वृषाली धोंगडी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील लेखातून आपण जल आणि वायुप्रदूषणाबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण ध्वनिप्रदूषण म्हणजे काय? त्याचे परिणाम व त्यावरील उपायांबाबत चर्चा करू.

ध्वनिप्रदूषण म्हणजे काय?

मनुष्य, प्राणी किंवा यांत्रिक पर्यावरणामुळे निर्माण झालेला मर्यादेपलीकडील असह्य ध्वनी म्हणजे ध्वनिप्रदूषण होय. ध्वनिप्रदूषणाला इंग्रजीत नॉइज पोल्युशन, असे म्हणतात. नॉइज हा शब्द नॉशिया या लॅटिन शब्दापासून बनला आहे; ज्याचा अर्थ आजार, असा होतो. ध्वनिप्रदूषणामुळे मनुष्य किंवा प्राणी जीवनाच्या कृती विस्कळित होतात किंवा त्यांचा समतोल बिघडतो. ध्वनीची तीव्रता डेसिबल (DB)मध्ये मोजली जाते.

हेही वाचा – UPSC-MPSC : जैव-भूरासायनिक चक्रे म्हणजे काय?

मानवी कानाला ऐकू येणारा सर्वांत कमी आवाज १ डीबी आहे. दूरध्वनीचा शोध लावणारे अमेरिकन वैज्ञानिक अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांच्या स्मरणार्थ ध्वनीच्या तीव्रता पातळीच्या एककाला बेल यांचे नाव देण्यात आले आहे. डेसिबल हे एकक असून, दर १० डीबी आवाजाची तीव्रता १० पटींनी वाढते. साधारणत: ८० डीबीपर्यंतचा आवाज मनुष्याला सहन होऊ शकतो. त्यापेक्षा मोठ्या आवाजाचा त्रास होतो. विमाने व रॉकेट यांचा आवाज १०० ते १८० डीबीएवढा तीव्र असतो. तसेच बांधकाम, सार्वजनिक कार्यक्रम इत्यादी ठिकाणी आवाजाची पातळी १२० डीबीपेक्षा जास्त असते. गडगडाटी वादळे, जोराचा वारा, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी आवाजाची तीव्रता वाढते. वाढत्या आवाजामुळे ध्वनिप्रदूषण हा चिंतेचा विषय बनला आहे. त्याची काही प्रमुख कारणे म्हणजे वाहने, विमाने, औद्योगिक यंत्रे, लाउडस्पीकर, फटाके इ. व इतर काही उपकरणेदेखील ध्वनीप्रदूषण वाढवण्यास करणीभूत असतात; जसे की दूरदर्शन, ट्रान्झिस्टर, रेडिओ इ.

ध्वनिप्रदूषणाची कारणे आणि स्रोत कोणते?

ध्वनिप्रदूषणाची कारणे आणि स्रोत खालीलप्रमाणे :

१) औद्योगिकीकरण : औद्योगिकीकरणामुळे ध्वनिप्रदूषणात वाढ झाली आहे. कारण- जनरेटर, गिरण्या, मोठे एक्झॉस्ट फॅन यांसारख्या अवजड यंत्रांचा वापर येथे केला जातो. परिणामी अवांछित आवाजाची निर्मिती होते.

२) वाहने : रस्त्यावरील वाहनांची वाढती संख्या हे ध्वनिप्रदूषणाचे दुसरे कारण आहे.

३) कार्यक्रम : लग्न समारंभ, सार्वजनिक मेळाव्यात संगीत वाजवण्यासाठी लाउडस्पीकरचा समावेश असतो; ज्यामुळे शेजारच्या परिसरात अवांछित आवाज निर्माण होतो.

४) बांधकाम स्थळे : खाणकाम, इमारतींचे बांधकाम इत्यादीमुळे ध्वनिप्रदूषणात भर पडते.

ध्वनिप्रदूषणाचा मानवी आरोग्यावर कसा परिणाम होतो?

१) श्रवणशक्ती कमी होणे : मानवी कानांच्या आवाजमर्यादेच्या पलीकडे असलेल्या मोठ्या आवाजाच्या सतत संपर्कात आल्याने कानाच्या पडद्यांचे नुकसान होते. परिणामी श्रवणशक्ती कमी होते.

२) झोपेचे विकार : झोपेच्या कमतरतेमुळे दिवसभर थकवा आणि कमी ऊर्जा पातळीमुळे दैनंदिन कामांवर परिणाम होऊ शकते. ध्वनिप्रदूषणामुळे झोपेच्या चक्रात अडथळा येतो; ज्यामुळे चिडचिड होते आणि मनाची अस्वस्थता येते.

३) हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी समस्या : हृदयाशी संबंधित समस्या जसे की रक्तदाब पातळी, तणाव आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित रोग सामान्य व्यक्तींमध्ये येऊ शकतात. यापैकी कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीचा रक्तदाब अचानक वाढू शकतो.

हेही वाचा – UPSC-MPSC : ‘आम्ल वर्षा’ म्हणजे काय? त्याची कारणे कोणती?

ध्वनिप्रदूषण प्रतिबंध

ध्वनिप्रदूषणाला प्रतिबंध घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना खालीलप्रमाणे :

  • शिक्षण संस्था, रुग्णालये इत्यादी सार्वजनिक ठिकाणी हॉर्न वाजवण्यावर बंदी घालावी.
  • रस्त्यावरील वाहतुकीमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाची पातळी ध्वनी-अडथळे उभारून, वाहनांचा वेग मर्यादित ठेवून, रस्त्यांच्या पृष्ठभागांमध्ये बदल करून, जड वाहनांवर मर्यादा घालून किंवा टायरच्या रचनेत बदल करून कमी करता येते.
  • व्यावसायिक, रुग्णालय आणि औद्योगिक इमारतींमध्ये, पुरेशा ध्वनिरोधक यंत्रणा (Acostic System) बसवल्या पाहिजेत.
  • वाद्य यंत्राचा आवाज इष्ट मर्यादेपर्यंत नियंत्रित केला पाहिजे. घनदाट झाडांचे आच्छादन ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी उपयुक्त आहे. स्फोटके,फटाके यांचा अतिवापर टाळावा.
  • ध्वनीची पातळी वाढत राहिल्यास त्या भागातील प्राणी अधिवासाची जागा बदलतात. वाढलेल्या ध्वनीच्या तीव्रतेमुळे अन्न मिळविण्याच्या पद्धतीत बदल झाल्यामुळे काही प्राण्यांचा मृत्यू होऊ शकतो. प्रजनन क्षमता व दिशा ओळखण्याच्या क्षमता यांच्यात बदल झाल्यामुळे ते कायमचे बहिरे होतात. त्यामुळे ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी देशात ध्वनिप्रदूषण (अधिनियम आणि नियंत्रण) कायदा, २००० हा आहे.
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc indian environment what is noise pollution effects and causes mpup spb
Show comments