सागर भस्मे
मागील लेखातून आपण वाळवंटी प्रदेशात पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या भूरूपांविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण सागरी लाटांच्या अपक्षरण कार्यामुळे निर्माण होणाऱ्या भूरूपांविषयी जाणून घेऊ या.
समुद्रकडा (Sea Cliff)
सागरी लाटांच्या आघातामुळे सागरी किनाऱ्यावर असणाऱ्या खडकाची मोठ्या प्रमाणात झीज होते. त्या खडकाचे अपक्षरण होते आणि एका उभ्या भिंतीसारखा भाग तयार होतो. त्या भागाला ‘समुद्रकडा’, असे म्हटले जाते. इंग्लंडच्या उत्तर किनाऱ्यावर समुद्रकड्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झालेली आहे.
हेही वाचा –
आखात व भूशिर (Gulf and head lands )
ज्या वेळेस समुद्राचा किनारा मृदू आणि कठीण खडकांपासून बनलेला असतो. त्यामुळे समुद्राच्या लाटांच्या निरंतर आघाताने मृदू खडकांची मोठ्या प्रमाणात झीज होते. त्यामुळे समुद्राचे पाणी जमिनीच्या आत शिरल्यासारखे वाटते; अशा भागास आखात, असे म्हणतात. ज्या कठीण खडकांची झीज कमी प्रमाणात झाली आहे. तो भूभाग समुद्रामध्ये आत गेल्यासारखा वाटतो; त्याला भूशिर, असे म्हणतात.
अर्धवर्तुळाकार कोनाडे /लघुनिवेशिका (Coves)
ज्या वेळेस समुद्रकिनार्यावर कठीण व मृदू खडकांचे थर एकमेकाला समांतर असतात. त्याच्यामध्ये समुद्राचे पाणी प्रवेश करते, त्या वेळेस मृदू व कठीण खडकांमधील भेगा रुंदावतात. भेगा रुंदावल्यामुळे मृदू खडकांची झीज होते. झीज झाल्याने समुद्रकिनार्यावर अर्धवर्तुळाकार खोलगट भाग निर्माण होतो. त्याला ‘अर्धवर्तुळाकार कोनाडे’ म्हणतात. ब्रिटनच्या दक्षिण किनाऱ्यावर अर्धवर्तुळाकार कोनाड्यांची निर्मिती झालेली आढळते.
सागरी गुहा (Sea Cave)
समुद्रकिनार्यावर लाटांच्या आघातामुळे खडकांच्या पायथ्याची झीज होऊन कालांतराने त्या ठिकाणी कपारीची निर्मिती होते. त्या कपारीमध्ये लाटांचे पाणी भोवऱ्यासारखे चक्राकार फिरू लागते. त्यामुळे कपारीचा भाग मोठ्या प्रमाणात झिजून सागरी गुहांची निर्मिती होते. अशा प्रकारच्या गुहा चुनखडीच्या खडकांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. सागरी गुहा फार काळ टिकणाऱ्या नसतात. कारण- सतत होणाऱ्या सागरी लाटांचा खणन कार्यामुळे गुहेच्या छताची जाडी कमी होते. कालांतराने वस्तुमान सहन न झाल्यामुळे गुहेचे छत पडते.
सागरी कमान (Sea Arches)
समुद्रकिनाऱ्याजवळ डोंगराचा भाग समुद्राच्या आत शिरतो. आत शिरलेल्या डोंगराच्या दोन्ही बाजूंनी समुद्राच्या लाटांमुळे अपक्षरण होते आणि गुहेची निर्मिती होते. अपक्षरण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे दोन्ही बाजूंना गुहेचा आकार सातत्याने वाढत जातो. कालांतराने दोन्ही गुहा एकमेकांना मिळाल्यामुळे आरपारचा बोगदा निर्माण होतो. त्याला सागरी कमान, असे म्हणतात.
आघात छिद्र (Blow Holes)
सागरी गुहा एकसंध नसून, त्यांच्यामध्ये अनेक भेगा निर्माण झालेल्या असतात. या गुहांमध्ये ज्या वेळेस समुद्राचे पाणी वेगाने आत शिरते, तेव्हा गुहेतील हवा आकुंचन पावते. आकुंचन पावलेली हवा भेगांमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते, तेव्हा त्या भेगा रुंदावतात. ती हवा गुहेच्या छतावरून ज्या ठिकाणावरून बाहेर पडते, त्या ठिकाणाला आघात छिद्र, असे म्हणतात.
सागरी स्तंभ (Stack)
ज्या वेळी समुद्राच्या लाटेमुळे सागरी कमानीची निर्मिती होते आणि त्या सागरी कमानीची कालांतराने मोठ्या प्रमाणात झीज होते, त्यावेळी त्या कमनीचे छत कोसळून कमानीचा दोन्ही बाजूंचा जो भाग शिल्लक राहतो. तो उंच स्तंभासारखा दिसतो. त्याला ‘सागरी स्तंभ’, असे म्हणतात. कालांतराने या सागरी स्तंभांची समुद्राच्या लाटेमुळे झीज झाल्याने त्यांची उंची कमी होत जाते. तेव्हा त्या सागरी स्तंभाला ‘अवशिष्ट सागरी स्तंभ’, असे म्हणतात.
हेही वाचा-
तरंगघर्षित चबुतरा (Wave Cut)
समुद्रामध्ये लाटांच्या आघातामुळे सागरी कडेची निर्मिती होते. सागरी कडेचे अपक्षरण होऊन त्यामध्ये कपार निर्माण होते. कालांतराने त्या कपारीचा वरचा भाग समुद्रामध्ये कोसळतो. त्यामुळे सागरी कडा ही मागे सरकते आणि मागे सरकल्यामुळे पायथ्यापासून सागराकडे चबुतऱ्याची निर्मिती होते. त्याला तरंगघर्षित चबुतरा, असे म्हटले जाते.