वृषाली धोंगडी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन तिचे ढग बनतात आणि त्या ढगांना थंड हवा मिळाली की त्या वाफेचे परत पाण्यात रूपांतर होऊन पावसाच्या रूपात ते जमिनीवर पडतात, त्यालाच आपण बाप्षीभवन असे म्हणतो. मात्र, या प्रक्रियेत समुद्राचं किंवा जमिनीवरच्या नद्या, नाले, तळ्यांचे पाणी प्रदूषित असेल, तर पावसाचे पाणीही अशुद्ध होतं. याबरोबरच हवेत ऑक्सिजन, नायट्रोजन सल्फर डायॉक्साईड व नायट्रस ऑक्साइड यांसारखे वायूही असतात. हे वायू या पावसाच्या पाण्यात विरघळतात. त्या अभिक्रियेपोटी सल्फ्युरिक व नायट्रिक आम्लाची निर्मिती होते. ही आम्लंही पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीवर पडतात. या प्रकारच्या पावसाला ‘आम्ल वर्षा’ असं म्हटलं जातं.

हेही वाचा – UPSC-MPSC : पर्यावरण : ओझोन अवक्षय म्हणजे काय?

थोडक्यात, आम्ल वर्षा हा पर्जन्यवृष्टीचा एक प्रकार आहे. ही आम्ल वर्षा धुके किंवा हिमवर्षा या प्रकारातही होऊ शकते. यामध्ये सल्फ्यूरिक किंवा नायट्रिक ॲसिडसारखे आम्ल मोठ्या प्रमाणात असतात. ज्या पावसाच्या पाण्याचे PH प्रमाण ५.५ पेक्षा कमी असते, त्या पाण्याला आम्ल वर्षा असे म्हणतात.

आम्ल वर्षा निर्माण होण्यासाठी मुख्यत्वे दोन वायू कारणीभूत असतात. एक म्हणजे सल्फर डाय ऑक्साइड (SO2) आणि दुसरं म्हणजे नायट्रोजन डाय ऑक्साइड (NO2). जेव्हा वातावरणात SO2 आणि NO2 चे प्रमाण वाढते, तेव्हा ते पावसाच्या पाण्यात मिसळतात. त्यामुळे सल्फ्यूरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड तयार होते. हे वायू पावसाच्या पाण्याचे PH मूल्य ५.५ पेक्षा कमी करून पावसाला आम्लयुक्त बनवतात.

आम्ल वर्षाची कारणे (Causes of Acid Rain)

आम्ल वर्षाची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

  • जीवाश्म इंधन जाळणे.
  • गाड्यांमधून बाहेर पडणारा धूर.
  • ज्वालामुखी उद्रेक : ज्यामधून SO2 वातावरणात सोडला जातो.
  • वणवा, खनिज तेल, कोळसा आणि वायूचे ज्वलन : याद्वारे वातावरणातील NO2 चे प्रमाण वाढते.
  • कोळसा जाळणे, पेट्रोलियम उत्पादने, मेटल सल्फाइडच्या धातूंचे स्मेल्टिंग, सल्फ्यूरिक आम्लाचे औद्योगिक उत्पादन.

आम्ल वर्षाचे परिणाम

पावसाच्या या आम्लधर्मीयतेचा सजीव आणि निर्जीव सृष्टीवर अनिष्ट परिणाम होत असतो. दगडी इमारतीही सततच्या आम्ल वर्षावामुळं झिजतात. त्यातील धातूंना गंज चढतो. सजीव सृष्टीवर तर त्याचे अधिकच विपरीत परिणाम होत असतात. वनस्पती आम्लधर्मीय पाण्यामुळे मरून जातात. समुद्र किंवा नदी-नाल्यांमधल्या माशांचीही तीच गत होते. असं आम्लवर्षाग्रस्त अन्न खाल्ल्यामुळे प्राण्यांवरही त्याचे अनिष्ट परिणाम होत असतात. वातावरणातील दृश्यमानता कमी होते. आम्ल वर्षा मानवी आरोग्याससुद्धा धोकादायक आहे. SO2 आणि NO2 वातावरणात प्रतिक्रिया देऊन सूक्ष्म सल्फेट आणि नायट्रेट कण तयार करतात. अनेक वैज्ञानिक अभ्यासांनी या कणांचे हृदयाच्या कार्यावर होणारे परिणाम दर्शविले आहेत, जसे की हृदयविकाराचा झटका येणे आणि मानवी फुफ्फुसाच्या कार्यावर परिणाम होणे, दमा असलेल्या लोकांना यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो.

हेही वाचा – UPSC-MPSC : पर्यावरण : वायुप्रदूषण म्हणजे नेमकं काय?

आम्ल वर्षा रोखण्यासाठी उपाय

आम्ल वर्षा रोखण्यासाठी खालील उपाय करणे गरजेचे आहे.

  • आम्ल पाऊस कमी करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे जीवाश्म इंधन न वापरता ऊर्जा निर्मिती करणे. त्याऐवजी आपण अक्षय ऊर्जा स्रोत वापरू शकतो, जसे की सौर आणि पवन ऊर्जा. तसेच नूतनीकरणक्षम ऊर्जा स्त्रोत आम्ल वर्षा कमी करण्यास मदत करतात; कारण ते कमी प्रदूषण करतात.
  • “स्क्रबर्स” म्हणून ओळखल्या जाणार्‍या उपकरणांचा वापर SO2 उत्सर्जनावर तांत्रिक उपाय ठरू शकतो. “स्क्रबिंग” ज्याला फ्ल्यू-गॅस डिसल्फ्युरायझेशन (FGD) देखील म्हणतात. सामान्यत: हे स्मोकस्टॅक्स सोडणार्‍या वायूंमधून SO2 रासायनिकरित्या काढून टाकण्याचे कार्य करते.
  • हायब्रिड वाहनांचा वापर किंवा कमी NO2 उत्सर्जन होत असलेल्या वाहनांचा वापर वाढवणे.
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc indian environment what is acid rain its causes and consequence mpup spb
Show comments