सागर भस्मे

मागील एका लेखातून आपण आर. एल. सिंग यांनी भारतीय हवामानाचे कोणत्या आधारावर व कसे वर्गीकरण केले याबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण स्टॅम्पनुसार भारतीय हवामानाचे वर्गीकरण जाणून घेऊ या. भारतात संपूर्णपणे उष्ण कटिबंधीय मान्सून हवामान असले तरी पाऊस आणि तापमान यांसारख्या महत्त्वाच्या हवामान घटकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रादेशिक फरक आहेत. भारतासारख्या विशाल देशासाठी हे अगदी स्वाभाविक आहे. भारतात तापमानाच्या तुलनेत पर्जन्यमानातील तफावत जास्त प्रमाणात दिसून येते. त्यामुळे बहुतांश भूगोलशास्त्रज्ञांनी तापमानापेक्षा पावसाला अधिक महत्त्व दिले आहे.

nashik temperature declined to 13 degree Celsius
नाशिकमध्ये पारा तेरा अंशांवर, जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्रात थंडी का वाढली
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Cloudy over South Madhya Maharashtra and South Konkan Mumbai print news
राज्यात गुरुवारपासून हलक्या सरी; जाणून घ्या, दिल्लीत दाट धुके का पडले
cop 29 climate change conference in baku capital of azerbaijan
विश्लेषण : ‘कॉप २९’ची एवढी चर्चा का?
Air quality deteriorated in Colaba Deonar Kandivali Mumbai news
कुलाबा, देवनार, कांदिवलीमधील हवा ‘वाईट’
Voters in Malabar Hill insist on environment conservation in the wake of assembly elections 2024 mumbai print news
मलबार हिलमधील मतदार पर्यावरण संवर्धनासाठी आग्रही
world environment council lokrang
विळखा काजळमायेचा!

भारताचे हवामान क्षेत्रामध्ये विभाजन करण्याचा पहिला प्रयत्न ब्लॅनफोर्डने १९ व्या शतकाच्या शेवटी केला होता. भारताचे हवामान क्षेत्रामध्ये विभाजन करण्याच्या नंतरच्या प्रयत्नांमध्ये डब्ल्यू. जी. केंद्रू, एल. डी. स्टॅम्प, कोपेन, थॉर्नवेट, जी. टी. त्रिवार्था व जॉन्सन यांचा उल्लेख करावा लागेल. भारतीय भूगोलशास्त्रज्ञांमध्ये सुब्रह्मण्यम (१९५५), भरुचा व शानभाग (१९५७) आणि आर. एल. सिंग (१९७१) यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत.

हेही वाचा – UPSC-MPSC : भूकंप म्हणजे नेमके काय? भारतातील कोणत्या भागाला भूकंपाचा सर्वाधिक धोका असतो?

हवामान क्षेत्राचे स्टॅम्प यांनी केलेले वर्गीकरण (Stamp’s Classification of Climatic Regions) :

देशाला दोन विस्तृत हवामान क्षेत्रांमध्ये विभागण्यासाठी स्टॅम्प यांनी सरासरी मासिक तापमानाचे १८° से. समताप (Isotherm) वापरले. ही समताप रेषा साधारणपणे कमी-अधिक प्रमाणात कर्कवृत्ताच्या समांतर असून, भारताला दोन भागांमध्ये वर्गीकृत करते. १) उत्तरेकडील समशीतोष्ण किंवा खंडीय क्षेत्र व २) दक्षिणेकडील उष्ण कटिबंधीय क्षेत्र.

  • स्टॅम्प यांनी पावसाचे प्रमाण आणि तापमान यावर अवलंबून ११ प्रदेशांमध्ये भारताला वर्गीकृत केले आहे :

समशीतोष्ण किंवा महाद्वीपीय भारत खालील पाच प्रदेशांमध्ये विभागला गेला आहे :

१) हिमालयीन प्रदेश (The Himalayan Region) : या प्रदेशात संपूर्ण हिमालय पर्वतीय क्षेत्र समाविष्ट आहे; ज्यात पश्चिमेकडून पूर्वेकडे जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडचा मोठा भाग, पश्चिम बंगालचा उत्तरेकडील डोंगराळ प्रदेश, सिक्कीम व अरुणाचल प्रदेश यांचा समावेश आहे. हिवाळा आणि उन्हाळा तापमान अनुक्रमे ४°-७° से. आणि १३°-१८° से. आहे. वरचे भाग कायमस्वरूपी बर्फाखाली असतात. पूर्वेला सरासरी वार्षिक पर्जन्यमान २०० सेंटिमीटरपेक्षा जास्त आहे; परंतु पश्चिमेला ते खूपच कमी आहे. पश्चिमेला शिमला आणि पूर्वेला दार्जिलिंग ही त्याची प्रातिनिधीक शहरे आहेत.

२) उत्तर-पश्चिम प्रदेश (The North-Western Region) : यात पंजाबचा उत्तरेकडील भाग आणि जम्मू-काश्मीरच्या दक्षिणेकडील भागांचा समावेश आहे. हिवाळा आणि उन्हाळा या ऋतूंमधील तापमान अनुक्रमे १६° से. आणि २४° से. आहे. अमृतसर हे त्याचे प्रातिनिधीक शहर आहे.

३) शुष्क सखल जमीन (The arid low land) : हा विस्तीर्ण कोरडा प्रदेश आहे; ज्यामध्ये राजस्थानचे थार वाळवंट, हरियाणाचा दक्षिण-पश्चिम भाग व गुजरातचे कच्छ यांचा समावेश होतो. हिवाळ्यात सरासरी तापमान १६° से. ते २४° से.पर्यंत बदलते; जे उन्हाळ्यात ४८° से.पर्यंत वाढू शकते. जयपूर हे त्याचे प्रातिनिधीक शहर आहे. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ४० सेंमीपेक्षा जास्त नाही.

