सागर भस्मे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Brahmaputra River System : ब्रह्मपुत्रा नदी तिबेटमध्ये कैलास पर्वत श्रेणीत मानसरोवराजवळ उगम पावते. तिची एकूण लांबी २,९०० कि.मी. असून, भारतात तिची लांबी ९१६ कि.मी. आहे. भारतात तिला ब्रह्मपुत्रा म्हणत असले तरीही चीनमधील तिबेट प्रदेशात तिला ‘त्सांग पो’ व बांगलादेशमध्ये तिला ‘जमुना’ या नावाने ओळखले जाते. ब्रह्मपुत्रा नदीचा विस्तार नदीखोऱ्याच्या उतरत्या क्रमानुसार चीन, भारत, बांग्लादेश, भूतान या देशांत झाला आहे. तसेच भारतामध्ये नदीखोऱ्याच्या क्षेत्रफळानुसार अरुणाचल प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, मेघालय, नागालॅण्ड, सिक्कीम, मणिपूर या राज्यांमध्ये तिचा विस्तार झाला आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारताचा भूगोल : गंगा नदी प्रणाली

ब्रह्मपुत्रा व बराक या नद्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या ईशान्य भारतातील प्रमुख नद्या असून, त्या निर्मिती अवस्थेतच आहेत. १७८७ च्या महापुराच्या आधीच्या काळात तिस्ता ही गंगेची उपनदी होती; पण महापुराने पात्र बदलल्यामुळे ती ब्रह्मपुत्रेला येऊन मिळाली. पावसाळयात ब्रह्मपुत्रेला वारंवार येणाऱ्या महापुरांमुळे आसाम खोऱ्यात मोठी वित्त व जीवित हानी होते. आसामध्ये ब्रह्मपुत्रा नदीपात्रातील माजुली हे बेट जगातल्या नदीपात्रातील बेटांपैकी सर्वांत मोठे बेट समजले जाते. ब्रह्मपुत्रेला उत्तर किनाऱ्यावरून मानस, संकोश, तिस्ता, दिबांग, सुबनसिरी, कामेंग, रायडक या उपनद्या; तर दक्षिणा किनाऱ्यावरून धनसिरी, लोहित, दिबांग, कोपिली, कुष्णाई, कुलसी, कलांग, बुहीदिहांग या उपनद्या मिळतात. त्यातील महत्त्वाच्या उपनद्यांची माहिती पुढीलप्रमाणे :

सुबनसिरी

या नदीचा उगम तिबेटमध्ये होत असून, नदीची एकूण लांबी ४४२ कि.मी. आहे. ही नदी आसाममध्ये ब्रह्मपुत्रेला उजव्या बाजूने मिळते. ही नदी ब्रह्मपुत्रा नदीची सर्वांत मोठी उपनदी असून, या नदीच्या नावाचा अर्थ सोन्याची नदी असा होतो. ही नदी अरुणाचल प्रदेश व आसाम या दोन भारतीय राज्यांतून वाहते आणि मेरी व अबोर टेकड्यांना वेगळे करते.

कामेंग नदी

या नदीचा उगम अरुणाचल प्रदेश राज्यातील तमाम जिल्ह्यात होतो. एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध असणारे काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान व पखालू अभयारण्य या नदीच्या क्षेत्रात आहे. ही नदीही अरुणाचल प्रदेश व आसाम या दोन भारतीय राज्यांमधून वाहते आणि आसाममधील तेजपूरजवळ ब्रह्मपुत्रा नदीला उजव्या बाजूने मिळते.

मानस नदी

तिबेटमध्ये या नदीचा उगम होत असून, या नदीची एकूण लांबी ३७० कि.मी. आहे. तसेच नदी बृहद् हिमालयाला छेदून वाहते. ती भूतान व भारत या दोन देशांमधून वाहते. मानस राष्ट्रीय उद्यान या नदीच्या क्षेत्रात येते.

तिस्ता नदी

तिस्ता नदी सिक्कीममधील सर्वांत मोठी नदी असून, ती सिक्कीममध्ये ‘त्सो ल्हामो’ सरोवरातून उगम पावते आणि दार्जिलिंगमधून वाहते. या नदीला सिक्कीमची जीवनवाहिनी म्हणून ओळखले जाते. रंगीत, सेवक, रंगपो या तिच्या महत्त्वाच्या उपनद्या असून, ती ब्रह्मपुत्रा नदीला बांग्लादेशमध्ये उजव्या बाजूने मिळते. या नदीला पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पूर येत असल्याने आणि गाळाच्या संचयनामुळे या नदीचे पात्र अनेक वेळा बदलले गेले आहे. त्यापैकी १७८७ मध्ये आलेल्या पुरामध्ये तिच्या पात्राचा मार्ग बदलला आणि ती ब्रह्मपुत्रा नदीला येऊन मिळाली. त्याआधी ती गंगेची उपनदी होती.

लोहित नदी

या नदीचा उगम तिबेटमध्ये होत असून, ती मिश्मी टेकड्यांवरून वाहते. या नदीची भारतातील लांबी केवळ २०० कि.मी. एवढीच असून, या नदीचा खूप मोठा प्रवास तिबेटमधून होतो. ‘रक्ताची नदी’ म्हणून ओळखली जाणारी ही नदी वादळी आणि खवळलेली असते. तिचे रक्ताची नदी हे नाव अंशतः लाल मातीमुळे पडले आहे. ती मिश्मी पर्वतरांगांतून वाहते आणि अरुणाचल प्रदेशमध्ये ब्रह्मपुत्रा नदीला डाव्या किनाऱ्यावर मिळते.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारताचा भूगोल : सिंधु नदी प्रणाली

धनसिरी नदी

धनसिरी नदी नागालँडमधील लायसांग पर्वतातून उगम पावत असून, नदीची एकूण लांबी ३५२ कि.मी. आहे. ती आसाम व नागालँड या भारतीय राज्यांमधून वाहणारी प्रमुख नदी असून, नदीचे एकूण पाणलोट क्षेत्र १२२० चौरस किलोमीटर आहे.