सागर भस्मे
मागील लेखात आपण भारतातील शिपिंग, कोस्टल शिपिंग आणि मुंबई बंदर व जेएनपीटी बंदराची महिती घेतली. आजच्या लेखातून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर स्थित उर्वरित बंदरांविषयी जाणून घेऊ.
दीनदयाल पोर्ट (कांडला) (Deendayal port)
हे बंदर भुजपासून सुमारे ४८ किमी अंतरावर कच्छच्या खाडीच्या पूर्वेकडे स्थित आहे. हे कांडला क्रीकमध्ये १० मीटरच्या सरासरी खोलीसह एक नैसर्गिक बंदर आहे. पोर्ट सर्व आधुनिक सुविधा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सुसज्ज आहे. कांडला येथे असलेल्या निर्यातीमध्ये क्रूड ऑइल, पेट्रोलियम उत्पादने, खते, अन्नधान्य, मीठ, कापूस, सिमेंट, साखर, खाद्यतेल व स्क्रॅप यांचा समावेश आहे. कांडला बंदराची २३.३ दशलक्ष टनांची एकूण आयात-निर्यात हाताळण्याची क्षमता आहे.
मुंबई बंदरावरील भार हलका करण्यासाठी आणि ते रहदारीमुक्त करण्यासाठी स्वातंत्र्यानंतर हे बंदर विकसित केले गेले होते. १९४७ मध्ये देशाचे विभाजन केल्यामुळे कराची हे बंदर पाकिस्तानकडे सुपूर्द करण्यात आले. त्यामुळे गुजरात किनाऱ्यावर बंदर बांधण्याची आवश्यकता जाणवली. परिणामी हे बंदर १९५१ मध्ये बांधण्यात आले. हे बंदर गुजरातच्या मोठ्या भागांवर, तसेच, राजस्थान, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड व दिल्लीच्या मोठ्या भागांच्या व्यापाराला बळकटी देते. हे पोर्ट रस्ते आणि रेल्वेमार्गाने चांगले जोडलेले आहे.
हेही वाचा – UPSC-MPSC : भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील मुख्य बंदरे आणि त्याची वैशिष्ट्ये भाग – १
मार्मागाव बंदर (Marmagao port )
झुवारी नदीच्या खाडीजवळ स्थित असलेल्या गोवा राज्याचे हे एक महत्त्वाचे बंदर आहे आणि भारताचा परकीय व्यापार हाताळण्यात ते पाचव्या स्थानावर आहे. त्याची किमतीनुसार १६.१ दशलक्ष टन मालवाहू व्यापार हाताळण्याची क्षमता आहे. गोव्यातून लोह-अयस्क (iron ore) निर्यात करणे, लोह धातू, मॅंगनीज, नारळ, काजू, कापूस इत्यादी वस्तू निर्यात केल्या जातात. या बंदराद्वारे आयात फारच कमी करण्यात येते. संपूर्ण गोवा व उत्तर कर्नाटकचा तटीय प्रदेश आणि दक्षिणी महाराष्ट्राच्या भागांवरील या बंदराची हिनटरलँड (आयात-निर्यातीचा प्रदेश) आहे.
नवीन मंगलोर (New Manglore port)
४ मे १९७४ रोजी नवीन मंगलोर चौथे प्रमुख बंदर म्हणून घोषित करण्यात आले आणि ११ जानेवारी १९७५ रोजी औपचारिकपणे या बंदराचे उद्घाटन करण्यात आले. हे गुरपूर नदीच्या उत्तर कर्नाटकच्या किनारपट्टीच्या दक्षिणेकडील टोकाला स्थित एक महत्त्वाचे बंदर आहे.
कोची (Kochhi)
हे भारताच्या पश्चिमेकडील किनाऱ्यावरील आणखी एक नैसर्गिक बंदर असून, ते केरळच्या किनाऱ्यावर आहे. कोचीमध्ये बॅकवॉटर बे (Backwater bay) आहे; ज्यामुळे इथे बंदरनिर्मितीची क्षमता आहे. हे पोर्ट भारतातील दक्षिण-पश्चिम किनाऱ्यावरील मुंबईपासून दक्षिणेकडे ९३० किमी अंतरावर आणि कन्नियाकुमारीच्या उत्तरेस ३२० किमी, वेलिंग्टन बेटावर स्थित आहे. कोचीला १९३६ मध्ये प्रमुख बंदराचा दर्जा देण्यात आला. हे बंदर त्याच्या रणनीतिक स्थानामुळे पश्चिम आणि पूर्वेकडील, तसेच ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडील आंतरराष्ट्रीय समुद्राच्या मार्गाच्या जवळपासच्या सामूहिक स्थानासह मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक संधी साध्य करण्यास सक्षम आहे. ते चहा, कॉफी व मसाल्यांची निर्यात आणि खनिज तेल व रासायनिक खतांची आयात करते.
हेही वाचा – UPSC-MPSC : भारतात संप्रेषण व्यवस्थेचा विकास कसा झाला? संप्रेषणाचे प्रकार कोणते?
कोची ऑइल रिफायनरी या बंदरामधून क्रूड ऑइल प्राप्त करते. हे एक जहाजनिर्मिती केंद्र आहे. या पोर्टद्वारे निर्यातीपेक्षा आयात जास्त केली जाते. खरे तर या पोर्टद्वारे निर्यातीपेक्षा आयात पाच पट जास्त आहे. या पोर्टच्या हिंटरलँडमध्ये संपूर्ण केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटकचे काही भाग समाविष्ट आहेत. केरळमधील ९७ टक्के व्यापार कोची बंदरातून होतो. हे पोर्ट दक्षिण-पश्चिम भारतातील विशाल औद्योगिक आणि कृषी बाजारपेठेचे नैसर्गिक प्रवेशद्वार म्हणून कार्य करते.