मागील लेखातून आपण बँका आणि बिगर बँक वित्तीय संस्था यांच्यातील फरक आणि बिगर बँक वित्तीय संस्थांचे वर्गीकरण याबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण भारतीय प्रतिभूती बाजार या घटकाचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण प्रतिभूती बाजार म्हणजे काय? शेअर बाजार म्हणजे काय? शेअर बाजाराची भारतामधील उत्क्रांती, शेअर बाजारावर असलेल्या जबाबदार्या आणि शेअर बाजाराचे प्रकार आदींबाबत जाणून घेऊया.
प्रतिभूती बाजार म्हणजे काय?
प्रतिभूती बाजार समजण्यापूर्वी आपल्याला प्रतिभूती म्हणजे काय हे सुद्धा माहिती असणे गरजेचे आहे. प्रतिभूती म्हणजे अशी वित्तीय साधने ज्यांची भांडवली बाजारामध्ये मुक्तपणे खरेदी-विक्री होणे संभव असते. या रोख्यांमध्ये शेअर्स, कर्जरोखे, डेरीव्हेटिव्ह इत्यादींचा समावेश होतो; तर प्रतिभूती बाजार म्हणजे दीर्घ मुदतीच्या भांडवलापासून अर्थव्यवस्थेमधील वित्तीय बाजारपेठेमध्ये असा विभाग, जो शेअर्स, बाँड, प्रतिभूती, डेरीव्हेटिव्ह इत्यादी साधनांच्या साहाय्याने निर्माण करण्यात येतो, या विभागाला त्या अर्थव्यवस्थेचा ‘प्रतिभूती बाजार’ असे समजण्यात येते. प्रतिभूती बाजारामध्ये प्रतिभूती नियंत्रक – सेबी, शेअर बाजार, विविध समभाग निर्देशांक, परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार, ब्रोकर इत्यादी घटकांचा समावेश होतो.
हेही वाचा – UPSC-MPSC : बँका आणि बिगरबँक वित्तीय संस्था यांच्यामध्ये फरक काय?
शेअर बाजार म्हणजे काय?
शेअर बाजार म्हणजे एक प्रत्यक्षात भौतिक स्वरूपामध्ये अस्तित्वात असणारी संस्था आहे. या संस्थेमध्ये प्रतिभूती शेअर बाजाराच्या विविध साधनांचे म्हणजेच समभाग, बॉण्ड, डिबेंचर, कर्ज रोखे यांची खरेदी विक्री जेथे होते, त्याला शेअर बाजार असे म्हणतात. प्रतिभूतींच्या बाजाराकरिता एकमेव सगळ्यात महत्त्वाची संस्था म्हणजे शेअर बाजार. त्यामध्ये समभागांचे खरेदीदार आणि विक्रेते यांना एक स्थान उपलब्ध करून देण्यात येते आणि तेथे समभागांना रोखता प्राप्त होते.
भारतातील शेअर बाजाराची उत्क्रांती :
जगामधील सर्वात पहिला शेअर बाजार स्थापन करणारा देश म्हणजे बेल्जियम होय. बेल्जियममध्ये १६३१ मध्ये जगातील सर्वात पहिला शेअर बाजार स्थापन करण्यात आला. भारतामधील शेअर बाजाराचा विचार केला असता भारतामध्ये प्रतिभूतींमधील खरेदी विक्रीचे व्यवहार हे १९३६ पासूनच कलकत्ता येथे सुरू झाले होते. त्यानंतर पुढे ते मुंबईमध्ये सुरू करण्यात आले; परंतु असे व्यवहार हे असंघटित दलालांद्वारे होत होते. भारतामधील संघटित प्रतिभूती बाजाराची सुरुवात १८७५ पासून झाली आहे. भारतामधील पहिला शेअर बाजार दि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज याची स्थापना १८७५ मध्ये प्रेमाचंद रायचंद यांनी केली होती. यालाच द नेटिव्ह शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन असे म्हणण्यात येत असे.
शेअर बाजाराच्या कामकाजाची सुरुवात एका झाडाखाली करण्यात आली होती. याच संघटनेला पुढे चालून मुंबई शेअर बाजार म्हणून ओळखले जाऊ लागले. हा बाजार भारतातीलच नव्हे, तर आशिया खंडातील सर्वात जुना शेअर बाजार आहे. ऑगस्ट १९५७ मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन अंतर्गत भारत सरकारने याला अधिकृत मान्यता दिली. भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त हा पहिला शेअर बाजार आहे.
शेअर बाजारावर असलेल्या जबाबदार्या :
प्रतिभूतींच्या व्यवहाराकरिता शेअर बाजार ही एकमेव आणि सगळ्यात महत्त्वाची संस्था आहे. यामध्ये समभागांचे खरेदीदार आणि विक्रेते यांना एक स्थान उपलब्ध करून दिले जाते आणि येथे समभागांना रोखता प्राप्त होते. यामध्ये संस्थात्मक नियम आणि प्रक्रिया पद्धत यांच्या सहाय्याने शेअर बाजारांमधील व्यवहारांमध्ये भाग घेणारे त्यांच्या बांधिलकीशी प्रामाणिक असल्याबाबत खात्री दिली जाते. शेअर बाजारामध्ये गुंतवणूकदारांना व्यवहारांच्या किमतीशी संबंधित महत्त्वाची सर्वच माहिती उपलब्ध करून देण्यात येते. तसेच नोंदणीकृत कंपन्यांना त्यांच्या वर्तमान समभागधारकांची अद्ययावत माहिती पुरविण्यात येते. शेअर बाजारामध्ये स्वतःचा निर्देशांक प्रकाशित करून बाजाराची परिस्थिती ही सर्वांना कळविण्यात येते.
हेही वाचा – UPSC-MPSC : बिगरबँक वित्तीय संस्था म्हणजे काय? त्या कशा प्रकारे कार्य करतात?
शेअर बाजाराचे प्रकार :
शेअर बाजारामधील त्यांच्या व्यवहारांवरून मुख्यतः दोन प्रकार पडतात. ते म्हणजे प्राथमिक बाजार व दुय्यम बाजार.
प्राथमिक बाजार : प्राथमिक बाजार ही संकल्पना आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. समजा एका उद्योजकाने एक नव्याने उद्योग स्थापन केला. तो उद्योजक सर्वप्रथम आपल्या उद्योगांमधील समभाग म्हणजेच शेअर प्रस्तूत करतो, म्हणजेच हे शेअर्स तो विक्रीला काढतो. उद्योजकाने प्रस्तूत केलेले शेअर्स हे गुंतवणूकदार खरेदी करतात. यामध्ये उद्योजक आणि गुंतवणूकदार यांच्यामध्ये व्यवहार पार पडतो. याच व्यवहाराला प्राथमिक बाजार असे म्हणतात. असा उद्योग करीत असलेल्या शेअर विक्रीला इनिशियल पब्लिक ऑफरिंग असे म्हणतात.
दुय्यम बाजार : प्राथमिक बाजारांमध्ये व्यवहार हा थेट उद्योजक व गुंतवणूकदार यांच्यामध्ये होत असतो; तर दुय्यम बाजारामध्ये जो गुंतवणूकदार शेअरची थेट उद्योजकाजवळून खरेदी करतो, तो दुसऱ्या गुंतवणूकदाराला त्या शेअर्सची परत विक्री करतो. म्हणजेच येथे शेअर्सची खरेदी-विक्री हे एक गुंतवणूकदार ते दुसरा गुंतवणूकदार अशी होऊ लागते. अशा बाजाराला दुय्यम बाजार असे म्हणतात.