सागर भस्मे
मागील लेखातून आपण चलनवाढीचा दर मोजण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या घाऊक किंमत निर्देशांक आणि ग्राहक किंमत निर्देशांक याबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण चलनवाढीशी संबंधित एंजेलचा नियम, ‘से’चा नियम, तसेच जिफेन वस्तू म्हणजे काय? याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊ या …
हेही वाचा – UPSC-MPSC : अर्थव्यवस्था : चलनवाढ कमी करण्याचे उपाय कोणते?
एंजेलचा नियम (Engels Law) :
जर्मन अर्थतज्ज्ञ अर्नेस्ट एंजेल यांनी १८५७ मध्ये उत्पन्न व उपभोग खर्चातील संबंध दर्शवणारा नियम म्हणजेच ‘एंजेलचा नियम’ मांडला. या नियमानुसार जसजसे कौटुंबिक उत्पन्न वाढत जाते, तसतशी प्राथमिक वस्तूंवरील म्हणजेच अन्नवस्तूंवरील खर्चांची टक्केवारीही कमी कमी होत असते. या नियमालाच ‘एंजेलचा नियम’ म्हणतात. उदा. एखाद्या मजुराला कामावर रोज २०० रुपये मजुरी मिळत असेल, तर त्यापैकी जवळपास ५० टक्के पैसे त्याला अन्नावर खर्च करावे लागतात. तेच आपण एका नोकरदार व्यक्तीचा विचार केला असता, जर तो पाच हजार रुपये रोज कमावत असेल, तर त्या व्यक्तीने महाग जेवण जरी घेण्याचा विचार केला तरी ते त्याच्या उत्पन्नाच्या तुलनेमध्ये कमीच असेल.
या उदाहरणावरून एक बाब स्पष्ट होते, ती म्हणजे उत्पन्न वाढले की, अन्नावरील खर्चाची रक्कमही वाढते. मात्र, त्या उत्पन्नाच्या तुलनेत त्याची टक्केवारीही कमी होत जाते. अन्नघटक याव्यतिरिक्त घर, तसेच कपड्यांवरील खर्च हा समान प्रमाणात राहत असतो आणि शिक्षण, आरोग्य, तसेच करमणुकीवर होणारा खर्च हा मात्र वाढत असतो.
जिफेन वस्तू म्हणजे काय?
हलक्या, निकृष्ट व कनिष्ठ दर्जाच्या वस्तू म्हणजे ‘जिफेन वस्तू’ होय. जिफेन वस्तूंबाबतची संकल्पना ब्रिटिश संख्याशास्त्रज्ञ सर रॉबर्ट जिफेन यांनी प्रथम मांडली. त्यांच्या मते, ज्या वस्तूंना मागणी व पुरवठ्याचा नियम लागू होत नाही, अशा काही वस्तूंना ‘जिफेन वस्तू’ म्हटले जाते. सहसा आपण बघतो की, वस्तू जेव्हा महाग होतात, तेव्हा त्यांची मागणीही कमी होते. परंतु, अशाही काही वस्तू आहेत, की ज्या महाग झाल्यावरही त्यांची मागणी कमी होण्याऐवजी वाढत जाते.
जिफेन वस्तूंमध्ये सहसा दुय्यम वस्तूंचा समावेश होतो. उदा. कांदा हा महाग होऊ लागला की, लोक कांद्याची जास्त प्रमाणात खरेदी करतात आणि तो साठवून ठेवतात. कारण- त्यांना भीती असते की, कांदा हा अधिक महाग होऊ शकतो. इथे आपल्याला लक्षात येते की, कांदा महाग होत असला तरी त्याची मागणी मात्र वाढत आहे. कांद्याला ‘जिफेन वस्तू’ समजले जाते.
हेही वाचा – UPSC-MPSC : अर्थशास्त्र : चलनवाढीचा अर्थव्यवस्थेवर नेमका कसा परिणाम होतो?
‘से’चा नियम (Say’s Law) :
फ्रेंच अर्थतज्ज्ञ जिन बॅप्टिस्ट से यांच्याद्वारे मांडण्यात आलेल्या बाजारविषयक नियमाला ‘से’चा नियम असे म्हणतात. त्यांच्या मते- अर्थव्यवस्थेतील एकूण उत्पादन आणि एकूण मागणी ही समतुल्य प्रमाणात असते. त्यांच्या म्हणण्यानुसार जेवढी मागणी असेल तेवढेच उत्पादन होऊ शकते; परंतु काही परिस्थितीमध्ये हा नियम लागू होत नाही. जेव्हा मंदीची परिस्थिती उदभवते तेव्हा बाजारामध्ये उत्पादन उपलब्ध असते; परंतु तेवढ्या प्रमाणात त्याला मागणी नसते. मागणी अत्यंत कमी झालेली असते.