४) मध्यम पावसाचा प्रदेश (The region of moderate rainfall) : पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, केंद्रशासित प्रदेश दिल्ली, मध्य प्रदेशचे उत्तर-पश्चिम पठार क्षेत्र व पूर्व राजस्थान हे सरासरी पर्जन्यमानाचे क्षेत्र आहे; ज्यात वार्षिक ४० ते ८० सें.मी. पाऊस पडतो. जानेवारी आणि जुलैमध्ये तापमान अनुक्रमे १५°-१८° से. आणि ३३°-३५° से. असते. सर्वाधिक पाऊस उन्हाळ्यात होतो. दिल्ली हे त्याचे प्रातिनिधीक शहर आहे.

५) संक्रमणकालीन क्षेत्र (The transitional zone) : पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पश्चिमेकडील सरासरी पावसाचे क्षेत्र व पूर्वेकडील मुसळधार पावसाच्या क्षेत्रादरम्यानच्या प्रदेशाचा संक्रमणकालीन क्षेत्राचा समावेश होतो. या झोनमध्ये सरासरी वार्षिक पाऊस १००-१५० सें.मी. जानेवारी आणि जुलैचे तापमान १५°-१९° से. आणि ३०°-३५° से.दरम्यान असते. पाटणा हे या झोनचे प्रातिनिधीक शहर आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारतातील खारफुटीची वने कुठं आढळतात? या वनांची वैशिष्ट्ये कोणती?

उष्ण कटिबंधीय भारत खालील सहा प्रदेशांमध्ये विभागला गेला आहे :

६) खूप जास्त पावसाचा प्रदेश (Region of very heavy rainfall) : या भागात वार्षिक २०० सेंटिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो आणि त्यात मेघालय, आसाम, त्रिपुरा, नागालँड, मिझोरामचा मोठा भाग समाविष्ट होतो. जानेवारीमध्ये तापमान १८° से.च्या आसपास राहते आणि जुलैमध्ये ३२°-३५° से.पर्यंत वाढते. मेघालयातील चेरापुंजी आणि मावसिनराम येथे अनुक्रमे १,१०२ सेंमी आणि १,२२१ सेंमी वार्षिक पाऊस पडतो.

७) अतिवृष्टीचा प्रदेश (The region of heavy rainfall) : यामध्ये पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, झारखंड, आंध्र प्रदेशचा किनारा यांचा समावेश होतो. येथे वार्षिक १००-२०० सेंमी पाऊस पडतो आणि त्यांना अतिवृष्टीचे क्षेत्र म्हटले जाते. हा पाऊस प्रामुख्याने बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या मान्सून वाऱ्यांद्वारे येतो. पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना पावसाचे प्रमाण कमी होते. जानेवारी आणि जुलैचे तापमान अनुक्रमे १८-२४° से. ते २९°-३५° से.पर्यंत असते. कोलकाता हे या प्रदेशाचे प्रातिनिधीक शहर आहे.

८) मध्यम पावसाचा प्रदेश (Region of moderate rainfall) : यामध्ये प्रामुख्याने पश्चिम आणि पूर्व घाटांमधील त्या भागांचा समावेश होतो; ज्यात वार्षिक ५०-१०० सेंमी पाऊस पडतो. पाऊस तुलनेने कमी आहे. कारण- हा प्रदेश पश्चिम घाटाच्या पर्जन्यछायेत येतो.

९) कोकण किनारा (The Kokan coast) : उत्तरेकडे मुंबईपासून दक्षिणेला गोव्यापर्यंत विस्तारलेल्या कोकण किनारपट्टीवर दक्षिण-पश्चिम मान्सूनच्या अरबी समुद्राच्या शाखेद्वारे वार्षिक २०० सेंमीपेक्षा जास्त पाऊस पडतो. या ठिकाणी तापमान बऱ्यापैकी उच्च राहते आणि २४°-२७° से.पर्यंत बदलते. अशा प्रकारे तापमानाची वार्षिक श्रेणी खूप कमी आहे. मुंबई हे या प्रदेशाचे प्रातिनिधीक शहर आहे.

१०) मलबार किनारा (The Malabar coast) : हा किनारा गोव्यापासून कन्नियाकुमारीपर्यंत पसरलेला आहे आणि येथे २५० सेंमीपेक्षा जास्त वार्षिक पाऊस पडतो. हा पाऊस प्रामुख्याने अरबी समुद्रातून येणाऱ्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांद्वारे आणला जातो आणि वर्षातून सुमारे सहा महिने चालू राहतो. तापमान २७° से.च्या आसपास राहते आणि तापमानाची वार्षिक श्रेणी केवळ ३° से. असते.

११) तमिळनाडू (Tamilnadu) : यात तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या लगतच्या भागांचा समावेश आहे. पाऊस १०० ते १५० सेंमीपर्यंत बदलतो आणि मुख्यतः नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये उत्तर-पूर्वेकडून माघार घेणार्‍या मान्सूनमुळे होतो. तापमान कुठे तरी २४° सेल्सिअसच्या आसपास राहते. उन्हाळा आणि हिवाळ्याच्या तापमानात फारसा बदल होत नाही आणि तापमानाची वार्षिक श्रेणी केवळ ३° से. असते. चेन्नई हे या प्रदेशाचे प्रातिनिधीक शहर आहे.