सागर भस्मे
मागील लेखातून आपण ‘राष्ट्रीय पायाभूत पाईपलाईन’ उपक्रमाविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राबविण्यात आलेली आणखी एक महत्वाची योजना म्हणजेच ‘पंतप्रधान गतिशक्ती’ या योजनेबाबत जाणून घेऊया.
पंतप्रधान गतिशक्ती योजना :
पंतप्रधान गतिशक्ती योजना ही मिश्रवहन जोडणीकरिता राबवण्यात आलेली योजना असून पायाभूत सुविधा क्षेत्राचा विकास करण्याकरिता अतिशय महत्त्वाची अशी राष्ट्रीय बृहत योजना आहे. पायाभूत सुविधा क्षेत्राचा विकास करण्याकरिता ही योजना ऑक्टोबर २०२१ मध्ये कार्यान्वयित करण्यात आली. ही योजना राबवण्यामागे महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे मिश्रवहन जोडणीला उत्तेजन देणे आणि देशामधील पुरवठाशास्त्र क्षेत्राचा खर्च कमी करणे असे आहे. प्रधानमंत्री गतिशक्ती हे एक डिजिटल स्थानक असून या अंतर्गत एकूण १६ मंत्रालयांना एकमेकांशी जोडते. उदा., रस्ते मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, जहाज वाहतूक, विमान वाहतूक इत्यादी मंत्रालये. अशी जोडणी ही खात्रीशीर सकल नियोजन आणि पायाभूत प्रकल्पांची अंमलबजावणी याकरिता करण्यात आली आहे.
हेही वाचा – UPSC-MPSC : ‘राष्ट्रीय पायाभूत पाईपलाईन’ उपक्रम नेमका काय आहे? त्याची उद्दिष्ट्ये कोणती?
पंतप्रधान गतिशक्ती या उपक्रमामुळे सर्वसामान्य जनता, वस्तू आणि सेवा यांची वाहतुकीच्या एका पद्धतीकडून दुसऱ्या पद्धतीकडे होणारी हालचाल ही सुकर करण्याकरिता एक सामायिक आणि विना अडथळा जोडणी उपलब्ध करून देईल. पायाभूत सुविधा अगदी शेवटच्या टोकापर्यंत जोडण्याची सुविधा करून देईल आणि प्रवाशांच्या प्रवासाच्या वेळेमध्येदेखील बचत करेल. पुरवठा शास्त्राचा विचार केला असता, प्राप्त माहितीनुसार भारतामध्ये पुरवठाशास्त्र क्षेत्राचा खर्च हा स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या सुमारे १४ टक्के असून विकसित देशांमध्ये हा खर्च तुलनेने कमी म्हणजेच आठ टक्के इतकाच आढळून येतो. पुरवठाशास्त्र क्षेत्राच्या या मोठ्या खर्चामुळे पायाभूत सुविधांवरील खर्चाच्या नियोजनावर परिणाम होतो आणि अर्थव्यवस्थेला जागतिक बाजारपेठेमध्ये स्पर्धेला तोंड द्यावे लागते.
पंतप्रधान गतिशक्ती या संकेतस्थळाच्या उपलब्धतेमुळे होणारा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे मानवी हस्तक्षेप कमी होईल, कारण सर्व मंत्रालय कायम संपर्कात असतील आणि यामुळे प्रकल्प देखरेख गटाकडून प्रकल्पांचा वेळेवर आढावादेखील घेतला जाईल.
या योजनेची इतर काही महत्त्वाची उद्दिष्टे :
- देशामध्ये लॉजिस्टिक आणि पायाभूत सुविधांचा विकास करणे.
- रस्ते वाहतुकीवरील असलेले प्रचंड अवलंबित्व कमी करणे.
- पुरवठा साखळीमध्ये सुधारणा घडवून आणणे, तसेच पुरवठा साखळीमधील खर्च कमी करणे.
- विविध मंत्रालये, राज्ये आणि संबंधित विभाग यांच्यामधील समन्वयामध्ये सुधारणा घडवून आणणे. उदा., पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या विकासाकरिता रेल्वे मंत्रालय, रस्ते मंत्रालय इत्यादीमधील समन्वय सुधारणे.
- आंतरराज्यीय विलंब दूर करून त्यांच्यामधील संवादातील अंतर कमी करणे.
- ही योजना मुख्यत्वे मंत्रालय आणि विभाग यांच्यामधील संवादांच्या अभावामुळे निर्माण झालेले गहाळ अंतर दूर करून मुख्य उद्दिष्टे साध्य करण्याचे ध्येय ठेवते.
पंतप्रधान गतिशक्ती यामध्ये सर्वच पायाभूत सुविधा योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे. उदा. भारतमाला परियोजना, सागरमाला योजना, अंतर्देशीय जलमार्ग, उडान योजना, लॉजिस्टिक पार्क, इकोनॉमिक झोन इत्यादी.
हेही वाचा – UPSC-MPSC : सागरी वाहतुकीमध्ये उद्भवणाऱ्या समस्या आणि त्याच्या विकासासाठी राबविण्यात आलेल्या योजना कोणत्या?
पंतप्रधान गतिशक्ती योजना ही मुख्य सहा आधारस्तंभावर आधारलेली आहे. हे आधारस्तंभ पुढीलप्रमाणे आहेत :
१) व्यापकता (Comprehensiveness) : विविध मंत्रालये, विभाग आणि खाती यांच्या चालू आणि नियोजित धोरणांना एकाच केंद्रीय संकेतस्थळावर समाविष्ट करणे आणि महत्त्वाची माहिती पुरवणाऱ्या उपक्रमांच्या दृश्यमान्यतेची खात्री करणे.
२) प्राधान्यक्रम (Prioritisation) : विविध क्षेत्रांमधील परस्पर संवादानुसार वेगवेगळी खाती त्यांच्या प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवण्यास सक्षम असतील.
३) इष्टतमीकरण (Optimisation) : गंभीर त्रुटी शोधण्याच्या सुविधांमुळे वेळ आणि खर्च यामध्ये बचत होते.
४) सुसंगती (Synchronisati on) : प्रत्येक खात्याद्वारे राबविण्यात आलेले उपक्रम तसेच गव्हर्नंन्सचे वेगवेगळे टप्पे यामध्ये सुसंगती निर्माण करण्याकरिता मदत करणे आणि अशी मदत करीत असताना त्यांच्यामध्ये समन्वय प्रस्थापित करणे.
५) चिकित्सक (Analytical) : भौगोलिक माहिती व्यवस्थेवर आधारित नियोजन आणि २०० पेक्षा अधिक थर असणारी पृथक्करणात्मक साधने यांच्या मदतीने संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे कार्यकारी संस्थांच्या दृश्यमान्यमध्ये वाढ होते.
६) गतिमान (Dynamic) : विविध उपग्रह प्रतिमांच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रकल्पांच्या प्रगतीचे अवलोकन करणे, आढावा आणि देखरेख याकरिता मदत करणे.
अशा या महत्त्वाच्या सहा आधारस्तंभावर ही योजना आधारलेली आहे. तसेच या योजनेच्या अंमलबजावणीमुळे निश्चितच अर्थव्यवस्थेला वृद्धिंगत तसेच गतिमान करण्यास खूप मदत होत आहे.