राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एक वर्षाच्या कालावधीत देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांचा प्रवाह होय. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना वस्तू व सेवा या दोन्ही घटकांचा विचार केला जातो. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या उत्पादन, उत्पन्न व खर्च अशा साधारणतः तीन पद्धती अस्तित्वात आहेत. त्या पद्धती पुढीलप्रमाणे :

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१) उत्पादन पद्धत :

उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका आर्थिक वर्षात देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य होय. उत्पादन पद्धत ही मूल्यवर्धित संकल्पनेवर आधारलेली आहे. त्यामध्ये वस्तू व सेवांचे मूल्यवर्धन मोजले जाते. कारण- जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न हे उत्पादन पद्धतीने मोजले जाते तेव्हा ते मोजताना आंतरसंक्रामक वस्तूंचे मूल्य वजा केले जाते. म्हणजेच फक्त अंतिम वस्तू व सेवांचेच मूल्य गृहीत धरले जाते. उदाहरणार्थ- एखादा केक बनवत असताना त्याला विविध साधनसामग्रीची आवश्यकता असते; परंतु लागणाऱ्या त्या प्रत्येक साधनसामग्रीच्या किमतीचा विचार न करता, केक तयार झाल्यानंतर त्याचे अंतिम मूल्य विचारात घेतले जाते. म्हणजेच सर्व मूल्यवर्धितांची बेरीज केली जाते. उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न हे पुढील सूत्राद्वारे मोजले जाते:

  • GDP= ( वस्तूंचे मूल्य + सेवांचे मूल्य ) – आंतरसंक्रामक वापराचे मूल्य.

उत्पादन पद्धतीने काढलेले राष्ट्रीय उत्पन्न हे बाजारभाव लक्षात घेऊन मोजलेले असते. उत्पादन पद्धतीमध्ये वस्तू व सेवा या दोघांचेही मूल्य मोजले जात असल्यामुळे ही पद्धत अर्थव्यवस्थेतील क्षेत्रांचे तुलनात्मक महत्त्व सांगते.

हेही वाचा – UPSC-MPSC : अर्थशास्त्र : एमएसपी दरवाढ आणि परिणाम

२) उत्पन्न पद्धत :

उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका आर्थिक वर्षात देशांतर्गत संस्थांनी कमावलेले उत्पन्न होय. या पद्धतीमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप हे उत्पादनाच्या प्रत्येक घटकाच्या मालकांना प्राप्त होणाऱ्या घटक उत्पन्नाच्या आधारावर केले जाते.‌ म्हणजे एखाद्या बेकरीमध्ये एखाद्या वस्तूचे उत्पादन होत असेल तेव्हा तिथे ज्या घटकांचा समावेश उत्पादन प्रक्रियेमध्ये होतो, त्यांच्या मालकांना घटक उत्पन्न प्राप्त होत असते. जसे की, कामगारांना खंड, मजुरी, व्याज व नफा प्राप्त होत असतो. त्यामध्ये केवळ कमावलेलेच उत्पन्न विचारात घेतले जाते; न कमावता मिळालेले उत्पन्न (उदा.- बेरोजगार भत्ता) विचारात घेतले जात नाही. घटक उत्पन्न हे घटक किमती लक्षात घेऊन मोजलेले असते. सेवा क्षेत्राचे उत्पन्न मोजताना उत्पन्न पद्धत वापरणे अधिक सुलभ ठरते. उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याकरिता पुढील सूत्राचा वापर केला जातो.

  • GDP = कामगारांना भरपाई + भाडे + व्याज + नफा + स्वयंरोजगारीचे मिश्र उत्पन्न

३) खर्च पद्धत :

खर्च पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका आर्थिक वर्षात देशांतर्गत कुटुंब संस्था, उद्योग संस्था व सरकार यांनी केलेला खर्च आणि निव्वळ निर्यात मूल्य होय. खर्च करणे म्हणजेच एखादी वस्तू किंवा सेवेची खरेदी करणे. ती खरेदी एक तर उपभोगासाठी असू शकते किंवा गुंतवणुकीसाठी असू शकते. म्हणजेच या पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करताना उपभोग खर्च व गुंतवणूक खर्च यांचा विचार केला जातो. उपभोग खर्च साधारणतः खासगी व सरकारी अशा दोन प्रकारचा असतो. तसेच गुंतवणूक हीसुद्धा दोन प्रकारची असते. एक तर गुंतवणूक ही देशांतर्गत असू शकते किंवा परदेशातील असू शकते. खर्च पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याकरिता पुढील सूत्राचा वापर केला जातो.

  • GDP = खासगी अंतिम उपभोग खर्च + सरकारी अंतिम उपभोग खर्च + स्थूल देशांतर्गत भांडवल निर्मिती + निव्वळ निर्यात

खर्च पद्धतीने मोजलेले उत्पन्न हे त्रुटीविरहित असते. कारण- ते उर्वरित जगाचा प्रभाव दर्शवीत असते.

हेही वाचा – UPSC-MPSC : अर्थशास्त्र : वित्तीय तुटीचा अर्थभरणा

भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याकरिता राष्ट्रीय उत्पन्न समितीने सुचविल्याप्रमाणे उत्पादन व उत्पन्न पद्धतीचा अवलंब केला जात होता; खर्च पद्धतीचा अवलंब केला जात नव्हता. परंतु, जानेवारी २०१५ पासून CSO ने खर्च पद्धतीने मोजलेले आकडेदेखील प्रकाशित करण्यास सुरुवात केली आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc indian economy methods of measuring national income in india part 2 mpup spb
Show comments