सागर भस्मे

मागील लेखातून आपण बॉम्बे शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार याबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण भारतीय शेअर बाजारातील सर्वोच्च नियामक संस्था ‘भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (SEBI- Securities and Exchange Board of India)’ या संस्थेबाबत सविस्तरपणे जाणून घेऊ या. यामध्ये आपण सेबीच्या स्थापनेची गरज का भासली? तिची स्थापना केव्हा करण्यात आली? सेबीची रचना, सेबीची उद्दिष्टे आणि कार्ये, तसेच सेबीच्या लोगोमध्ये करण्यात आलेला बदल इत्यादी घटकांचा अभ्यास करू.

In politics of district Mamu factor implemented in Akot constituency once again come into discussion
‘मामु’ फॅक्टर चालणार?, दलितांसह इतरांचे एकगठ्ठा मतदान…
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
mita shetty
टाटा इंडिया इनोव्हेशन फंडाची कामगिरी कशी राहील?
PMC Bank Scam Hearing on petitions of aggrieved account holders on December 12 mumbai news
पीएमसी बँक घोटाळा; पीडित खातेधारकांच्या याचिकांवर १२ डिसेंबरला सुनावणी
sensex drops 110 points nifty settles at 23532
मंदीवाल्यांचा जोर कायम; ‘सेन्सेक्स’मध्ये ११० अंशांची घसरण
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
nifty stock market marathi news
सेन्सेक्सची १० शतकी गटांगळी, महागाई आणि परकीय निधीच्या निर्गमनाने बाजार बेजार
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : नीतिशास्त्र, सचोटी  आणि नैसर्गिक क्षमता

हेही वाचा – UPSC-MPSC : बॉम्बे शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार काय आहेत? ते कशा प्रकारे कार्ये करतात?

‘सेबी’ची स्थापना करण्याची गरज का भासली?

सुरुवातीला शेअर बाजारांमधील गैरव्यवहार टाळण्याकरिता १९४७ मध्ये भांडवलविषयक नियंत्रणाचा एक कायदा करण्यात आला होता. त्यानंतर भारत सरकारद्वारे भारतीय भांडवल बाजाराचे नियंत्रण करण्याकरिता आणखी दोन कायदे संमत करण्यात आले होते, ते म्हणजे कंपनी कायदा, १९५६ आणि प्रतिभूती करार नियमन कायदा, १९५६. तरीसुद्धा भांडवल बाजारातील नियमनामध्ये अनेक दोष आढळून येत होते. तसेच कालांतराने भांडवल बाजाराचा विस्तारसुद्धा लक्षणीयरीत्या वाढत होता; परंतु त्यामध्ये शिस्तबद्धता नव्हती. अशा काही कारणांस्तव भांडवल बाजारामध्ये नियंत्रण, विकास घडवून आणण्याकरिता एक स्वतंत्र संस्था असावी, अशी गरज सरकारला भासू लागली. त्यावर उपाय म्हणून सेबीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सेबीची स्थापना केव्हा करण्यात आली?

जी. एस. पटेल समितीच्या शिफारशीवरून १२ एप्रिल १९८८ रोजी एक असंवैधानिक संस्था म्हणून सेबीची स्थापना करण्यात आली. सेबीला ३० जानेवारी १९९२ रोजी सेबी कायदा, १९९२ नुसार वैधानिक दर्जा देण्यात आला. सेबीचे मुख्यालय हे मुंबईला असून, तिची विभागीय कार्यालये कोलकत्ता, दिल्ली व चेन्नई येथे आहेत. भारत शासनाने एप्रिल १९९८ मध्ये सेबीला संपूर्ण भांडवली बाजाराचा मुख्य नियंत्रक म्हणून घोषित केलेले आहे.

सेबीची रचना कशी आहे?

