सागर भस्मे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील लेखातून आपण भारतात मान्सूनचे आगमन कधी होते, त्याचा भारतातील प्रवास कसा असतो आणि तो माघारी केव्हा जातो, याबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण हिंदी महासागरातील द्विध्रुव (Indian Dipole movement) या बद्दल जाणून घेऊया. तसेच पश्चिमी विक्षोभ (western disturbances) च्या परिणामांचाही अभ्यास करूया.

हिंदी महासागरातील द्विध्रुव (IOD) :

हिंदी महासागराचे दोन भाग पडतात. एक म्हणजे इंडोनेशिया बेटांना लागून असलेला पूर्व हिंदी महासागर व दुसरा मादागास्कर बेटाकडील पश्चिम हिंदी महासागर. या दोन पृष्ठभागांच्या एकमेकांच्या विपरीत तापण्यामुळे IOD ची परिस्थिती निर्माण होते. यालाच भारतीय निनोदेखील म्हणतात. कारण एल निनो जसा भारतीय मान्सून अनियमिततेसाठी जबाबदार आहे, तसाच IOD सुद्धा आहे. IOD भारतीय मान्सूनवर सकारात्मक तसेच नकारात्मक दोन्ही प्रकारे प्रभाव टाकतो. यासोबतच ऑस्ट्रेलियातील ग्रीष्मकालीन मान्सूनवरदेखील परिणाम करतो.

हेही वाचा – UPSC-MPSC : मान्सूनचे आगमन कधी होते? भारतात त्याचा प्रवास असतो?

हिंदी महासागरातील द्विध्रुवांचे प्रकार :

भारतीय मान्सूनवरील प्रभावाच्या आधारावर IOD चे तीन प्रकार पडतात. 1) तटस्थ/सामान्य हिंद महासागर द्विध्रुव, 2) नकारात्मक हिंद महासागर द्विध्रुव आणि 3) सकारात्मक हिंद महासागर द्विध्रुव.

१) तटस्थ / सामान्य IOD : तटस्थ IOD मध्ये, ऑस्ट्रेलियाच्या वायव्य किनार्‍याजवळ पॅसिफिक महासागरातून उबदार पाण्याच्या प्रवाहामुळे पूर्व हिंदी महासागराच्या समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यपेक्षा किंचित जास्त वाढते. परंतु, जवळजवळ पूर्व व पश्चिम हिंदी सागरी तापमानात फरक जास्त नसतो. तटस्थ IOD मध्ये सामान्य मान्सून पातळी टिकून असते. पूर्व हिंदी महासागर आणि ऑस्ट्रेलियाच्या वायव्य भागात किंचित जास्त (सामान्यपेक्षा) पाऊस पडतो.

२) नकारात्मक IOD : जेव्हा पूर्व हिंदी महासागराचे तापमान पश्चिम हिंदी महासागराच्या तुलनेत सामान्यपेक्षा खूप जास्त होते, तेव्हा नकारात्मक IOD बघावयास मिळतो. खरं तर, प्रशांत महासागरातून पूर्व हिंदी महासागरात दीर्घकाळापर्यंत उबदार पाण्याच्या प्रवाहामुळे, पूर्व हिंदी महासागरातील तापमानात लक्षणीय वाढ होते. नकारात्मक IOD चा भारतीय मान्सूनवर परिणाम होतो. यामुळे भारतीय मान्सून कमकुवत होतो आणि पावसाची तीव्रता कमी होते व भारतात दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. ‘हॉर्न ऑफ आफ्रिका’ आणि पश्चिम हिंदी महासागरात कमी पाऊस पडतो. याउलट, पूर्व हिंदी महासागर आणि ऑस्ट्रेलियन उत्तर-पश्चिम भागात जास्त पाऊस पडतो.

३) सकारात्मक IOD : जेव्हा पश्चिम हिंदी महासागर पूर्वेकडील हिंदी महासागरापेक्षा जास्त उष्ण होतो, तेव्हा त्याला सकारात्मक IOD म्हणतात. सकारात्मक IOD चा भारतीय मान्सून (पाऊस) वर सकारात्मक परिणाम होतो. भारतीय उपखंड आणि पश्चिम हिंदी महासागरात तुलनेने जास्त पाऊस पडतो; तर दुसरीकडे वायव्य ऑस्ट्रेलिया आणि पूर्व हिंदी महासागरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियात दुष्काळाची स्थिती निर्माण होते.

