सागर भस्मे
मागील लेखातून आपण पायाभूत सुविधा ही संकल्पना, पायाभूत सुविधेचे महत्त्व, या सुविधांची ऐतिहासिक पार्श्वभूमी, भारतातील पायाभूत सुविधांची अधिकृत विचारधारा याबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण पायाभूत सुविधांचे वर्गीकरण, पायाभूत सुविधांची अर्थव्यवस्थेमधील भूमिका तसेच भारतातील पायाभूत सुविधा विकासातील उणिवा इत्यादींबाबत जाणून घेऊया.
पायाभूत सुविधांचे वर्गीकरण :
एखाद्या देशांमध्ये आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विकासासाठी जे आवश्यक मूलभूत घटक जबाबदार असतात, त्यांचा समावेश हा पायाभूत क्षेत्रामध्ये करण्यात येतो. पायाभूत सुविधांचे वर्गीकरण हे मुख्यतः दोन गटांमध्ये करता येऊ शकते. यामध्ये पहिला गट म्हणजे आर्थिक पायाभूत सुविधा व दुसरा गट म्हणजे सामाजिक पायाभूत सुविधा.
हेही वाचा – UPSC-MPSC : पायाभूत सुविधा म्हणजे काय? या सुविधा अत्यंत महत्त्वाच्या का असतात?
आर्थिक पायाभूत सुविधा :
साधारणतः आर्थिक पायाभूत सुविधा या उत्पादन व वितरणाशी संबंधित सुविधा असतात. आर्थिक सुविधांमध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित सुविधांचा समावेश होतो. यामध्ये कृषी उत्पादन, उद्योग उत्पादन व वितरणाशी संबंधित सेवा व सुविधा यांना आर्थिक पायाभूत सुविधा असे म्हटले जाते. या सुविधांमध्ये वाहतूक सुविधा म्हणजेच रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग, वायू मार्ग, वित्तीय सुविधा तसेच ऊर्जा व दळणवळण सुविधा यामध्ये पोस्ट, टेलिफोन, रेडिओ, टीव्ही, इंटरनेट इत्यादी सेवांचा समावेश आर्थिक पायाभूत सुविधांमध्ये होतो. आर्थिक पायाभूत सुविधा या अर्थव्यवस्थेला गतिमान करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. या सुविधा अर्थव्यवस्थेला आतून आणि थेट गतिमान करतात. तसेच या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे आर्थिक स्त्रोतांचा विकासदेखील होतो.
सामाजिक पायाभूत सुविधा :
आपण आर्थिक पायाभूत सुविधा बघितल्या, या सुविधा उत्पादन व वितरणाशी थेट संबंधित असतात. मात्र, सामाजिक पायाभूत सुविधा या उत्पादन व वितरण यंत्रणेला बाहेरून योगदान देणाऱ्या सेवा व सुविधा यांना सामाजिक पायाभूत सुविधा असे म्हटले जाते. या सुविधा संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित नसून मुख्यतः या व्यक्तीशी संबंधित असतात. सामाजिक पायाभूत सुविधांमध्ये दळणवळण; यामध्ये पोस्ट, टेलिफोन, रेडिओ, टीव्ही, इंटरनेट तसेच मूलभूत सुविधांचा म्हणजेच अन्न, पाणी, निवारा, इंधन, शिक्षण, आरोग्य अशा सेवा-सुविधांचा समावेश यामध्ये होतो. येथे एक महत्त्वाची बाब लक्षात घेणे गरजेचे आहे, ती म्हणजे दळणवळण सुविधा ही आर्थिक तसेच सामाजिक अशा दोन्ही प्रकारच्या पायाभूत सुविधांमध्ये गणल्या जातात. सामाजिक पायाभूत सुविधा या अर्थव्यवस्थेला थेट गतिमान न करता बाहेरून आणि अप्रत्यक्ष गतिमान करतात. सामाजिक सुविधांमुळे आर्थिक स्त्रोतांचा विकास न होता मानवी स्त्रोतांचा विकास होतो.
पायाभूत सुविधांची अर्थव्यवस्थेकरिता गरज आणि त्यांचे महत्त्व :
आपण आधीच्या लेखामध्येदेखील बघितले आहे की, पायाभूत सुविधांना अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता आपण प्रत्यक्षात अर्थव्यवस्थेमध्ये या सुविधांचा कसा परिणाम होतो हे बघण्याचा प्रयत्न करूया.
