सागर भस्मे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील भागात आपण महानदी या नदीप्रणाली विषयी माहिती घेतली. या लेखातून आपण कावेरी नदीप्रणाली विषयी जाणून घेऊया. कावेरी नदीचा उगम कर्नाटकमध्ये कूर्ग जिल्ह्यात ब्रह्मगिरी डोंगर रांगेत १४३१ मीटर उंचीवर झाला आहे. या नदीची एकूण लांबी ८०५ किलोमीटर असून एकूण पाणलोट क्षेत्र ८७ हजार ९०० चौ.किमी. आहे. या नदीचा प्रवाह कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या तीन राज्यांमध्ये आहे. कावेरी नदी ही दक्षिण भारतातील अतिशय महत्त्वाची नदी असल्याने कावेरीला ‘दक्षिणगंगा’ असेही म्हणतात.

हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : महानदीप्रणाली

कावेरी नदी प्रथम पूर्वेस आणि मग काहीशी ईशान्य नंतर आग्नेयस कर्नाटक-तामिळनाडू सीमेवर नैर्ऋत्येस, तामिळनाडूच्या सेलम जिल्ह्याच्या सीमेवर दक्षिणेस व त्यानंतर पूर्वेस वाहत जाते. कृष्णराजा सागरा येथे कावेरीला हेमावती आणि लक्ष्मणतीर्थ या दोन उपनद्या येऊन मिळतात. तामिळनाडूमध्ये प्रवेशानंतर, कावेरी होगेनाकल धबधब्यापर्यंत पोहोचेपर्यंत आणि सालेमजवळील एका सरळ, अरुंद घाटातून वाहत जाईपर्यंत वळणाऱ्या जंगली घाटांच्या मालिकेतून पुढे जात राहते. कर्नाटकात या नदीचे दोन वेळा विभाजन होऊन श्रीरंगपट्टणमची पवित्र बेटे तयार होतात. श्रीरंगपट्टणमपासून कावेरी नदी दोन भागांमध्ये विभाजित होते आणि एक फाटा चिदंबरमच्या दक्षिणेकडून बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतो, तर दुसरा फाटा तंजावरवरून नागापट्टणम्‌जवळ समुद्राला जाऊन मिळतो. सिंचन कालव्याच्या प्रकल्पांसाठीही ही नदी महत्त्वाची असून दुसऱ्या फाट्यामुळे कावेरीच्या सुपीक व समृद्ध त्रिभुज प्रदेशातील कालव्यांना पाणी पुरविले जाते.

कावेरी नदीच्या तीरावर तालकावेरी, भागमंडला, जितेमाद्रा, श्रीरंगपटना, मुथाथी, मेकेदाटू, होगेनक्कल, मेत्तूर, भवानी, इरोड, करूर, नमक्कल, तिरुचिरापल्ली, तंजावर आणि कुंभकोणम ही शहरे वसलेली आहेत. कावेरी नदीच्या उजव्या तीरावर हेमावती, शिमसा, अर्कावती या उपनद्या आहेत; तर डाव्या तीरावर कबिनी, भवानी, नॉयल, अमरावती या उपनद्या आहेत.

हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्राचा भूगोल : भीमा नदीप्रणाली

कावेरी नदीच्या उपनद्या

हेमावती नदी : हेमावती नदीचा उगम कर्नाटकातील चिकमंगळूर जिल्ह्यातील मुदिगेरे शहराजवळील बलूर गावाजवळ १२१९ मीटर उंचीवर पश्चिम घाटाच्या टेकड्यांमध्ये झाला आहे. या नदीची एकूण लांबी २२५ किलोमीटर असून हसन जिल्ह्यातील गोरूर गावात हेमावती नदीवर धरण बांधण्यात आले आहे. कर्नाटक जिल्ह्यातील हसून जिल्ह्यामधून वाहत असताना यागाची नदी हेमावती नदीला येऊन मिळते. नंतर पुढे मंडळ जिल्ह्यात कृष्णराज सागराजवळ कावेरी नदीला उजव्या तीरावर जाऊन मिळते.

शिमसा नदी : शिमसा नदीचा उगम कर्नाटक राज्यामध्ये तुमकूर जिल्ह्यात देवनारायण दुर्गा टेकडीवर ९१४ मीटर उंचीवर झालेला आहे. या नदीची एकूण लांबी २२१ किलोमीटर असून पाणलोट क्षेत्र ८४६९ चौ. किमी. आहे. ही नदी चामराजनगर जिल्ह्याच्या सीमेलगत कावेरी नदीला जाऊन मिळते. या नदीच्या प्रमुख उपनद्यांमध्ये वीरवैष्णवी, कनिहल्ला, चिक्काहोले, हेब्बहल्ला, मुल्लाहल्ला आणि कणवा नद्यांचा समावेश आहे.

अर्कावती नदी : अर्कावती नदीचा उगम कर्नाटकमधील चिकबल्लापूर जिल्ह्यातील नंदी टेकड्यांमध्ये झालेला आहे. या नदीची एकूण लांबी १९० किलोमीटर असून कुमुदवती आणि वृषभवती या दोन तिच्या प्रमुख उपनद्या आहेत. कर्नाटकमधील रामनगर जिल्ह्यामध्ये ती कावेरी नदीला जाऊन मिळते.

अमरावती नदी : अमरावती नदीचा उगम अण्णामलाई टेकड्यांमध्ये झालेला असून या नदीची एकूण लांबी २८२ किमी आहे. ही नदी करूरपासून १० किलोमीटर अंतरावर थिरुमुक्कडलूर येथे कावेरी नदीला येऊन मिळते.

भवानी नदी : भवानी नदीचा उगम केरळ राज्यातील पालघर जिल्ह्यामध्ये सायलेंट व्हॅलीच्या जंगल भागात होतो. ही पूर्व वाहिनी नदी असून एकूण लांबी १६९ किलोमीटर आहे. ही केरळमधून पुढे तामिळनाडू राज्यात प्रवेश करून भवानी गावाजवळ कावेरी नदीस मिळते. भवानी नदीच्या प्रमुख उपनद्यांमध्ये मोयार, कुंदा, कोरंगपल्लम्, कूनूर, सिरुवनी आणि पेरिङ्‌गपलम् नद्यांचा समावेश होतो.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc indian geography kaveri river system mpup spb
Show comments