वेस्टर्न डिस्टर्बन्स :

वेस्टर्न डिस्टर्बन्सेस मध्य-अक्षांश प्रदेशात (कर्कवृत्त उष्णकटिबंधाच्या उत्तरेकडे) विकसित होतात, उष्ण कटिबंधात नाही, म्हणून त्यांना मध्य-अक्षांश वादळ किंवा अतिरिक्त-उष्णकटिबंधीय वादळे म्हणतात. यांना हिवाळी वादळे आणि हिमवादळेदेखील म्हणतात. या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या वाऱ्याच्या प्रणाली आहेत. ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ हा शब्द १९४७ मध्ये प्रथम वापरला गेला.

वेस्टर्न डिस्टर्बन्सचे भारतात आगमन :

वेस्टर्न डिस्टर्बन्स ही कमी दाबाची प्रणाली अटलांटिक महासागर आणि युरोप जवळ मध्य-अक्षांश प्रदेशात उद्भवते. भूमध्य समुद्रावर सामान्यतः कमी दाब तयार होतो आणि तो भूमध्य सागरातून ओलावा घेऊन भारतात प्रवेश करतो. हे आर्द्रतेने भरलेले वेस्टर्न डिस्टर्बन्स अखेरीस हिमालयाच्या पलीकडे येतात आणि अवरोधित होतात. परिणामी, वायव्य भारत व काहीवेळा उत्तर भारताच्या इतर भागांमध्ये हिमवर्षाव आणि पावसाच्या रूपात पर्जन्यवृष्टी होते. हिवाळ्याच्या काळात सरासरी ४-५ वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार होतात आणि प्रत्येक वेस्टर्न डिस्टर्बन्ससोबत पावसाचे वितरण आणि प्रमाण बदलते. यालाच पश्चिमी विघ्न म्हणूनसुद्धा संबोधले जाते.

‘पश्चिम’ हा शब्द भारताच्या संदर्भात ज्या दिशेपासून उगम पावतो, त्या दिशेला सूचित करतो. ‘विघ्न’ हा शब्द वापरला जातो, कारण कमी दाब प्रणालीतील हवा अस्थिर किंवा अशांत असते. त्याच्या तीव्रतेनुसार काहीवेळा तो १५° उत्तर भारतापर्यंत फैलू शकतो. ज्यामुळे मध्य प्रदेश, उत्तर महाराष्ट्र व गुजरातमध्ये पाउस पडतो.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारतात पाऊस का पडतो? ‘भारतीय मान्सून’ ही घटना नेमकी काय आहे?

वेस्टर्न डिस्टरबन्सचे प्रभाव :

संपूर्ण उत्तर-पश्चिम भारतात हिवाळा आणि मान्सूनपूर्व पावसाचे कारण म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स. ही घटना सहसा ढगाळ परिस्थिती, रात्रीचे उच्च तापमान आणि असामान्य पावसाशी संबंधित असते. असा अंदाज आहे की, भारतात एकूण वार्षिक पावसाच्या ५-१०% पाऊस वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पडतो. हिवाळ्यात या वाऱ्यांमुळे सखल भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडतो आणि भारतीय उपखंडातील डोंगराळ भागात जोरदार हिमवृष्टी होते. पावसाळ्यात, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे कधी कधी दाट ढग आणि मुसळधार पाऊस पडतो. कमकुवत वेस्टर्न डिस्टर्बन्सचा संबंध संपूर्ण उत्तर भारतात पीक अपयश आणि पाण्याच्या समस्यांशी आहे. मजबूत वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे रहिवासी, शेतकरी आणि सरकार यांना पाणीटंचाईशी संबंधित अनेक समस्या टाळण्यास मदत होऊ शकते.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc indian geography indian dipole movement western disturbances and its effects on indian monsoon mpup spb
First published on: 09-09-2023 at 18:36 IST