सागर भस्मे
मागील लेखातून आपण नदीच्या अपक्षरण कार्यामुळे तयार होणाऱ्या भूरूपांबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण नदीच्या निक्षेपनाने तयार होणाऱ्या भूरूपांविषयी जाणून घेऊया.
पर्वतपदीय मैदान (Piedront Plains)
पर्वतीय मैदान म्हणजे ‘पायमॉन्ट’. हा इटालियन शब्द असून पाइडे या शब्दावरून आला आहे. याचा अर्थ पाय आणि मॉन्ट”, म्हणजे ‘पर्वत’ असा होतो. पायडमॉन्ट मैदान हा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेला जमिनीचा सखल भाग असून या भागाचा वापर शेती आणि इतर वापरासाठी केला जातो. या भागाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे सौम्य उतार, सुपीक माती आणि मुबलक जलस्त्रोत आहेत.
हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : नदीच्या अपक्षरणामुळे भूरूपे कशी तयार होतात? त्याचे प्रकार कोणते?
जलोढ शंकू (Alluvial Cone)
पर्वतीय भूभाग आणि दरी किंवा मैदाने यांसारखे सखल प्रदेशातील जागेमध्ये जलोढ शंकू तयार होतात. पर्वतातून उगम पावणार्या आणि जलद वाहणार्या नद्यांद्वारे वाळू, खडी आणि दगड यांसारखा गाळ वाहून नेला जातो. जसजशी नदी सपाट, कमी उंच भागात प्रवेश करते, तसतसा तिचा वेग कमी होतो, ज्यामुळे ती गाळ प्रभावीपणे वाहून नेण्याची क्षमता गमावते. परिणामी, गाळ नदीच्या मुखावर स्थिरावण्यास आणि जमा होण्यास सुरुवात होते. गाळाच्या शंकूचा पृष्ठभाग सामान्यत: असमान असतो, ज्यामध्ये विविध प्रकारच्या गाळाचे आकार संपूर्ण क्षेत्रामध्ये वितरीत केले जातात.
जलोढ पंख/पंखाच्या आकाराची मैदाने (Alluvial Fan)
ही मैदाने उंच पर्वत किंवा टेकड्यांच्या पायथ्याशी तयार होतात. जेव्हा गाळाने भरलेले पाणी जलद गतीने सपाट भूभागावर पोहोचल्यावर अचानक मंद होते आणि जसजसा पाण्याचा वेग कमी होतो, तसतसे ते पाणी गाळाचा भार वाहून नेण्याची क्षमता गमावते, ज्यामुळे गाळ पंखासारख्या आकारात जमा होतो. यापासून तयार होणाऱ्या भूरूपास पंखाच्या आकाराची मैदाने (जलोढ पंख) असे म्हणतात. जलोढ पंखे इरोजन शक्ती आणि लँडस्केपच्या नैसर्गिक उत्क्रांतीमधील गतिशील परस्पर संवादाचा पुरावा म्हणून काम करतात.
पूर तट ( Natural levees )
पुराचे पाणी नदीच्या काठावरून ओसंडून वाहत असताना ते गाळ वाहून नेतात आणि जवळच्या मैदानात जमा करतात. लागोपाठच्या पूर चक्रांमध्ये, हे निक्षेप तयार होतात आणि पूर तट म्हणून ओळखल्या जाणार्या उंच कड्यांची निर्मिती होते. पूर तट म्हणजे नदीला पूर आल्यानंतर आणि ओसरल्यानंतर नैसर्गिकरित्या तयार झालेले कडे आहेत. नैसर्गिक तटातील साठ्यांमध्ये चिखल, वाळू आणि दगड असतात. पाण्याची नैसर्गिक हालचाल नदीच्या पात्रापेक्षा उंच असलेल्या नदीच्या काठावर गाळ बाजूला ढकलून एक कडा तयार करते. नदीच्या प्रवाहाला नैसर्गिकरित्या समांतर बनवलेल्या कडेमुळे ते प्रवाहाला दिशा देण्यासही मदत करतात.
जलोढ मैदान (Flood Plain)
ज्यावेळी नदी पूर अवस्थेत असते, त्यावेळी काठावरून बाहेर वाहणाऱ्या पाण्याचा वेग नदीतील वेगापेक्षा कमी असतो, त्यामुळे पाण्याबरोबर वाहणारा गाळ नदीकाठच्या सभोवतांच्या प्रदेशात जमा होतो. हीच प्रक्रिया दरवर्षी चालू राहते आणि गाळाच्या निक्षेपणामध्ये भर पडून विस्तृत असे जलोढ मैदान तयार होते. पूर मैदाने शेतीसाठी सुपीक माती देतात, ज्यामुळे संपूर्ण मानवी लोकसंख्येचे पोषण होते.
हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : खडकाचे अपक्षय होणे म्हणजे काय? अपक्षयाचे प्रकार कोणते?
त्रिभुज प्रदेश ( Delta Region)
नदी जेव्हा समुद्रास अथवा सरोवरास मिळते, तेव्हा नदीच्या मुखाशी गाळाचा सपाट प्रदेश निर्माण होतो, त्यास त्रिभुज प्रदेश म्हणतात. त्रिभुज म्हणजे त्रिकोणी प्रदेश त्याला इंग्रजीत डेल्टा असे म्हणतात. कारण तो डेल्टा या आकारासारखा दिसतो. नदीचे पाणी ज्यावेळेस समुद्राला मिळणार असते, त्या ठिकाणी म्हणजे नदीच्या मुखाशी उतार कमी असल्याने आणि पाण्याचा प्रवाह संथ झाल्याने सर्व गाळ नदी वाहू शकत नाही. त्यामुळे पात्रातच गाळ साचल्याने मार्गाचे मुख भरून येते आणि नदी दुसऱ्या मार्गाने समुद्राला मिळते. कालांतराने दुसर्या मार्गाचे मुखसुद्धा भरून आल्याने नदी तिसऱ्या मार्गाने समुद्राला मिळते. त्यामुळे नदी बहुमुखी बनत जाते. या मुखप्रवासास उपनद्या असे म्हणतात. जेव्हा उपनद्यांना फाटे फुटतात, तेव्हा त्रिभुज प्रदेशाची सुरुवात होते. काही उपमुख नद्या खोल पाण्याच्या तर काही गाळाने भरलेल्या दिसतात. त्रिभुज प्रदेश निर्मितीसाठी नदी प्रवाहाची लांबी आणि तिला येऊन मिळणाऱ्या उपनद्यांची संख्या जास्त असावी लागते. त्रिभुज प्रदेशाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात; एक ‘पंजा आकार त्रिभुज प्रदेश’ व दुसरा ‘धनुष्यकार त्रिभुज प्रदेश.’ पंजा आकार त्रिभुज प्रदेशाची निर्मिती गंगा नदीने, तर धनुष्यकार त्रिभुज प्रदेशची निर्मिती नाईल, नायजर, सिंधू नदीने तयार केली आहे.