सागर भस्मे
भारतातील हिमालय पर्वतातील नैनिताल जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त सरोवरे असून त्यात नैनिताल हे सर्वात मोठे सरोवर आहे. काश्मीरमधील झेलम नदीच्या प्रवाहमार्गात वुलर व श्रीनगरजवळ दाल हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे, तर दक्षिण तिबेटमध्ये मानस सरोवर आहे. द्वीपकल्पीय पठारावर राजस्थानात जयपूरजवळ सांभर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात लोणार सरोवर, ओरिसा राज्यातील पुरी जिल्ह्यात पूर्व किनाऱ्यावर वाळूच्या दांड्यामुळे निर्माण झालेले चिल्का सरोवर, आंध्र प्रदेश व तामिळनाडूच्या सीमारेषेवर खाजणात पुलिकत सरोवर आहे.
आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यामध्ये कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. कोलेरू, चिल्का, पुलिकत ही पूर्व किनाऱ्यावरील सरोवरे असून केरळमधील बेंबनाड हे पश्चिम किनाऱ्यावरील सरोवरांपैकी सर्वात मोठे सरोवर आहे.
हेही वाचा – UPSC-MPSC : भारताचा भूगोल : द्वीपकल्पीय पठारावरील नद्या व त्यांचा विस्तार
सांभर सरोवर
जयपूर शहरापासून ७० कि.मी. अंतरावर असलेले हे सरोवर खाऱ्या पाण्याचे भारतातील सर्वात मोठे सरोवर असून या सरोवराचा समावेश रामसर सूचीमध्येही करण्यात आलेला आहे. समुद्रसपाटीपासून ३६० मी. उंचीवरील हे सरोवर ३२ कि.मी. लांबीचे आणि २४० चौ.कि.मी. क्षेत्रात पसरलेले आहे. उन्हाळयात हे कोरडे पडते. त्याच्या खाली खोलवर क्षारयुक्त मातीचा थर आहे.
कोलेरू सरोवर
आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यात आढळणारे उथळ बशीसारखे असणारे गोड्या पाण्याचे हे सरोवर असून या सरोवरात सुमारे २० दशलक्ष पक्षांचा प्रवास तसेच अधिवास असतो. मान्सून पर्जन्याच्या काळात २५० चौ.कि.मी. इतके याचे क्षेत्रफळ वाढते. गोदावरी व कृष्णा या दोन्ही नद्यांच्या त्रिभुज प्रदेशादरम्यान समुद्राच्या पाण्याच्या संचयनाने हे सरोवर तयार झाले. या सरोवराच्या परिसरात असंख्य पेलिकन पक्षी आढळतात.
चिल्का सरोवर
हे सरोवर गोदावरी व महानदी या नद्यांच्या त्रिभुज प्रदेशादरम्यान असून ओडिसा राज्यातील पुरी जिल्ह्यात खाऱ्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर आहे. हे सरोवर समुद्रकिनारी निर्माण झाले आहे. उथळ असे हे सरोवर ७० कि.मी. लांब व ५२ कि.मी. रुंद आहे आणि हे सरोवर परिवर्तनशील असून समुद्राला जोडले गेले आहे. त्यामुळे भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी सरोवरात शिरते.
पावसाळ्यात ह्याचे क्षेत्रफळ १२०० चौ.कि.मी. एवढे वाढते तर उन्हाळ्यात ते ९०० चौ.कि.मी. पर्वत कमी होत जाते. हिवाळ्यात या सरोवराचा परिसर अनेक स्थलांतरित पक्ष्यांनी गजबजलेला असतो.
लोणार सरोवर
महाराष्ट्र राज्याच्या बुलढाणा जिल्ह्यात लोणार सरोवर आहे. उल्कापातामुळे निर्माण झालेल्या विस्तृत खळग्यात पाणी साठून वर्तुळाकृती अशा सरोवरांची निमिर्ती झाली आहे. येथे सतत उल्कापात होऊन प्रचंड विवर तयार झाले आहेत आणि त्यात पाणी साचून सरोवर तयार झाले आहे. याचा व्यास १०० मीटर असून सरोवराची निर्मिती ३० ते ५० हजार वर्षापूर्वी झाली असावी, असा अंदाज आहे.
