सागर भस्मे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील लेखातून आपण वाऱ्याच्या अपक्षरण कार्यामुळे निर्माण होणाऱ्या भूरूपांविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण वाऱ्याच्या निक्षेपणामुळे तयार होणाऱ्या भूरूपांविषयी जाणून घेऊ या.

वालुकागिरी (Depositional Work)

वाऱ्याच्या मार्गात अडथळे आल्यामुळे त्याचा वेग मंदावतो आणि त्याच्यासोबत वाहून आलेल्या वाळूचे निक्षेपण होऊन वाळूच्या लहान टेकड्या निर्माण होतात; त्यांना ‘वालुकागिरी’ असे म्हणतात. या वालुकागिरी टेकड्या सातत्याने स्थलांतरीत होत असतात म्हणून त्यांना ‘लाईव्ह डून’ असे म्हटले जाते. ज्या भागामध्ये वनक्षेत्राचे प्रमाण खूप कमी असते, त्या भागात या प्रकारच्या ‘वालुकागिरी’ आढळतात. या टेकड्यांची सरासरी लांबी सहा किमीपर्यंत असून, जास्तीत जास्त उंची ३०० मीटरपर्यंत असू शकते. काही ठिकाणी वृक्षछदनामुळे या वालुकागिरी स्थिर असतात आणि त्यांचे वाऱ्याच्या दिशेने वहन होत नाही.

हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : नदीच्या निक्षेपनामुळे भूरूपे कशी तयार होतात?

बारखण (Barkhan)

वारे स्वतःबरोबर वाळूचे वहन करताना त्यांच्या निक्षेपण कार्यामुळे वाऱ्याच्या दिशेने काटकोनात चंद्रकोर आकाराच्या वाळूच्या टेकड्या निर्माण होतात. अशा चंद्रकोर टेकड्यांना ‘बारखण’ असे म्हणतात. या टेकड्या मध्यभागी फुगीर असून, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने अंतर्वक्र असतात. बारखणमधील वाऱ्याकडील बाजू मंद उताराची; तर विरुद्ध बाजू तीव्र उताराची असते. जर वाळूचा पुरवठा भरपूर असेल, तर अर्धचंद्राकृती टेकड्यांची निर्मिती होते.

ऊर्मी चिन्हे (Ripple Mark)

वाळवंटी प्रदेशामध्ये पृष्ठभागावर समुद्राच्या लाटांच्या आकारासारखी जी चिन्हे आढळतात, त्यांना ‘ऊर्मी चिन्हे’ असे म्हटले जाते. वाळूच्या पृष्ठभागावर कमी-अधिक प्रमाणात संचयन होऊन ऊर्मी चिन्हांची निर्मिती
झालेली असते. त्यांची उंची दोन ते तीन सेंटिमीटरपेक्षा कमी असून, ही चिन्हे वाऱ्याच्या दिशेने लांबत जातात. वाऱ्याची दिशा बदलल्यास ऊर्मी चिन्हांची दिशा व विस्तार बदलतो आणि वाऱ्याच्या वेगामुळे ऊर्मी चिन्हे नाहीशीसुद्धा होतात.

लोएस मैदान (Loess)

वाऱ्याच्या वेगामुळे वाळवंटातील वाळूचे कण वाळवंटात निक्षेपित होण्याऐवजी वाळवंटाच्या सीमेपलीकडील भागात निक्षेपित होतात. त्या प्रदेशांना ‘लोएस मैदान’ असे म्हणतात. लोएस हे नाव जर्मनीतील अल्सेस भागातील लोएस नावाच्या खेड्यावरून पडले आहे. लोएस मैदानातील मातीचा रंग फिकट पिवळा असून, ही माती सच्छिद्र असते आणि शेतीसाठी या मातीचा उपयोग केला जातो. बेल्जियम, पूर्व फ्रान्स, उत्तर चीन आणि अमेरिकेतील मिसिसिपी भागात लोएस मैदाने आढळतात.

वाळूतट (Sand Levees)

वाऱ्याच्या निक्षेपण कार्यामुळे वाऱ्याच्या समांतर दिशेने वाळूचे निक्षेपण होते आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या भूरूपांना ‘वाळूतट’ म्हटले जाते. वाळूतटाची एकूण लांबी १६० किमी आणि रुंदी ३० किमीपर्यंत असू शकते. सहारा वाळवंटामध्ये अशा प्रकारचे तट मोठ्या प्रमाणात आढळतात.

हेही वाचा – UPSC-MPSC : हिमनदीच्या निक्षेपणातून भूरूपाची निर्मिती कशी होते?

वालुका स्तर (Sheet)

वाऱ्यांनी वाहून आणलेले वाळूचे कण थराच्या स्वरूपात एका विशिष्ट विस्तृत प्रदेशामध्ये साठवले जातात. त्या भागाला ‘वालुका स्तर’ असे म्हणतात.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc indian geography how landforms formed due to wind deposition mpup spb