सागर देवेंद्र भस्मे
हिमालय आशियातील अनेक देशांमध्ये पसरलेली एक भव्य पर्वतश्रेणी आहे. हिमालय या शब्दाची उत्पत्ती संस्कृतमधील हिम म्हणजे बर्फ आणि आलय म्हणजे वास्तव्य म्हणजे हिमाचे आलय असलेला प्रदेश यावरून हिमालय हे नाव पडल्याचे मानले जाते. हिमालय पर्वताची निर्मिती स्थरित आणि रूपांतरित खडकांच्या रचना असलेल्या प्रदेशात वलीकरण क्रिया होऊन झालेली आहे. त्यामुळेच हिमालयाला ‘वली पर्वत’ असेही म्हणतात. वली पर्वत म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत भागातून जे ऊर्जेचे वहन होते, त्या ऊर्जा लहरीमुळे मृदू खडकाच्या थरांवर एकमेकांच्या दिशेने दाब पडून वळ्या निर्माण होतात आणि भूमीचा पृष्ठभाग वर उचलला जातो आणि वली पर्वताची निर्मिती होते.
अल्फ्रेड वेगनर यांच्या भूखंडवहन सिद्धांतानुसार सुरुवातीला अस्तित्वात असलेल्या पॅन्जिया महाखंडाचे विखंडन होऊन उत्तरेकडील लोरेशिया म्हणजे अंगारालॅण्ड व दक्षिणेकडील गोंडवाना भूमी अशी दोन भूखंडे अस्तित्वात आली आणि कालांतराने गोंडवानाभूमी उत्तरेकडे सरकू लागल्यामुळे दोन्ही खंड एकमेकाजवळ येऊ लागले. परिणामतः टेथिसमधील गाळाच्या मृदू खडकावर दाब पडून तेथील भूकवचाला वळ्या पडू लागल्या. अंगारा भूमीच्या दाबामुळे टेथिस समुद्राचा तळ हळूहळू वर उचलला जाऊ लागला आणि दाब जसा वाढत गेला तसा वळ्या उंचावत गेल्या आणि कालांतराने हिमालय पर्वत या घडीच्या पर्वताची निर्मिती झाली.
हिमालय पर्वतरांग आशियातील भारत, नेपाळ, भूतान, चीन आणि पाकिस्तान या पाच देशांमध्ये पसरलेली आहे, पश्चिम पूर्व पसरलेल्या या पर्वतरांगांची लांबी सुमारे २५०० किलोमीटर आणि रुंदी सुमारे १५० ते ४०० किमीपर्यंत आहे. तसेच यामध्ये जगातील सर्वोच्च शिखरांपैकी असलेल्या माऊंट एव्हरेस्ट, कांचनगंगा, के-२ आणि अन्नपूर्णा या शिखरांचा समावेश होतो.
भारताच्या उत्तर सरहद्दीवर पश्चिम-पूर्वेस पसरलेली हिमालय सलग पर्वतरांग असून तिच्या उत्तरेस विस्तीर्ण असे तिबेटचे पठार तर दक्षिणेस उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे. पश्चिमेस काश्मीरमध्ये सिंधू नदी जिथे वळण घेते तिथपासून किंवा नंगा पर्वत शिखरपासून पूर्वेस ब्रह्मपुत्रा नदी एक मोठे वळण घेऊन भारतात प्रवेश करते. तिथपर्यंत किंवा तेथील नामचा बरवा शिखरापर्यंतच्या प्रदेशाचा समावेश हिमालय पर्वत रांगेत केला जातो. प्राकृतिकदृष्ट्या हिमालय पर्वतश्रेणींमध्ये पश्चिम पूर्व दिशेस एकमेकांना समांतर पसरलेल्या तीन पर्वतश्रेणी आहेत. उत्तरेकडून अनुक्रमे बृहद् हिमालय किंवा हिमाद्री, लेसर हिमालय किंवा हिमाचल आणि शिवालिक टेकड्या यांचा समावेश होतो.
