सागर भस्मे
मागील लेखात आपण भारतातील रस्ते वाहतूक व्यवस्थेची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि त्यांचा विकास करण्यासाठी भारतीय सरकारने उचललेली ठोस पावले यांची माहिती घेतली. या लेखातून आपण भारतातील आंतरराष्ट्रीय रस्ते व राष्ट्रीय रस्ते आणि त्यांचे वर्गीकरण व वितरण याविषयी जाणून घेऊ.
रस्त्यांचे वर्गीकरण (Classification of roadways)
रस्त्यांसंबंधीच्या नागपूर योजनेचे मुख्य महत्त्व हे आहे की, त्यात कार्यात्मक आधारावर रस्त्यांचे चार श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. १) राष्ट्रीय महामार्ग, २) राज्य महामार्ग, ३) जिल्हा रस्ते व ४) गाव रस्ते या त्या चार श्रेणी आहेत.
राष्ट्रीय महामार्ग (National Highways) :
केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग (CPWD) द्वारे बांधलेले आणि देखभाल केलेले मुख्य रस्ते राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखले जातात. आंतरराज्यीय व धोरणात्मक संरक्षण हालचालींसाठी आहेत. विविध राज्यांच्या राजधान्या, मोठी शहरे, महत्त्वाची बंदरे, मोठे रेल्वे जंक्शन व देशाचे सीमावर्ती भाग या रस्त्यांनी जोडलेले आहेत. राष्ट्रीय महामार्गांची लांबी १९५१ मध्ये १९,८११ किमी वरून २०१३ मध्ये ७९,११६ किमी इतकी वाढली. राष्ट्रीय महामार्ग रस्ते वाहतुकीची जीवनरेखा बनवतात आणि भारतातील रस्ते प्रणालीची चौकट तयार करतात. एकूण रस्त्यांच्या लांबीमध्ये राष्ट्रीय महामार्गांची टक्केवारी १९५१ मधील ४.९५ टक्क्यांवरून २०१७ मध्ये दोन टक्क्यांपर्यंत कमी झाली असली तरी ते भारताच्या रस्त्यांच्या वाहतुकीच्या जवळपास ४० टक्के वाहतूक करतात. महामार्गाच्या कॅरेज वे रुंदीच्या आधारे राष्ट्रीय महामार्गांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. साधारणपणे एका मार्गिकेची रुंदी एकेरी मार्गिकेच्या बाबतीत ३.७५ मीटर आणि बहुमार्गिकेच्या बाबतीत ३.५ मीटर प्रतिमार्गिका इतकी असते.
हेही वाचा – UPSC-MPSC : भारतात रस्ते वाहतुकीच्या विकासासाठी कोणत्या योजना राबवण्यात आल्या? त्यांची वैशिष्ट्ये कोणती?
गोल्डन चतुर्भुज सुपर हायवे (Golden Quadrilateral Super Highway)
राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प (NHDP)ने देशात रस्तेबांधणीचा एक मोठा कार्यक्रम हाती घेतला आहे. २ जानेवारी १९९९ रोजी सुरू करण्यात आलेला हा देशातील रस्तेविकासाचा आतापर्यंतचा सर्वांत मोठा कार्यक्रम आहे. हा प्रकल्प भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI– National Highways Authority of India)द्वारे १ ते ६ फेज / टप्प्यांमध्ये राबविण्यात येत आहे. NHDP मधील दोन घटक खालीलप्रमाणे :
फेज १- गोल्डन चतुर्भुज (Golden Quadrilateral) : हा दिल्ली – मुंबई – चेन्नई – कोलकाता – दिल्ली यांना सहा लेन सुपर हायवेने जोडणारा राष्ट्रीय महामार्ग आहे. या मार्गाची एकूण लांबी ५,८४६ किमी आहे. मार्गाच्या चारही बाजूंची लांबी वेगवेगळी आहे. म्हणून या मार्गाला चतुर्भुज /चौकोन म्हणून संबोधले जाते. दिल्ली ते मुंबईदरम्यान चतुर्भुजाची बाजू १,४१९ किमी लांब; तर मुंबई ते चेन्नई १,२९० किमी लांब आहे. चेन्नई ते कोलकाता ही सर्वांत लांब बाजू आहे; जी १,६८४ किमी लांब आहे. त्याचप्रमाणे कोलकाता ते दिल्लीदरम्यानची बाजू १,४५३ किमी लांब आहे.
फेज २- उत्तर-दक्षिण कॉरिडॉर (North-South corridor) : श्रीनगर ते कन्याकुमारी यासह कोची-सालेम आणि पूर्व-पश्चिम कॉरिडॉरमध्ये आसाममधील सिल्चर आणि गुजरातमधील पोरबंदर यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांचा समावेश होतो. या प्रकल्पाची एकूण लांबी सुमारे ७,३०० किमी आहे. त्यापैकी उत्तर-दक्षिण कॉरिडॉर ४,००० किमी आणि पूर्व-पश्चिम कॉरिडॉर ३,३०० किमी लांबीचा आहे.
राष्ट्रीय महामार्गांचे वितरण (Distribution of National Highways) : महत्त्वाच्या ठिकाणांना एकमेकांशी जोडणारे अनेक राष्ट्रीय महामार्ग सर्व दिशांनी देशभरात धावतात. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा शेरशाह सुरी मार्ग राष्ट्रीय महामार्ग-१ म्हणून ओळखला जातो. तो दिल्ली आणि अमृतसरला जोडतो. राष्ट्रीय महामार्ग-२ दिल्ली आणि कोलकाता यांना जोडतो. राष्ट्रीय महामार्ग-३ आग्रा ते मुंबईदरम्यान ग्वाल्हेर, इंदूर व नाशिकमार्गे जातो. राष्ट्रीय महामार्ग-७ हा सर्वांत लांब आहे; जो जबलपूर, नागपूर, हैदराबाद, बेंगळुरू व मदुराईमार्गे २,३२५ किमी अंतर पार करीत वाराणसीला कन्याकुमारीशी जोडतो. या ७ व्या राष्ट्रीय महामार्गाचा नवीन क्रमांक ४४ केला गेला आहे. राष्ट्रीय महामार्ग ५ आणि १७ अनुक्रमे पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर समांतर स्थित आहेत. राष्ट्रीय महामार्ग-१५ राजस्थानच्या वाळवंटातील सीमा रस्त्याचे (border roadways) प्रतिनिधित्व करतो. तो कांडला, जैसलमेर, बिकानेरमधून जातो आणि पंजाबमधील सीमारस्त्याला जोडतो. उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रीय महामार्गांची लांबी सर्वांत जास्त म्हणजे एकूण ८,४८३ किमी आहे. त्यानंतर राजस्थान (७,९०६ किमी), महाराष्ट्र (७,४३४ किमी), कर्नाटक (६,५०२ किमी), आंध्र प्रदेश (५,२३२ किमी) यांचा क्रमांक लागतो.
भारतमाला प्रकल्प (Bharatmala project)
३१ जुलै २०१५ रोजी या प्रकल्पाची स्थापना झाली. किनारी भाग, सीमाभाग, मागास भाग, धार्मिक स्थळे, पर्यटनस्थळे यांचे बांधकाम / पुनर्वसन आणि सुमारे १,५०० पुलांचे रुंदीकरण आणि २०० रेल्वे ओव्हरब्रिज (ROBs) / रेल्वे पुलांखालील रस्ते नेटवर्क सुधारणे हा आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गांवर (NHs) सुधारणा, नव्याने घोषित राष्ट्रीय महामार्गांमध्ये सुधारणा, जिल्हा मुख्यालयांना कनेक्टिव्हिटी प्रदान करणे, चारधाम (केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री व उत्तराखंडमधील गंगोत्री)साठी कनेक्टिव्हिटी सुधारणा कार्यक्रम ही या प्रकल्पाची उद्दिष्टे आहेत.
