मागील लेखातून आपण जीडीपी (GDP), जीएनपी (GNP) म्हणजे काय याबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण आपण मौद्रिक जीडीपी आणि वास्तविक जीडीपी म्हणजे काय? दोन्हीमध्ये नेमका फरक काय आहे? आणि जीडीपी अवस्फितीक ही संकल्पना नेमकी काय आहे? हे जाणून घेऊ या ….
हेही वाचा – UPSC-MPSC : अर्थशास्त्र : राष्ट्रीय उत्पन्न भाग-३
मौद्रिक जीडीपी :
मौद्रिक जीडीपी म्हणजेच बाजार किमतीला मोजलेला जीडीपी; तर वास्तविक जीडीपी म्हणजेच स्थिर किमतींना मोजलेला जीडीपी होय. जीडीपीमध्ये वाढ होण्याची दोन मुख्य कारणे आहेत आणि ती म्हणजे वस्तू व सेवांचे अधिक उत्पादन वाढल्यामुळे झालेली वाढ, तसेच वस्तू व सेवांच्या किमती वाढल्यामुळे झालेली वाढ. आपण वर बघितल्याप्रमाणे मौद्रिक जीडीपी म्हणजे बाजार किमतीला मोजलेला जीडीपी होय. हे आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊ या. समजा- दोन लगतच्या वर्षांचा विचार केला, तर मागील वर्षातील किंमतवाढ ही चालू वर्षाच्या तुलनेत कमी प्रमाणात असल्यास साहजिकच चालू वर्षाचा जीडीपी हा मागील वर्षाच्या जीडीपीपेक्षा जास्त असेल म्हणजेच येथे असे स्पष्ट होते की, येथे फक्त किंमतवाढ झाल्यामुळे जीडीपी वाढत आहे; परंतु प्रत्यक्षात इथे उत्पादनामध्ये वाढ झालेली आढळत नाही. म्हणजेच केवळ किंमतवाढीमुळे जर जीडीपी वाढत असेल, तर ती वाढ केवळ आभासी स्वरूपाची असते. मौद्रिक जीडीपीद्वारे खरी आर्थिक वृद्धी आपल्याला समजू शकत नाही.
वास्तविक जीडीपी :
दुसरा प्रकार म्हणजे वास्तविक जीडीपी. हा स्थिर किमतींना मोजला जातो. त्याकरिता आधारभूत वर्षातील किमतीच्या आकडेवारीचा विचार करण्यात येतो. त्यावरून हा जीडीपी काढला जातो. आधारभूत वर्ष म्हणजे असे वर्ष जे किमतीच्या दृष्टीने एक सामान्य वर्ष असते. म्हणजेच त्या वर्षामध्ये वस्तू व सेवांच्या किमतींमध्ये मोठी चढ-उतार झालेली नसते. असे वर्ष हे आधारभूत वर्ष म्हणून गृहीत धरले जाते. जर जीडीपी स्थिर किमतींना मोजलेला असेल, तर त्यामध्ये आपल्याला वास्तविक वस्तू व सेवांच्या उत्पादनात वाढ झाल्याने जीडीपी वाढ झाली हे समजू शकते. म्हणून वास्तविक जीडीपी हा खऱ्या आर्थिक वृद्धीचा सूचक असतो. देशात कोणत्याही वर्षाचा प्रथम चालू किमतींना जीडीपी मोजला जातो आणि त्यानंतर त्याचे रूपांतर स्थिर किमतींना मोजलेल्या जीडीपीमध्ये केले जाते.
हेही वाचा – UPSC-MPSC : अर्थशास्त्र : राष्ट्रीय उत्पन्न भाग- २
जीडीपी अवस्फितीक :
आपण वर बघितल्याप्रमाणे प्रत्येक वर्षाकरिता चालू किमतींना आणि स्थिर किमतींना जीडीपी मोजला जातो. आपल्याला हे माहिती आहे की, मौद्रिक जीडीपी हा किंमतवाढीमुळे वाढलेला जीडीपी असतो. तर, नेमकी किती प्रमाणात किंमतवाढ झालेली आहे, याचे प्रमाण आपल्याला जाणून घ्यायचे असल्यास त्याकरिता जीडीपी अवस्फितीक ही संकल्पना महत्त्वपूर्ण ठरते. जीडीपी अवस्फितीक या संकल्पनेवरून आपल्याला चालू वर्षातील किमती या आधारभूत वर्षातील किमतींच्या तुलनेत किती प्रमाणात वाढलेल्या आहेत किंवा घट किती प्रमाणात झाली आहे, याची कल्पना येते. जीडीपी अवस्फितीक म्हणजेच मौद्रिक जीडीपी आणि वास्तविक जीडीपी यांचा भागाकार होय.
- जीडीपी अवस्फितीक = मौद्रिक जीडीपी ÷ वास्तविक जीडीपी
जीडीपी अवस्फितीक हे किंमतवाढ /घट मोजण्याचे महत्त्वाचे साधन आहे . यामध्ये जीडीपीमध्ये झालेली वाढ/घट मोजली जात नाही; तर फक्त किमतींमध्ये झालेली वाढ/घट मोजली जाते.