्त असतात.
बिगरबँक वित्तीय संस्थांचे वर्गीकरण :
रिझर्व्ह बँकेकडे नोंदणीकृत बिगरबँक वित्तीय संस्थांच्या देयतेच्या संरचनेवर आधारित त्यांची प्रमुख दोन गटांमध्ये विभागणी केली जाते. १) ठेवी स्वीकारणाऱ्या बिगरबँक वित्तीय संस्था आणि २) ठेवी न स्वीकारणार्या बिगरबँक वित्तीय संस्था हे ते दोन गट आहेत. त्यामधील ठेवी न स्वीकारण्याऱ्या काही बँकांचे वर्गीकरण अनेक प्रकारांमध्ये केले जाते. उदाहरणार्थ- असेट्स फायनान्स कंपनी, कर्ज कंपनी किंवा लघु वित्तसंस्था. यापैकी असेट्स फायनान्स कंपनी ही ट्रॅक्टर, मोटार गाड्या यांसारखी वाहनसंपत्ती खरेदी करण्याकरिता कर्जे प्रदान करते. तर कर्ज कंपनी या असेट्स फायनान्स कंपन्या ज्यांकरीता कर्जे देतात, अशा संपत्ती वगळता इतर बाबींकरिता कर्जे देतात. त्याशिवाय लघु वित्तसंस्था या लघुउद्योग, ग्रामीण व शहरी स्वयंसहायता गट, अग्रक्रम गट यांना सूक्ष्म वित्त साह्य करतात.
बिगरबँक वित्तीय संस्थांमध्ये ठेवींकरिता काही निर्बंध असतात का?
ठेवी स्वीकारणाऱ्या बिगरबँक वित्तीय संस्थांवर रिझर्व्ह बँकेने महत्त्वाच्या ठेवी ठेवण्यासंदर्भात काही बंधने टाकली आहेत. जसे की रिझर्व्ह बँकेने या संस्थांना किमान १२ महिने आणि कमाल ६० महिन्यांच्या कालावधीसाठी ठेवी स्वीकारणे किंवा नूतनीकरण करण्याची अनुमती दिलेली आहे. आपण आधीच बघितले आहे की, या बँकांना फक्त मुदत ठेवी स्वीकारता येतात; बचत आणि चालू खात्यांवरील मागणी ठेवी स्वीकारता येत नाहीत. त्यांना ठेवींवर रिझर्व्ह बँकेद्वारे सूचित केलेल्या कमाल व्याजदरांच्या पातळीपेक्षा अधिक व्याजदर देता येत नाहीत. तसे केल्यास रिझर्व्ह बँक त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू शकते. अशा ठेवींना बिगरबँक वित्तीय संस्था कोणतेही विमा संरक्षण प्रदान करीत नाहीत. बँकांप्रमाणे रिझर्व्ह बँक या परतफेडीची हमी बिगरबँक वित्तीय संस्थेच्या बाबतीमध्ये देत नाही.
हेही वाचा – UPSC-MPSC : बिगरबँक वित्तीय संस्था म्हणजे काय? त्या कशा प्रकारे कार्य करतात?
सहकारी ते सहकारी बिगरबँक कंपनी म्हणजे काय?
वित्तीय समावेशकतेचा प्रसार व्हावा, वित्त व्यवहारांमध्ये सुलभता यावी तसेच वित्त यंत्रणेमध्ये व्यापक कृतिशीलता आणण्याच्या उद्देशाने रिझर्व्ह बँकेने अशा नव्या प्रकारच्या बिगरबँक वित्तीय संस्था उभारण्यासाठी परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. सहकारी बँक ते सहकारी बिगरबँक वित्तीय संस्थांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांद्वारे धनको आणि ऋणको यांना कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. धनको आणि ऋणको यांच्यामधील परस्परकार्यामध्ये मध्यस्थी करून योग्य धनको व योग्य ऋणको यांची सांगड घालून देण्यात या संस्था मदत करतात. त्याशिवाय कर्जफेड संस्थांच्या स्वरूपाची पडताळणी, तसेच पतमूल्यांकन अशा अनेक पूरक सेवासुद्धा या नव्या संस्थेद्वारे पुरविल्या जातात.
भारतीय वित्तीय प्रणालीमधील बिगरबँक वित्तीय संस्थांचे महत्त्व वाढत आहे. बिगरबँक वित्तीय संस्थांचे वाढत्या महत्त्वाचे प्रतिबिंब स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या तुलनेमध्ये बिगरबँक वित्तीय संस्थांच्या सातत्याने वाढत असलेल्या विश्वासार्हतेमध्ये पडते आहे. एकूण बघायचे झाल्यास अनुसूचित व्यापारी बँकांच्या कर्ज देण्याच्या तुलनेमध्ये बिगरबँक वित्तीय संस्थांचे कर्जे देण्याचे प्रमाण हे जास्त असल्याचे दिसून येत आहे. आर्थिक सर्वेक्षणाच्या २०२२-२३ च्या आकडेवारीनुसार सप्टेंबर २०२२ पर्यंत बिगरबँक वित्तीय संस्थांनी उद्योग, किरकोळ विक्री, सेवा व कृषी अशा विविध क्षेत्रांना एकूण ३१.५ लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे.