सागर भस्मे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील लेखांमधून आपण हिमालयाची निर्मिती, विस्तार व हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या व त्यांचा विस्तार याबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाविषयी माहिती बघणार आहोत.

उत्तर भारतीय मैदानी प्रदेश म्हणजे गाळाचा मृदेचा एक सलग्न पट्टा असून हा पश्चिमेकडे सिंधू नदीच्या मुखापासून पूर्वेकडे गंगा नदीच्या मुखापर्यंत विस्तारलेला आहे. यातील गाळाच्या संचनाची जाडी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत जाते व उतार मंद स्वरूपाचा असल्यामुळे नद्या संतपणे वाहतात. त्यामुळे गाळाची मैदानी तयार झालेली आहेत. या महामैदानाचे क्षेत्रफळ ७.८ लाख चौरस किमी आहे. येथील मृदा अत्यंत सुपीक असल्याने हा प्रदेश देशातील शेती व्यवसायाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा प्रदेश आहे. या प्रदेशातील लोकसंख्येची घनता अधिक आणि पायाभूत सुविधांचा विकास झालेला आहे, पण राजस्थानचे वाळवंट याला अपवाद आहे.

उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाची विभागणी ही चार भागात केली जाते.

  1. राजस्थानचे मैदान
  2. पंजाब हरियाणा मैदान
  3. गंगेचे मैदान
  4. ब्रह्मपुत्रा मैदान

राजस्थानचे मैदान

राजस्थानच्या मैदानाला थराचे वाळवंट असे देखील म्हणतात. या वाळवंटाचे क्षेत्रफळ १.७५ लाख चौक किमी असून हे जगातील सातवे मोठे वाळवंट आहे. भारतातील महाकाव्यामध्ये या भूभागाचे वर्णन लवंग सागर म्हणजे मिठाचा समुद्र असे केले आहे. राजस्थानच्या मैदानी प्रदेशाची विभागणी प्रामुख्याने मरुस्थळी राजस्थान व बागर प्रदेश या दोन भागांमध्ये केली जाते.

  • मरुस्थळ : वाळवंटाच्या मुख्य प्रदेशाला मरुस्थळ म्हणून समजले जाते ते कच्छच्या रणापासून ते पंजाबपर्यंत पसरले आहे. हा पट्टा सुमारे ६५० किमी लांब आणि सुमारे ३०० किमी रुंद आहे. सर्वसाधारणपणे मरुस्थळचा पूर्व भागा खडकाळ तर पश्चिम भाग वाळूच्या स्थलांतरित टेकड्यांनी व्यापलेला आहे. यामधील बिकानेर जिल्ह्यात मिठाची सरोवर तर जैसलमेर बारमेर आणि बिकानेर येथील खडकाळ प्रदेशात चुनखडक आणि वालुकाश्म खडक विपुल प्रमाणात आढळतात.
  • राजस्थानचा बागर प्रदेश : राजस्थानच्या भाकर प्रदेशाचा विस्तार पूर्वेला अरवली पर्वताच्याकडेपासून पश्चिमेस २५ सेंटीमीटर पर्जन्य रेषेदरम्यानच्या प्रदेशात झालेला आहे. बागर हा सपाट पृष्ठभागाचा असून अरवली पर्वतातून वाहणारे लहान प्रवाह या भागामधून वाहतात, बागर प्रदेशातील आग्नेयकडून वाहणाऱ्या लुनी नदीमुळे घळई अपक्षरण झाले आहे. या भागाचा उत्तरेकडी प्रदेशास शेखावती प्रदेश म्हणून ओळखला जातो आणि या भागात देगना, सांबर इत्यादी मिठाची सरोवरे आहेत.

पंजाब व हरियाणा मैदान

उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील दुसरा प्रदेश म्हणजे पंजाब हरियाणा मैदान. हा प्रदेश राजस्थानच्या वाळवंटाच्या उत्तरेला तर यमुना नदीच्या पश्चिमेला आहे. या मैदानाचे क्षेत्रफळ १.७५ लाख चौ. किमी इतके असून यातील पंजाब मैदानापासून झेलम, चीनाब, रावी, बियास आणि सतलज या पाच नद्या वाहतात. या प्रदेशाच्या उत्तर सीमेवर शिवालिक पर्वतरांगा असून दक्षिणेला राजस्थानचे वाळवंट आहे. या प्रदेशातील लहान हंगामी वाहणाऱ्या प्रवाहांना स्थानिक भाषेत ‘चोस’ म्हणतात. हे प्रवाह शिवालीक पर्वतरांगेतून वाहत येतात आणि पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण करतात.

गंगेचा मैदानी प्रदेश

गंगेचा मैदानी प्रदेश हा उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील अत्यंत महत्त्वाचा असा प्रदेश आहे. याची पश्चिम पूर्व लांबी १४०० किमी असून त्याची सरासरी रुंदी ३०० किमी इतकी आहे. या मैदानी प्रदेशाचे उपविभाग पडतात. एक म्हणजे उर्ध्व गंगा मैदान, दुसरं म्हणजे मध्य गंगा मैदान आणि तिसरं म्हणजे निम्नगंगा मैदान.

  • उर्ध्व गंगा मैदान : या प्रदेशात गंगा, यमुना, काली आणि शारदा या नद्या वाहतात. भूजलस्रोताच्या दृष्टीने अतिशय संपन्न असलेल्या या प्रदेशात गाळाचे संचयन होऊन तयार झालेल्या प्रदेशाला ‘खादर’ असे म्हणतात. तर किंचित उंच असलेल्या जुन्या गाळाच्या प्रदेशाला ‘भांगर’ असे म्हणतात. तसेच मोठे दगड गोटे आणि वाळू इत्यादीनी तयार झालेल्या प्रदेशाला ‘बाबर’ असे म्हणतात.
  • मध्य गंगा मैदान : हे मैदान सुमारे ६०० किमी लांब तर ३३० किमी रुंद आहे. त्याचे स्थान पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यात आहे. हा पूर प्रवण प्रदेश असून या भागात सोन, कोशी आणि गंडक इत्यादी नद्या वाहतात.
  • निम्न गंगा मैदान : बिहार पासून ते बंगालच्या उपसागरापर्यंत पसरला भाग म्हणजे निम्न गंगा मैदान होय. या भागात तिस्ता, महानंदा, दामोदर आणि सुवर्ण रेखा नद्या वाहतात आणि या प्रदेशातील खालच्या भागात सुंदरबनचा त्रिभुत प्रदेश आहे.
  • ब्रह्मपुत्रा मैदान : उत्तर भारती मैदानी प्रदेशातील चौथा भाग म्हणजे ब्रह्मपुत्रा मैदान होय. त्यालाच आसामचे मैदान असे देखील म्हणतात. ब्रह्मपुत्रा मैदानाची पूर्व पश्चिम रांची ७२० किमी तर उत्तर दक्षिण लांबी जवळजवळ १०० किमी इतकी आहे. या प्रदेशांमध्ये ब्रह्मपुत्रा नदी पात्रात माजुली हे जगातील सर्वात मोठं नदी पात्रातील बेट तयार झालं आहे. हा प्रदेश तांदूळ व ताग उत्पन्नासाठी प्रसिद्ध आहे.
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc indian geography north indian plains mpup spb
Show comments