कृषी विकास : कृषी क्षेत्राचा विकास होण्याकरिता पायाभूत सुविधांचा विकास होणे गरजेचे आहे. कारण रस्त्यांमुळे शेती, गाव आणि शहरे हे एकमेकांना जोडले जातात. सामान्यतः कृषी माल हा शेतीमधून गावागावातून शहर असा प्रवास करण्याकरिता योग्य पायाभूत सुविधा असणे अत्यंत गरजेचे आहे. वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची मागणी पूर्ण करण्याकरिता तसेच उत्पादित कृषी माल हा पोहोचवण्यासाठी बाजारपेठेशी संलग्न राहण्याकरिता तसेच वित्त सेवा, साठवणूक, पणन अशा प्रत्येक ठिकाणीच वाहतुकीची अत्यंत गरज लागते. तसेच काही नाशवंत कृषी माल म्हणजे फुले, फळे अशा वस्तूंच्या निर्यातीकरिता जलद वाहतूक सेवेची गरज असते. त्याकरिता कृषी क्षेत्राचा विकास घडून यायचा असेल तर पायाभूत सुविधा या महत्त्वाची भूमिका बजावतात.
उद्योग क्षेत्र विकास : उद्योग क्षेत्रामध्ये तर पायाभूत सुविधांचा विकास होणे ही अत्यंत गरजेची बाब आहे. उद्योगासाठी दळणवळण तसेच वाहतुकीची साधने या अत्यावश्यक बाबी असतात. तसेच ऊर्जा साधनांचीदेखील या उद्योगांना मोठ्या प्रमाणामध्ये गरज असते. या पायाभूत सुविधांचा योग्य तो विकास झाला तरच उद्योग क्षेत्राच्या विकासाला गती प्राप्त होते.
सामाजिक जीवनामध्ये पायाभूत सुविधांची भूमिका : आपण वर सामाजिक पायाभूत सुविधांबद्दल बघितले आहे. यामध्ये शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, निवारा, पाणीपुरवठा, इंधन अशा दैनंदिन मानवी जीवनाच्या अत्यावश्यक गरजा आहेत. या सर्व पायाभूत सुविधांचा विकास म्हणजेच मानव विकास साधने होय. भौतिक विकासाबरोबरच सामाजिक विकास होणे हेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे असते.
विकसित पायाभूत सुविधांमुळे गाव, शहर व राज्य अशी सर्व जवळ येतात. यामधून विचारांचे तीव्र गतीने आदान- प्रदान होते. तसेच याद्वारे संशोधनास चालना मिळते व आर्थिक प्रगतीस हातभार लागतो. तसेच विविध माहितीच्या प्रसारामधून आचार -विचार, संस्कृतीचेदेखील आदान-प्रदान होते. अशा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने पायाभूत सुविधांचा विकास होणे अत्यंत महत्त्वाची बाब आहे.
हेही वाचा – UPSC-MPSC : चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी भारत सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना कोणत्या?
भारतातील पायाभूत सुविधा विकासातील उणिवा :
भारतातील नियोजन काळादरम्यान पायाभूत सुविधांच्या विकासाचा दर हा अल्प प्रमाणातच राहिला आहे. पायाभूत सुविधांकरिता आवश्यक असणारे मोठे भांडवल उभारणे शक्य झाले नाही. १९९१ पर्यंत सर्व पायाभूत प्रकल्प हे सार्वजनिक गुंतवणुकीद्वारेच उभे करण्यात आले आहेत. १९९१ नंतर मात्र यामध्ये बदल करून पायाभूत प्रकल्प हे सार्वजनिक-खासगी भागीदारीद्वारा हाताळले जात असले तरी अर्थव्यवस्थेचे वाढते आकारमान बघता भांडवलाची तीव्र कमतरता भासते. साधारणतः पायाभूत सुविधांचा विकास हा शहरी भागात जास्त प्रमाणात झालेला पहावयास मिळतो. यापासून खेडी ही दुर्लक्षितच राहिली आहे. यामुळे या पायाभूत सुविधांचा जास्त फायदा हा शहरी वर्गालाच झालेला आहे.
स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये रस्ते विकासाला सुरुवात झाल्यानंतर हा दर थोडा बरा असला तरी नवीन रेल्वेमार्ग उभारणीचा वेग हा फारच मंद स्वरूपाचा राहिला आहे. तसेच अंतर्गत जलमार्गाचे महत्त्वसुद्धा उशिरा ध्यानात आले. त्याचबरोबर वीज उत्पादनाचे संकटसुद्धा कायम राहिलेले आहेच. अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या विकासाचा दरसुद्धा अल्प आहे. अशा प्रकारच्या अनेक उणिवा या पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये निदर्शनास येतात. आता मात्र पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष देण्यात येत आहे.