बृहद् हिमालय उत्तरेकडील सलग, अत्युच्च श्रेणी आहे. या श्रेणीची सरासरी उंची ६ हजार मीटर असून माउंट एव्हरेस्ट या जगातील सर्वोच्च शिखराचा समावेश याच रांगेत होतो. तसेच कांचनगंगा , धौलागिरी, नंगा पर्वत, नंदादेवी आणि नामचा बरवा या महत्त्वाच्या शिखरांचा समावेश या हिमालयात होतो. या श्रेणीमध्ये हिमाच्छादित व तीव्र उताराची खडबडीत शिखरे, हिमनद्या, खोल घळ्या, समशीतोष्ण कटिबंधीय अल्पाइन प्रकारची वने यांचा समावेश होतो.
हिमाचल हिमालय किंवा लेसर हिमालय ही पर्वतरांग शिवालिक रांगेच्या उत्तरेस आणि बृहद् हिमालयाच्या दक्षिणेस हिमाद्रीस समांतर अशी ७६ किमी रुंदीची ही श्रेणी आहे. या पर्वतरांगेत कुलु, मनाली आणि कांगराची खोरी ही पर्यटकांची खास आकर्षणे ठरली आहेत. या रांगेची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ४ हजार ५०० मीटरपर्यंत आहे . ही रांग उंचसखल आहे आणि या पर्वतरांगांमध्ये काश्मीरमधील पीर पंजाल व हिमाचल प्रदेशातील धौलाधार या रागांचा समावेश होतो. सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग म्हणजे शिवालिक टेकड्या किंवा बाह्य हिमालय. शिवालिक रांगेची सरासरी उंची सुमारे ६०० ते १२०० मीटरच्या दरम्यान असून रुंदी १० ते ५० किमी आहे. शिवालिक आणि लघू हिमालयाच्या मधे अनेक दऱ्या आहेत. या दऱ्यांना ‘इून’ असे म्हणतात उदा. डेहराडून , कोटलीडून, पाटलीइून इत्यादी.
ज्या प्रकारे प्राकृतिकदृष्ट्या हिमालयाचे पर्वत श्रेणीमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे हिमालयाचे प्रादेशिक विभागानुसार वर्गीकरण केले जाते; यामध्ये पंजाब हिमालय किंवा काश्मीर हिमालय , कुमाऊँ किंवा गडवाल हिमालय, नेपाळ हिमालय आणि आसाम हिमालय किवा पूर्व हिमालय यांचा समावेश होतो.
यामधील पंजाब हिमालयाचा विस्तार हा सिंधू व सतलज नदी दरम्यान झालेला आहे. यामध्ये धौलाधार, पीर पंजाल, काराकोरम, झास्कर रांगेचा समावेश होतो. कुमाऊँ हिमालयाचा विस्तार सतलज ते काली नदी या नदीच्या दरम्यान झालेला आहे. यामध्ये नंदादेवी सर्वोच्च शिखर असून त्याशिवाय द्रोणागिरी, त्रिशूल , कामेत, बद्रीनाथ, केदारनाथ, आणि गंगोत्री या शिखराचा समावेश होतो. नेपाळ हिमालयाचा विस्तार तिस्ता नदी आणि काली नदीच्या दरम्यान झाला आहे. सिक्किम व चुंबी खोरे यादरम्यान व्यापारी मार्ग असलेल्या नथु-ला-खिंडीचा समावेश यामध्ये होतो. हिमालयातील सर्वात पूर्वेकडील आसाम हिमालयाचा विस्तार तिस्ता ते ब्रह्मपुत्रा नदीच्या दरम्यान झालेला आहे. या पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर ‘नामचा बरवा’ आहे. या हिमालयामध्ये सिक्किममधील जेलपला आणि अरुणाचल प्रदेशातील बमला या पर्वत खिंडीमधून तिबेटची राजधानी ल्हासाकडे जाणारे महत्त्वाचे मार्ग आहेत. जोरदार पावसामुळे या पर्वतरांगांची फार मोठ्या प्रमाणात झीज होते.