या योजनेसाठी अंदाजे १० ट्रिलियन इतकी एकूण गुंतवणुक करण्यात आली होती. सरकारी रस्ता प्रकल्पासाठी केली गेलेली आतापर्यंतची ही सर्वांत मोठी गुंतवणूक होती. ‘भारतमाला’ प्रकल्पामध्ये सुमारे ५१,००० किमी लांबीच्या रस्त्यांच्या विकासाचा समावेश आहे; ज्यामध्ये आर्थिक कॉरिडॉर, किनारी रस्ते व द्रुतगती मार्ग यांचा समावेश आहे आणि टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणी केली जाईल.
सरकारने ‘भारतमाला’ कार्यक्रमांतर्गत सीमावर्ती भागांना जोडणारे २८,४०० किमी लांबीचे महामार्ग बांधण्यासाठी, आंतरराष्ट्रीय बंदर आणि किनारी कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी, तसेच महत्त्वाच्या आर्थिक आणि व्यावसायिक केंद्रांना जोडणारे महामार्ग वा कॉरिडॉर सुधारण्यासाठी, त्याशिवाय किमान ८०० किमी द्रुतगती मार्गांच्या निर्मितीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. मुख्य कॉरिडॉरवरील वाहतूक प्रवाहाचा वेग सुधारणे हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
हेही वाचा – UPSC-MPSC : भारतीय रेल्वे किती झोनमध्ये विभागण्यात आली आहे? त्यांची वैशिष्ट्ये कोणती?
सेतू भारतम कार्यक्रम (Setu Bharatam Programme)
४ मार्च २०१६ रोजी सुरू करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी राष्ट्रीय महामार्गांवर सुरक्षित आणि अखंड प्रवासासाठी पूल बांधावयाचे आहेत. २०१९ पर्यंत सर्व राष्ट्रीय महामार्ग रेल्वे क्रॉसिंगमुक्त करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. रेल्वे क्रॉसिंगवर वारंवार होणारे अपघात आणि जीवितहानी रोखण्यासाठी असे केले जात आहे. या कार्यक्रमांतर्गत २०,८०० कोटी रुपये खर्चून, २०८ रेल्वे ओव्हर ब्रिज (ROBs) आणि रेल्वे अंडर ब्रिज (RUBS) बांधण्याची संकल्पना आहे. या पुलांची संख्या आंध्र प्रदेश (३३), आसाम (१२), बिहार (२०), छत्तीसगड (५), गुजरात (८), हरियाणा (१०), हिमाचल प्रदेश (५), झारखंड (११) इत्यादी अशी आहे.
आंतरराष्ट्रीय महामार्ग (International Highways)
ज्या रस्त्यांना जागतिक बँकेकडून वित्तपुरवठा केला जातो आणि जे भारताला शेजारील देशांशी जोडतात, त्यांना आंतरराष्ट्रीय महामार्ग म्हणतात. अशा महामार्गांचे दोन वर्ग आहेत. (१) शेजारील देशांच्या राजधान्यांना जोडणारे मुख्य मार्ग. या श्रेणीतील दोन महत्त्वाचे मार्ग आहेत. लाहोर-मंडाले (म्यानमार) मार्ग (अमृतसर-दिल्ली-आग्रा-कोलकाता-गोलाघाट-इंफाळ) आणि बार्ही-काठमांडू रस्ता. (२) प्रमुख नेटवर्क असलेली शहरे, बंदरे इ. जसे की, आग्रा-मुंबई रस्ता, दिल्ली-मुलतान रस्ता, बेंगळुरू-चेन्नई रस्ता, गोलाघाट-लेडो रस्ता इत्यादी मार्गांचा समावेश यात होतो.