सेबीच्या नियामक मंडळामध्ये अध्यक्षांसहित एकूण नऊ सदस्यांचा समावेश असतो. त्यामध्ये वित्त आणि कायदा मंत्रालयाचा प्रत्येकी एक सदस्य, भारतीय रिझर्व्ह बँकेचा एक सदस्य आणि भारत सरकारद्वारे इतर दोन सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. अध्यक्ष वगळून सेबीचे चार पूर्णवेळ सदस्य असतात. सेबीचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉ. एस. ए. दवे यांची नियुक्ती करण्यात आली होती. सद्य:स्थितीमध्ये माधवी पुरी बूच १ मार्च २०२२ पासून सेबीच्या अध्यक्षपदी कार्यरत आहेत. माधवी पुरी बूच या सेबीच्या अध्यक्षपदी कार्यरत असणाऱ्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत.

सेबीची उद्दिष्टे आणि कार्ये :

भारतीय भांडवली बाजारांमधील नियंत्रण व विकास घडवून आणणे, गुंतवणूकदारांचे हित संरक्षण करणे, रोखे बाजार व्यवहार करण्याकरिता आवश्यक, योग्य व अत्याधुनिक सोई-सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता सदैव प्रयत्नशील राहणे, सर्व रोखे बाजाराच्या व्यवस्थापनावर परिणामकारक नियंत्रण ठेवणे, तसेच रोखे बाजारांचा कारभार स्पर्धात्मक व व्यावसायिक तत्त्वावर चालण्याकरिता योग्य वातावरण निर्मिती करणे इत्यादी सेबीच्या स्थापनेमागील उद्दिष्टे आहेत.

शेअर बाजार, प्रतिभूती बाजार व भांडवल बाजार अशा तीनही घटकांवर सेबी देखरेख आणि नियंत्रण ठेवत असते. शेअर बाजारामधील मध्यस्थ, दलाल, गुंतवणूकदार, म्युच्युअल फंड, परकीय गुंतवणूकदार अशा सर्वांची नोंद करून, त्यांच्यावर देखरेख व नियंत्रण ठेवण्याचे काम सेबी करीत असते. सेबी ही संस्था मुख्य तीन घटकांकरिता काम करीत असते. ते म्हणजे प्रतिभूती निर्गमक, गुंतवणूकदार आणि कायदे पालक व न्यायालयीन कामे, अशी तीन महत्त्वाची कामे सेबीच्या कार्यामध्ये अंतर्भूत आहेत आणि ती एकाच वेळी पार पाडावी लागतात.

कार्यकारी म्हणून सेबीला गैरव्यवहारांची तपासणी करून, संबंधितांवर कारवाई करावी लागते. तर कायदे पालक म्हणून नियंत्रणाचे सर्व कायदे करण्याचा अधिकार हा सेबीला देण्यात आलेला आहे. तसेच न्यायालयीन म्हणून घोषणा, नियम, आदेश काढण्याचा अधिकारसुद्धा सेबीला आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : शेअर बाजार म्हणजे नेमकं काय? त्याचे प्रकार कोणते?

सेबीच्या लोगोमध्ये बदल :

नुकताच सेबीने त्यांच्या लोगोमध्ये बदल केला आहे. १२ एप्रिल २०२३ रोजी म्हणजेच सेबीच्या ३५ व्या स्थापनादिनी या लोगोचे अनावरण करण्यात आले. सेबीचा नवीन लोगो भांडवलनिर्मितीच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी सेबीची सतत वचनबद्धता दर्शवतो आणि डेटा व तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा अवलंब करताना धोरणनिर्मितीमध्ये सल्लागार दृष्टिकोनाची समृद्ध परंपरा कायम ठेवतो. नवीन सेबी लोगोने त्याचे पारंपरिक निळ्या रंगाचे पॅलेट कायम ठेवले आहे आणि ते प्रत्येक भारतीयाच्या समृद्धीसाठी कार्य करणार्‍या नवीन व आधुनिक राष्ट्राच्या आकांक्षेचे प्रतिबिंबदेखील आहे.