सागर भस्मे
मागील लेखातून आपण कृषी आधारित उद्योग म्हणजे काय? आणि या उद्योगांच्या विकासाकरिता सरकारने कोणत्या योजना सुरू केल्या, याबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण कृषी आधारित उद्योगांमधील दोन महत्त्वाचे उद्योग म्हणजेच साखर उद्योग व ताग उद्योग यांच्या संबंधित सविस्तरपणे जाणून घेऊया.
साखर उद्योग :
साखर उद्योग हा कृषी उत्पादनावर आधारित कापड उद्योगानंतर दुसऱ्या क्रमांकाचा महत्त्वाचा उद्योग आहे. एकूण कृषी उत्पादनाच्या जवळपास ७.५ टक्के उत्पादन हे ऊस उत्पादनाच्या निगडित असल्यामुळे साखर उद्योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. साखर उद्योग हा ग्रामीण क्षेत्राकडे एक अत्यंत महत्त्वाचा उद्योग समजला जातो. एवढेच नव्हे, तर याला ग्रामीण भागाचा कायापालट करणारे उद्योग म्हणून देखील साखर उद्योगाकडे बघितले जाते.
हेही वाचा – UPSC-MPSC : कृषी आधारित उद्योग म्हणजे काय? या उद्योगांच्या विकासाकरिता सरकारने कोणत्या योजना सुरू केल्या?
साखर उद्योगामध्ये भारत हा जगातील ब्राझीलनंतर दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे. तसेच प्रथम क्रमांकाचा साखर वापरणारा देश व सर्वाधिक निर्यातीमध्येसुद्धा भारताचा क्रमांक ब्राझीलनंतर दुसरा आहे. भारतामध्ये साखर उत्पादनात महाराष्ट्र राज्य अग्रेसर म्हणजेच प्रथम क्रमांकावर आहे, तर महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक साखर उत्पादक राज्य आहे.
साखर उद्योग हा पाच लाखांहून अधिक प्रशिक्षित आणि अर्धकुशल लोकांना रोजगार देतो, त्यापैकी बहुतांश ग्रामीण भागातील आहेत. भारतात साखर उद्योग ग्रामीण, सामाजिक-आर्थिक विकासासाठी, रोजगार आणि अधिक उत्पन्न तसेच वाहतूक आणि दळणवळण पायाभूत सुविधांच्या माध्यमातून ग्रामीण संसाधने एकत्रित करण्यासाठी केंद्रबिंदू आहे. ग्रामीण भारतामध्ये साखर उद्योग हे सर्वात मोठे कृषी आधारित क्षेत्र आहे. लागवड, कापणी आणि संबंधित क्रियाकलापांमध्ये पाच दशलक्ष ऊस उत्पादक, त्यांचे अवलंबून असलेले आणि मोठ्या संख्येने कृषी शेतकरी काम करतात, जे ग्रामीण लोकसंख्येच्या ७.५ टक्के आहेत.
भारतातील साखर उद्योग पार्श्वभूमी :
भारतामध्ये इंग्रजांनी बंगाल व बिहारमध्ये साखर कारखाने उभारण्याकरिता विशेष प्रयत्न केले. भारतात व्हॅक्यूम पॅन पद्धतीचा वापर करणारा पहिला साखर कारखाना हा सरन, बिहार येथे उभारण्यात आला. भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना हा १९३३ मध्ये आंध्र प्रदेशातील इटिकोपक्का येथे सी.व्ही.एस. नरसिंह राजू यांच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आला. महाराष्ट्राच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये पहिला साखर कारखाना हा १९२० मध्ये बेलापूर, अहमदनगर येथे उभारण्यात आला; तर महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना हा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रयत्नाने १९४९ मध्ये प्रवरानगर येथे उभारण्यात आला व १९५१ पासून या कारखान्यांमध्ये साखर उत्पादनास सुरुवात झाली. महाराष्ट्रातील हा सहकारी साखर कारखाना उभारण्यामध्ये विखे पाटील यांना डी. आर. गाडगीळ व वैकुंठभाई मेहता यांची मदत लाभली होती. प्रवरानगर येथील सहकारी साखर कारखाना हा भारतातीलच नव्हे, तर आशिया खंडातील पहिला सहकारी कारखाना असल्याचे बरेच संदर्भ ग्रंथांमध्ये म्हटले आहे. ISMA (Indian Sugar Mill Association) च्या आकडेवारीनुसार २०२२ च्या अखेर भारतामध्ये ४९७ साखर कारखाने हे कार्यरत होते.
ताग उद्योग :
१८५४ मध्ये कोलकाताजवळ रिश्रा या ठिकाणी पहिली ताग गिरणी सुरू करण्यात आली, तेव्हापासून या उद्योगाला चालना मिळाली. त्यानंतर ताग गिरण्यांचा पूर्व भारतामध्ये भरपूर विकास झाला. फाळणीपूर्वी भारतामधील ढाका या शहराला तागाचे मँचेस्टर असे म्हटले जात होते. फाळणीनंतर एक मोठी नुकसानीची बाब म्हणजे ७० टक्के ताग लागवडीचा भाग हा भारताच्या हातातून गेला. ताग उत्पादनात भारत हा जगात प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर बांगलादेश व चीन यांचा क्रमांक लागतो. भारतामध्ये ताग उद्योग हा ४० लाख शेतकऱ्यांना व्यवसाय पुरवतो व ३.७ लाख लोकांना रोजगार मिळवून देतो. तसेच ताग उद्योग हा परकीय चलन प्राप्त करून देणारा एक महत्त्वाचा उद्योग समजण्यात येतो.
भारत सरकारने १९७१ मध्ये भारतीय ताग महामंडळाची स्थापना केली. या महामंडळाच्या स्थापनेमागील महत्त्वाचा उद्देश म्हणजे तागाच्या किमतीवर देखरेख ठेवण्याकरिता व निर्यात वृद्धीसाठी हे मंडळ कार्यरत आहे. त्यानंतर २००५ मध्ये सरकारने राष्ट्रीय ताग धोरण जाहीर केले. या धोरणामागील दृष्टिकोन म्हणजे ताग उत्पादनात वृद्धि व्हावी तसेच गुणात्मक दर्जा वाढावा.