सागर भस्मे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील लेखातून आपण शेअर बाजार म्हणजे काय? शेअर बाजाराची भारतामधील उत्क्रांती, शेअर बाजारावर असलेल्या जबाबदार्‍या आणि शेअर बाजाराचे प्रकार आदींबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, राष्ट्रीय स्टॉक एक्स्चेंज आणि ओव्हर द काउंटर एक्स्चेंज ऑफ इंडिया यांच्याबाबत जाणून घेऊ.

बॉम्बे शेअर बाजार (BSE) :

भारतामध्ये पहिला शेअर बाजार म्हणून ओळखला जाणारा बाजार म्हणजे बॉम्बे शेअर बाजार होय. त्याची स्थापना १८७५ मध्ये करण्यात आली होती. तो भारतातीलच नव्हे, तर आशियामधीलही सर्वांत जुना शेअर बाजार म्हणून ओळखला जातो. मात्र, ऑगस्ट १९५७ मध्ये त्याला अधिकृत मान्यता मिळाली. बॉम्बे शेअर बाजाराचे रूपांतर सन २००२ मध्ये राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये करण्यात आले. बॉम्बे शेअर बाजार हा भांडवलीकरणाच्या तुलनेमध्ये जगातील पाचव्या क्रमांकाचा सर्वांत मोठा शेअर बाजार आहे.

बॉम्बे शेअर बाजारामध्ये नोंदणी होण्याकरिता पाच कोटी रुपये इतके कंपनीचे किमान भांडवल असणे आवश्यक असते. या बाजाराशी संबंधित चार निर्देशांक अस्तित्वात आहेत आणि ते म्हणजे सेन्सेक्स, बीएसई-२००, बीएसई-५०० व राष्ट्रीय निर्देशांक. राष्ट्रीय निर्देशांक हा बॉम्बे शेअर बाजाराच्या सांख्यिकी खात्याकडून मोजला जातो. त्यामुळे त्याला राष्ट्रीय बॉम्बे शेअर बाजार निर्देशांक, असेही म्हणतात.

राष्ट्रीय शेअर बाजार (NSE)

राष्ट्रीय शेअर बाजाराची स्थापना जे. एम. फेरवानी समितीच्या शिफारशीनुसार १९९२ मध्ये करण्यात आली. कंपनी कायदा, १९५६ अंतर्गत देशामधील प्रमुख १६ बँका व वित्तीय संस्थांमार्फत राष्ट्रीय शेअर बाजाराची स्थापना करण्यात आली. स्थापना होऊन प्रत्यक्ष कामकाजाला १९९४ मध्ये प्रारंभ झाला.

राष्ट्रीय शेअर बाजाराचे मुख्यतः दोन विभाग आहेत आणि ते म्हणजे डेट मार्केट आणि इक्विटी मार्केट. डेट मार्केट हा नाणेबाराचा हिस्सा असून, त्यामध्ये खरेदी-विक्री केली जाते. तसेच इक्विटी मार्केट हा भांडवल बाजाराचा हिस्सा असून, यामध्ये शेअर्सची खरेदी-विक्री केली जाते. निफ्टी हा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक आहे. या निर्देशांकाद्वारे राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये नोंदणीकृत सर्वांत मोठ्या ५० कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतींचा समावेश असतो. २०२२-२३ मध्ये निफ्टी-१०० या नवीन निर्देशांकाची सुरुवात करण्यात आली.

ओव्हर द काउंटर एक्स्चेंज ऑफ इंडिया (OTCEI)

ओव्हर द काउंटर एक्स्चेंज ऑफ इंडिया हा भारतामधील पहिला इलेक्ट्रॉनिक शेअर बाजार आहे. या बाजारामध्ये कोणतेही मध्यवर्ती ठिकाण नाही आणि सर्व व्यापार हा इलेक्ट्रॉनिक्स नेटवर्कद्वारे होतो. त्याची स्थापना १९८९ मध्ये करण्यात आली होती; मात्र प्रत्यक्ष कामकाजाला १९९२ मध्ये सुरुवात झाली.

जुन्या शेअर बाजारामधील पारदर्शकतेचा अभाव आणि व्यवहार पूर्ण होण्यास केला जाणारा विलंब या समस्या टाळण्याकरिता या शेअर बाजाराचे संपूर्णत: संगणकीकरण करण्यात आले. ३० लाख ते २५ कोटी रुपये इतके भांडवल असणाऱ्या छोट्या कंपन्यांनासुद्धा शेअर बाजारामध्ये स्वतःचा ठसा उमटवण्याची संधी देणे हे OTCEI या शेअर बाजाराच्या स्थापनेमागील महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. तसेच विनिमय आवश्यकता पूर्ण करण्यास अक्षम असणाऱ्या लहान कंपन्या; ज्या राष्ट्रीय बाजारामध्ये व्यवहार करू शकत नाहीत, अशा कंपन्यांसाठी भांडवलउभारणी करणे हासुद्धा यामागील महत्त्वाचा उद्देश आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc indian economy what is bombay stock exchange and national stock exchange mpup spb