हेही वाचा – UPSC-MPSC : भारताचा भूगोल : द्वीपकल्पीय पठारावरील पर्वतरांगा आणि विस्तार
पुलिकत सरोवर
हे सरोवर गोड्या पाण्याचे दुसरे सर्वात मोठे सरोवर असून एक प्रकारचे उथळ खाजण आहे. आंध्र प्रदेश व तामिळनाडूच्या सीमेवर व चेन्नईच्या उत्तरेला हे खाजण असून या सरोवराचा काही भाग तामिळनाडू राज्यात येतो. याची लांबी ६० कि.मी. व रुंदी ५ ते १८ कि. मी. खोली सरासरी २ मी. असून या सरोवराजवळ समुद्राच्या बाजूला श्रीहरिकोटा नावाचे बेट तयार झाले आहे. वाळूच्या दांड्यामुळे समुद्र व सरोवर अलग झाले आहे. अनेक प्रकारचे प्रवासी पक्षी या सरोवराजवळ येतात.
जल सरोवर
हे सरोवर अहमदाबादच्या नैर्ऋत्येला ६४ कि.मी. अंतरावर असून तेथे पक्षी अभयारण्य आहे. हे खाऱ्या पाण्याचे सरोवर असून गुजरातमधील हे सर्वात मोठे सरोवर मानले जाते. या सरोवराचे १२७ चौ.कि.मी. इतके विस्तृत क्षेत्र असून त्याची वैशिष्ट्ये म्हणजे यात लहान लहान बेटे आहेत. हे भौगोलिकदृष्ट्या कच्छचे रण आणि खंबातचे आखात यांच्यातील समुद्र फाट्याच्या अवशेष स्वरूपात आहे.
दाल सरोवर
दाल सरोवर हे श्रीनगरमधील एक प्रसिद्ध सरोवर आहे. दाल सरोवर म्हणजे निसर्गदेवतेचा मोठा चमत्कार आहे. या सरोवराचा काठ अतिशय सुंदर असून मनमोहक अशा हिरव्यागार वनांनी हा भाग नटलेला आहे. सरोवराची लांबी ८.४ कि.मी. व रुंदी ४ कि.मी. आहे. या सरोवरात सोनलंका व रूपलंका अशी छोटी सुंदर बेटे आहेत. सरोवराच्या आसपास निशात, चश्माशाही अशा रमणीय बागा आहेत. झेलम नदीला पूर आल्यावर हे सरोवर तुडुंब भरून जाते. कमळाची फुले या सरोवरात पाहावयास मिळतात.
मान (मानस) सरोवर
चीनच्या व तिबेटच्या सीमारेषांवर असलेल्या या सरोवराचा पृष्ठभाग बर्फाच्छादित असून तळाशी उकळत्या पाण्याचे झरे आढळतात. परिस्थितीमुळे या सरोवराचे पाणी नेहमी सौम्य, शीतल राहत असून हे पाणी आयुर्वेदिक मानले जाते आणि स्नानासाठी आनंददायी वाटते. समुद्र-सपाटीपासून १५००० फूट उंची असलेले हे सरोवर ५२० चौ.कि.मी. विस्ताराचे आहे. खोली ३५० फूट आहे. या पाण्यात हंस, राजहंस, मासे यांचा निवास भरपूर प्रमाणात आढळतो. प्रत्यक्षात या सरोवरातून एकही नदी उगम पावत नाही. परंतु काही संशोधकांच्या मते शरयू ब्रह्मपुत्रा – सतलज यांचा उगम येथून झाला आहे. हिंदूधर्मीयांसाठी हे सरोवर अत्यंत पवित्र असून श्रद्धेचे स्थान मानले जाते.
लोकटक सरोवर
ईशान्येकडील मणिपूर राज्यातील लोकटक तलाव हे खरे नैसर्गिक आश्चर्य आहे. हे ईशान्य भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे आणि ते त्याच्या अनोख्या तरंगणाऱ्या फुमडीसाठी ओळखले जाते, जे तलावाच्या पृष्ठभागावर तरंगणाऱ्या वनस्पतींचे समूह आहेत. हे तलाव जगातील एकमेव तरंगणारे राष्ट्रीय उद्यान, केबुल लामजाओ नॅशनल पार्कचे घरदेखील आहे, जे संकटग्रस्त मणिपूर कपाळ-अंटियर्ड हरणांना आश्रय देते, ज्याला ‘सारिगल’देखील म्हटले जाते. ‘थांगिंग’ म्हणून ओळखल्या जाणार्या पारंपरिक लाकडी पडवीवर लोकटक सरोवराचे अन्वेषण करणे एक तल्लीन करणारा अनुभव प्रदान करते.