सागर भस्मे
मागील लेखातून आपण महाराष्ट्रातील वने आणि त्यांच्या प्रकारांबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानांबाबत जाणून घेऊया. महाराष्ट्रात एकूण सहा राष्ट्रीय उद्याने आहेत. १) ताडोबा राष्ट्रीय उद्यान (चंद्रपूर), २) नवेगाव राष्ट्रीय उद्यान (गोंदिया), ३) पंडित जवाहरलाल नेहरू / पेंच राष्ट्रीय उद्यान (नागपूर), ४) बोरिवली राष्ट्रीय उद्यान (मुंबई उपनगर व ठाणे), ५) गुगामाळ राष्ट्रीय उद्यान (अमरावती) आणि ६) चांदोली राष्ट्रीय उद्यान (सांगली, सातारा, कोल्हापूर व रत्नागिरी)
१) ताडोबा /ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान (चंद्रपूर) :
‘ताडोबा राष्ट्रीय उद्यान’ हे चंद्रपूरपासून ४५ किलोमीटरवर स्थित आहे, तर नागपूरपासून ताडोबा १४५ कि.मी. अंतरावर येते. ताडोबा हे महाराष्ट्रातले पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. त्याचे एकूण क्षेत्र ११५.१४ चौ. कि.मी. आहे. या अरण्यात आदिवासींचा ‘ताडोबा’ नावाचा देव आहे. या देवावरून या उद्यानाचे नाव ताडोबा पडले, असे मानले जाते. या अभयारण्यातील अरण्यात बांबू हे मुख्य वृक्ष आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान परिसरामध्ये पानझडी प्रकारची वने आढळतात. ताडोबाच्या अरण्यात वाघ व बिबटे आहेत. ताडोबात एक विशाल सरोवर आहे. ताडोबा सरोवराशिवाय पार्कमध्ये अनेक लहान-लहान पाणवठे आहेत. पाणवठ्याजवळच सांबराचे लोटणाची ही एक वैशिष्टयपूर्ण जागा ताडोबा राष्ट्रीय उद्यान परिसरामध्ये आहे. या ठिकाणाच्या चिखलात सांबरे पाठीवर लोळतात, त्या जागेला ‘सांबर लोटण’ असे म्हणतात. ताडोबातले मगरपालन केंद्र आशिया खंडातले उत्तम मगरपालन केंद्र आहे. ताडोबा सरोवर म्हणजे जंगलाचा आत्मा आहे. अभयारण्यात वन्य प्राणी निरीक्षणासाठी मचाणे व मनोरे बांधण्यात आले आहेत.
हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्रातील वनक्षेत्रांचे प्रकार कोणते? त्यांचे वर्गीकरण कसे केले जाते?
२) नवेगाव राष्ट्रीय उद्यान (गोंदिया) :
नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात आहे. हे राष्ट्रीय उद्यान पवनीचे अरण्यपुत्र माधवराव पाटील यांच्या प्रयत्नाने २२ नोव्हेंबर, १९७५ रोजी स्थापन झाले. सातपुडा पर्वतरांगांतील १३३.८८ चौ.कि.मी. वन नवेगाव राष्ट्रीय उद्यानात आहे. अभयारण्यात ‘नवेगाव बांध’ नावाचे एक विशाल सरोवर आहे. नवेगाव सरोवरातील पक्षी निरीक्षण करण्यासाठी काठावर सुंदर निरीक्षण कुटी बांधलेली आहे. आगेझरी पहाडाच्या कड्याला आग्यामोहोळांची पोळी लटकलेली असतात. आगेझरी पहाडावर गवताळ पठार आहे. या पठारावर बिबटे, वाघ, अस्वले, गवे व चितळांचा वावर आहे. वनात बोदराईचे मंदिर आहे. बोदराई ही आदिवासींची देवी आहे. बोद म्हणजे गवा. गव्यांची राई म्हणून ‘बोदराई’ नाव पडले. या भागात गव्यांचा वावर आहे. या पहाडावर श्रावणात शेकडो मोर नाचतात, म्हणून त्याला ‘मोरनाची’ म्हणतात. पहाडातून नाल्याचे पाणी बदबद आवाज करीत खाली पडते, म्हणून त्याला ‘बदबद्या नाला’ असे म्हणतात.
३) पंडित जवाहरलाल नेहरू/ पेंच राष्ट्रीय उद्यान (नागपूर) :
पेंच नदीवर ‘तोतलाडोह’ या ठिकाणी विशाल धरण बांधले आहे. याला ‘तोतलाडोह’ असे म्हणतात. तोतलाडोहाच्या परिसरातील २५७.९८ चौ.कि.मी. वन आहे. पूर्वेस सातपुड्यातला उंच गोलिया पहाड आहे. हा नागपूर जिल्ह्यातील सर्वांत उंच पहाड आहे. नागपूरपासून ८० कि.मी. अंतरावर पेंच – पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प आहे. सातपुड्याच्या रांगातील पंडित नेहरू राष्ट्रीय उद्यानात साग, बीजा, साजा, हळद, तेंदू, बांबू, शिसम, पळस, सावर, आवळा, धावडा, मोह इत्यादी झाडांची गर्दी आहे. अनेक औषधी वनस्पती व वेली आहेत. सिल्लारी येथे गोंड आदिवासींची वस्ती आहे. सिल्लारीजवळ ‘बुधलजीरा’ नावाचे लाकडी प्रवेशद्वार आहे. राष्ट्रीय उद्यानात ढाण्या वाघ, बिबळे, रानगवे, रानम्हशी, सांबर, चितळ, नीलगाय, चौशिंगा, चिंकारा, अवर, रानडुकरे, कोल्हे, लांडगे, अस्वले इत्यादी वन्य प्राणी आहेत. अजगर, नाग, घोणस, ननाटी, घोरपड, सरडे हे सरपटणारे प्राणी आहेत. गोंड आदिवासींचा नागदेव बोदलझीरा नाला ओलांडल्यावर नागदेव पहाडी लागते. येथे एक प्रचंड शिला आहे. तो गोंड आदिवासींचा नागदेव आहे. आदिवासी त्याची पूजा करतात. दरवर्षी नागदेवाची यात्रा भरते. सातपुड्यातील सारे आदिवासी या यात्रेसाठी जमतात.
४) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (बोरिवली) (मुंबई उपनगर व ठाणे) :
मुंबई उपनगरात ४० कि.मी. अंतरावर ‘बोरिवली’ या ठिकाणी घनदाट झाडाझुडपांचा एक प्रदेश आहे. तेथे ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. या उद्यानाचे एकूण क्षेत्र १०३.०९ चौ.कि.मी. आहे. यापैकी मुंबई उपनगरात ४४.४५ चौ.कि.मी., तर ठाणे जिल्ह्यात ५८ चौ.कि.मी. क्षेत्र समाविष्ट आहे. त्याची स्थापना ४ फेब्रुवारी, १९८३ रोजी करण्यात आली आहे. या उद्यानास सदाहरित, निमसदाहरित प्रकारची वृक्ष आढळतात. पवई हा तलाव तुळशी तलाव बोरिवली अरण्यात बांधलेला आहे. बिबळ्या वाघ हा बोरिवलीतील अरण्यातला मुख्य प्राणी आहे. बोरिवलीत ‘लायन सफारी पार्क आहे. वसई खाडीला लागून उद्यानाचे २५ चौ.कि.मी. क्षेत्राचे खारफुटीचे जंगल/कांदळवन आहे. त्याला ‘मंगलवन/वेलावन’ असे म्हणतात.
५) गुगामल राष्ट्रीय उद्यान (अमरावती) :
कोअरविदर्भात अमरावती जिल्ह्यात मेळघाटच्या एकूण क्षेत्रापैकी १,२८८ चौ.कि.मी. क्षेत्र असलेले संरक्षित क्षेत्र आहे. ज्याला इंग्रजीत ‘सेमी कोअर एरिया’ असे म्हणतात. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे ३०८ चौ.कि.मी. क्षेत्र अतिसंरक्षित क्षेत्र आहे, त्याला ‘कोअर एरिया’ असे म्हणतात. या भागात सातपुडा पर्वताच्या गाविलगड पर्वतरांगा आहेत. राष्ट्रीय निसर्ग संपत्तीच्या दृष्टीने हा भाग महत्त्वाचा असल्यामुळे हा भाग ‘गुगामाळ राष्ट्रीय उद्यान’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे. मेळघाट अभयारण्यात कोलकाज, सेमाडोह, जरीदा, तारुबंदा, धारगड, चौराकुंड, हतरू, माखल, ढाकणा या ठिकाणी वनविश्रांती गृहे आहेत. पळस, साग, पांगारा, तेंदू, आवळा, धावडा, मोह झाडांची वनराई दिसते. या परिसरात कुंभी, आंबा, साग, हळद, पिंपरी, आंबा, मोह, तेंदू, बांबू या झाडांची हिरवळ बघायला मिळते. रायपूर घाटात पांढरा कढई, हिरवागार आंबा, पळस या झाडाझुडपांची वनराई दिसते.
हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्राचे हवामान नेमके कसे आहे? उन्हाळ्यात राज्यातील काही भागांत तापमानवाढ का होते?
६) चांदोली राष्ट्रीय उद्यान (सांगली, सातारा, कोल्हापूर व रत्नागिरी) :
वारणा नदीवर सांगली जिल्ह्यातील ‘बत्तीस शिराळा तालुक्यात चांदोली येथे एक धरण बांधण्यात आले आहे, त्याला ‘चांदोली धरण’ असे म्हणतात. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात नैसर्गिक जंगल आहे. त्यात अनेक प्रकारचे वन्य प्राणी आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी १९८५ साली चांदोली अभयारण्याची स्थापना झाली. या उद्यानाचे वनक्षेत्र ३०९ चौ.कि.मी. असून त्यात सांगली, सातारा, कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यातील वनक्षेत्रांचा समावेश आहे. सांगली जिल्ह्यातील एकोणीस गावांचा त्यात समावेश आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ गावांचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यातील तीन व रत्नागिरी जिल्ह्यातील एका गावाचे वनक्षेत्र या उद्यानात येते. चांदोलीचे जंगल सदाहरित व निमसदाहरित आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानाला ‘फुलपाखरांचा स्वर्ग’ असे म्हटले जाते. कारण, फुलपाखरांच्या अगणित जाती चांदोली रष्ट्रीय उद्यानात पाहावयास मिळतात. जगात नामशेष झालेल्या फुलपाखरांच्या अनेक जाती चांदोली राष्ट्रीय उद्यानात आहेत. याशिवाय महाराष्ट्रात मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि एकमेव मालवण सागरी उद्याने आहेत.