सागर भस्मे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील लेखातून आपण हिमनदीच्या निक्षेपनातून निर्माण होणाऱ्या भूरूपांविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण वाऱ्याच्या अपक्षरण कार्यामुळे निर्माण होणाऱ्या भूरूपांविषयी जाणून घेऊ या.

अपवाहन विवर / वातगर्त (Blow Out)

वाऱ्यामुळे वाळूचे कण वाळवंटी प्रदेशामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जातात. त्यामुळे पृष्ठभागावर खड्यांची निर्मिती होते याला ‘अपवाहन विवर’ किंवा ‘वातगर्त’, असे म्हणतात. ते तीन मीटर (१० फूट) व्यासाचे आणि एक मीटरपेक्षा कमी खोल असतात; तर काही वातगर्त हे १०० मीटर खोलीपर्यंत असू शकतात. आफ्रिका खंडामध्ये सहारा वाळवंटात मोठ्या प्रमाणात वातगर्त आढळतात. इजिप्तमधील कतारा हा जगातील सर्वांत मोठा खोल वातगर्त असून, त्याची समुद्रसपाटीपासूनची खोली १४० मीटर आहे. त्याचबरोबर अमेरिकेतील व्योमिंग राज्यातील वातगर्ताची रुंदी पाच किमी, लांबी १४ किमी व खोली १०० मीटर आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : वाऱ्याच्या निक्षेपणामुळे भूरूपांची निर्मिती कशी होते?

वातघृष्ट व त्रेनिक खडक (Ventifacts and Dreikanter )

वातघृष्ट ही भूवैज्ञानिक रचना आहे; जी वाऱ्याने वाहणारी वाळू आणि खडकांवरील धूळ यांच्या अपघर्षक क्रियेमुळे निर्माण होते. वाळवंटातील अपक्षयामुळे खडक फुटतात आणि त्यांचे तुकडे पडतात. त्यातील बारीक तुकडे वाऱ्याबरोबर वाहून नेले जातात. हे तुकडे वाऱ्याबरोबर वाहून येत असताना वाळूच्या कणांमुळे खडकावर आघात होऊन, ते गुळगुळीत बनतात. जर अशा वेळी वाऱ्याची दिशा बदलली, तर त्या खडकांची सर्व बाजूंनी झीज होते.

दुसरीकडे त्रेनिक खडक हे एक विशिष्ट प्रकारचे ‘वातघृष्ट’ आहेत. ते आकाराने त्रिकोणी असतात. तसेच ते तीक्ष्ण-धारी पिरॅमिड्ससारखे दिसतात. ही रचना सामान्यत: रखरखीत किंवा वाळवंटी वातावरणात विकसित होते.

भूछत्र खडक (Mushroom Rock)

वाळवंटातील कणांमुळे शिलाखंडाच्या पायथाजवळचा भाग अपघर्षणाने जास्त प्रमाणात झिजतो आणि तो निमुळता होतो. तळभाग व वरच्या भागावर घर्षणाचा फारसा परिणाम होत नाही. कारण- जमिनीशी घर्षण होऊन वाऱ्याचा वेग तळाजवळ कमी झालेला असतो आणि वाळूचे कण जड असल्यामुळे ते खूप उंचीपर्यंतही जात नाहीत. सततच्या वाऱ्याच्या घर्षणामुळे मध्यभाग खूपच बारीक होत जातो आणि खडकाला भूछत्राचा आकार प्राप्त होतो. अशा वैशिष्ट्यपूर्ण आकाराच्या खडकास ‘भूछत्र खडक’ किंवा ‘उत्तल खडक’ असे म्हणतात.

हेही वाचा – UPSC-MPSC : हिमनदीच्या निक्षेपणातून भूरूपाची निर्मिती कशी होते?

जाळीदार खडक (Stone Lattice)

वाऱ्याच्या अपक्षरण कार्यामुळे खडकावरती रेषा किंवा छिद्रे निर्माण होतात. अशा वेळी ते खडक जाळीसारखे दिसतात. त्यामुळे त्याला ‘जाळीदार खडक’ किंवा ‘दगडाळ चालक खडक’ असे म्हणतात. रॉकी व क्रिमिया पर्वतरांगेत अशा प्रकारचे जाळीदार खडक आढळतात.

यारदांग (Yardang)

यामध्ये वाऱ्याच्या अपक्षरण कार्यामुळे मृदू खडकांची मोठ्या प्रमाणात झीज होते; तर कठीण खडक कमी प्रमाणात झिजतो. त्यामुळे मृदू खडकाच्या थरामध्ये खोलगट भाग निर्माण होतो; तर कठीण खडक मात्र जसेच्या तसे राहतात. त्याचा उतार तीव्र होतो. त्यामुळे त्याला ‘यारदांग’, असे म्हणतात. गोबीच्या वाळवंट व अमेरिकेतील अटागामा वाळवंटी प्रदेशात ‘यारदांग’ मोठ्या प्रमाणात आढळतात.

द्वीपगिरी

द्वीपगिरी टेकड्यांची निर्मिती ग्रॅनाईट किंवा नीस प्रकारच्या खडकापासून होते. वाऱ्याच्या अपक्षरण कार्यामुळे मृदू खडक सर्व बाजूंनी मोठ्या प्रमाणात झिजतो आणि खडकाचा उंच भाग शिल्लक राहतो.

हमदा (Hammada)

वाऱ्याच्या अपक्षरण कार्यामुळे ज्या वेळेस वाळवंटामध्ये खडक उघडे पडतात, तेव्हा त्याला हमदा, असे म्हणतात. हमदामध्ये खडकावरच्या वाळूचे कण वाऱ्याबरोबर वाहून नेले जातात.

नैसर्गिक गवाक्ष (Rock Window)

वाळवंटामध्ये वाऱ्याची दिशा जर सतत एका दिशेने असेल, तर एखाद्या खडकावर सतत वाऱ्यातील कणांचा आघात होत असतो. जर या खडकाला छिद्र असेल, तर त्या छिद्राचा आकार मोठा होत जातो आणि एखाद्या कमानीसारखा आकार खडकाला प्राप्त होतो; त्याला ‘नैसर्गिक गवाक्ष’ असे म्हणतात.

हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : नदीच्या अपक्षरणामुळे भूरूपे कशी तयार होतात? त्याचे प्रकार कोणते?

भूस्तंभ (Earth Pillars)

वाळवंटामध्ये मृदू खडकाच्या वर जर कठीण खडक असेल, तर वाऱ्याच्या अपक्षरण कार्यामुळे खालचा मृदू खडक मोठ्या प्रमाणात झिजतो आणि वरचा कठीण खडक तसाच राहतो. त्यामुळे खडकाला जो आकार प्राप्त होतो, त्याला ‘भूस्तंभ’ असे म्हणतात.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc indian geography how landforms formed due to wind erosion mpup spb
Show comments