सागर भस्मे
मागील लेखातून आपण पतनिर्मिती संकल्पना तसेच चलनपुरवठा व चलनपुरवठा मापन पद्धती याबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण पायाभूत पैसा, संचित पैसा, उच्च क्षमतेचा पैसा, संकुचित पैसा आणि विस्तृत पैसा या सर्व संकल्पना सविस्तरपणे जाणून घेऊया.
पायाभूत पैसा
आपण मागील लेखामध्ये चलनपुरवठा मापनाच्या पद्धतींचा अभ्यास केला. त्यामध्ये आपण M0, M1, M2 आणि M3 या संकल्पना बघितल्या. त्यामधील M0 ला पायाभूत पैसा असे म्हटले जाते, तर यालाच पायाभूत पैसा का म्हणावे? याचे कारण म्हणजे M0 मध्ये रिझर्व बँकेतील बँकांच्या ठेवी, बँकांमधील रोख साठा तसेच लोकांजवळील चलनी नोटा व नाणी, रिझर्व बँकेतील इतर ठेवी यांचा समावेश होतो. इथूनच समोरील पैशाच्या पुरवठ्याची सुरुवात होते. इथूनच M1, M2 आणि M3 निर्माण होतो, म्हणून M0 ला पायाभूत पैसा असे म्हटले जाते. M1, M2 आणि M3 यांना आपण पैशाचा पुरवठा असे म्हणतो.
हेही वाचा – UPSC-MPSC : अर्थशास्त्र : चलन पुरवठा भाग – १
येथे एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे पायाभूत पैसा आणि पैशाचा पुरवठा या संकल्पना निरनिराळ्या आहेत की एकच? तर या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. कारण पायाभूत पैसा (M0) पासूनच M1 , M2 आणि M3 हा पैशाचा पुरवठा निर्माण होतो. यामध्ये जसं जसं आपण M0 कडून M3 कडे जातो, तसे आपल्या लक्षात येते की, यामधील तरलता ही कमी कमी होत जाते. तरलता म्हणजेच पैशात रूपांतर होण्याची क्षमता. तरलता ही MO मध्ये सर्वाधिक असते, तर M3 मध्ये ती सर्वात कमी असते. MO प्रत्यक्ष पैसाच असतो. त्यामुळे तरलतेचा प्रश्नच उद्भवत नाही. यामध्ये M1 चे पैशांमध्ये रूपांतर करणे हेसुद्धा इतरांच्या तुलनेमध्ये सोपे असते. तेच आपण जर M3 चा विचार केला तर त्याचे पैशांमध्ये रूपांतर करणे हे त्या प्रमाणात कठीण असते. असे का? तर बँकांमध्ये आपण पैसे ठेवी म्हणून ठेवलेले असतात आणि बँकांनी यामधून पतपैसा निर्माण केलेला असतो, त्यामुळे त्या पतपैशांमधून परत पैशांमध्ये रूपांतर करणे हे सहजासहजी शक्य होत नाही. त्यामुळे M3 हा सर्वाधिक कमी तरल असतो.
संचित पैसा
MO ला संचित पैसा असेसुद्धा म्हटले जाते. त्याचे कारण म्हणजे MO या संकल्पनेमध्ये साठा, ठेवी, चलन असे शब्द आपल्याला बघायला मिळतात आणि या पैशाचे नियमन हे रिझर्व बँकेकडून केले जाते.
उच्च क्षमतेचा पैसा
उच्च क्षमतेचा पैसा म्हणजे काय? तर यामध्येसुद्धा M0 चा समावेश होतो. M0 लाच उच्च क्षमतेचा पैसा असेसुद्धा म्हटले जाते. कारण M0 हा पायाभूत पैसा आहे. या पायाभूत पैशामुळेच पैशांचा पुरवठा निर्माण होतो. या पैशांच्या पुरवठ्यामध्ये वाढ होऊन समोर त्याचे पत पैशांमध्ये रूपांतर होऊन अंतिमतः पतनिर्मिती करणे हे शक्य असते. M0 च्या मागणी आणि पुरवठ्यावरूनच पैशाचा पुरवठा हा ठरत असतो.
संकुचित पैसा
संकुचित पैसा याचा आपण शब्दशः अर्थ घ्यायचा झाल्यास संकुचित म्हणजे ज्याची व्याप्ती ही कमी आहे. म्हणजेच भविष्यात हा पैसा दीर्घकाळ टिकणारा नसतो. परंतु, नेमके कुठल्या पैशाला संकुचित पैसा म्हणायचे? तर M1 ला संकुचित पैसा असे म्हटले जाते. कारण यामध्ये चलनी नोटा व नाण्यांसोबतच बँकांकडून केवळ मागणी ठेवी मोजल्या जातात आणि आपण बघितले आहे, की M1 यामध्ये मागणी ठेवी असल्यामुळे यामधून मोठ्या प्रमाणात पतनिर्मिती करणे हे शक्य नसते. कारण हा पैसा अधिक कालावधीकरिता बँकांकडे राहत नसतो आणि मागता क्षणीच खातेदाराला तो पैसा बँकांद्वारे परत करावा लागतो. त्यामुळे पतनिर्मिती करणे हे जवळपास अशक्यच असते. या ठेवीमध्ये पतनिर्मिती क्षमता तुलनेने खूप कमी असते. त्यामुळेच M1 याला संकुचित पैसा असे म्हटले जाते.
हेही वाचा – UPSC-MPSC : अर्थशास्त्र : पैसा आणि चलन भाग- ३
विस्तृत पैसा
आपण वर संकुचित पैसा ही संकल्पना बघितली. संकुचित म्हणजेच त्याची व्याप्ती ही मर्यादित असते आणि विस्तृत म्हणजे अमर्याद व्याप्ती. यावरून आपल्या लक्षात येते, हा पैसा जर बँकेमध्ये अधिक कालावधीसाठी ठेवला जात असेल, तर यामधून मोठ्या प्रमाणात पतनिर्मिती होऊ शकते. त्यामुळे त्याला विस्तृत पैसा असे म्हटले जाते; तर यामध्ये M3 चा समावेश होतो. M3 ला विस्तृत पैसा असे म्हणतात. M3 या संकल्पनेमध्ये जवळपास बँकांकडच्या सर्वच ठेवी मोजल्या जातात, त्यामुळेच पतनिर्मिती मोठ्या प्रमाणात होते. म्हणूनच याला विस्तृत पैसा असे म्हणतात.
या सर्व बाबींवरून असा निष्कर्ष निघतो की, पायाभूत पैसा म्हणजेच M0 हा वाढला की आपोआप लोकांच्या हातातील पैसा वाढतो. लोकांच्या हातातील पैसा वाढला की त्या पैशांमधून काही पैसा हा ते बँकेमध्ये ठेवी म्हणून ठेवतात आणि त्या ठेवींमधून बँका या पतनिर्मिती करतात. म्हणजेच याचा अर्थ असा की, पायाभूत पैसा वाढला की पैशाच्या पुरवठ्यामध्ये वाढ होते.