सागर भस्मे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Peninsular Plateau In Marathi : मागील लेखातून आपण भारतीय ऋतू आणि त्यांच्या वर्गीकरणाबाबत माहिती घेतली, या लेखातून आपण द्वीपकल्पीय पठारावरील पर्वतरांगा आणि त्याच्या विस्ताराबाबत जाणून घेऊ या.

अरवली पर्वत

द्वीपकल्पीय पठाराच्या उत्तर पश्चिम टोकावर अरवली पर्वताचा विस्तार असून अरवली पर्वत गुजरातमधील पालनपूरपासून दिल्लीतील मजनुटीलाजवळ उत्तर पूर्वेपर्यंत पसरलेला आहे. त्याची लांबी सुमारे ८०० किमी आहे. अरवली पर्वताची सर्वाधिक लांबी राजस्थान राज्यात असून अरवली पर्वताचा दक्षिणेकडील भाग जरगा टेकड्या म्हणून ओळखला जातो आणि दिल्लीजवळील अरवली पर्वतरांगा दिल्ली रेंज म्हणून ओळखली जाते. माळवा पठार अरवली पर्वताच्या दक्षिणेस तर मारवाड पठार अरवली पर्वताच्या पश्चिमेस आहे. अरवली पर्वताचे सर्वोच्च शिखर गुरुशिखर हे राजस्थानमधील माऊंट अबूजवळ आहे. अरवली पर्वत हा जगातील सर्वात जुना पर्वत आहे. आणि हा पर्वत दिल्ली, दक्षिण हरयाणा, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमध्ये पसरलेला आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारताचा भूगोल : भारतीय ऋतू आणि त्यांचे वर्गीकरण

विंध्य पर्वतरांगा

माळवा पठाराच्या दक्षिणेला विंध्य पर्वतरांग वसलेली असून विंध्य पर्वतरांग मध्य प्रदेश राज्यात पसरलेली आहे. विंध्य पर्वत हा भांडेर टेकडी आणि पूर्वेला कैमूर टेकडी म्हणून ओळखला जातो. विंध्य पर्वताच्या दक्षिणेला नर्मदा खोरे, नर्मदा खोऱ्याच्या दक्षिणेस सातपुडा पर्वत, आणि सातपुडा पर्वताच्या दक्षिणेला तापी खोरे आहे.

सातपुडा पर्वत

सातपुडा पर्वत हे भारतातील एकमेव ब्लॉक पर्वताचे उदाहरण आहे. दोन खोऱ्यांच्या मध्ये असलेल्या डोंगराला ब्लॉक पर्वत म्हणतात. सातपुडा पर्वताची सरासरी उंची १२०० मी. आणि त्याचा विस्तार पूर्व- पश्चिम दिशेने ९०० कि.मी.चा आढळतो. सातपुडा रांगेच्या उत्तरेला नर्मदा खोरे आणि दक्षिणेला तापी खोरे आहे. गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांत ही पर्वतरांग पसरलेली आहे.
सातपुडा पर्वत पश्चिमेकडून पूर्वेला तीन टेकड्यांच्या रूपात पसरलेला आहे, त्यांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम पुढीलप्रमाणे आहे.

  • राजपिपला टेकडी (पर्वताचा पश्चिम भाग)
  • महादेव टेकडी (पर्वताचा मध्य भाग)
  • मैकल टेकडी (पर्वताचा पूर्व भाग)

पश्चिम घाट

पश्चिम घाट तापी नदीच्या मुखापासून दक्षिणेला केप केमोरिन म्हणजे कन्याकुमारीपर्यंत पसरलेला आहे. पश्चिम घाटाचा विस्तार उत्तरेकडून दक्षिणेकडे असून त्याची उत्तरेकडून दक्षिणेकडे एकूण लांबी सुमारे १६०० किमी आहे. पश्चिम घाट पर्वत हा भारतातील हिमालयानंतरचा दुसरा सर्वात लांब पर्वत आहे. आणि पश्चिम घाट पर्वताला सह्याद्री असेही म्हणतात. पश्चिम घाट हे खरे तर पर्वत नसून द्वीपकल्पीय भारताच्या पठाराची पश्चिमेकडील प्रस्तरभंग झालेल्या कडा आहेत. प्राचीन काळात या पठाराचा पश्चिम भाग फार मोठ्या प्रमाणात भंग पावला आणि त्यामुळेच आजच्या पश्चिम किनाऱ्याला समांतर अशी विभंगरेषा निर्माण होऊन त्या रेषेच्या पश्चिमेकडील भाग खाली खचला. द्विपकल्पीय भारतीय पठाराची पश्चिम कडा म्हणजेच पश्चिम घाट होय. देशाच्या सुमारे ६% एवढे भौगोलिक क्षेत्रात ही पर्वतरांग आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारताचा भूगोल : डॉ. त्रिवार्था यांचे हवामान वर्गीकरण

निलगिरी पर्वत

दक्षिण भारतात, पश्चिम घाट आणि पूर्व घाट एकमेकांना जोडून एक पर्वत तयार करतात, या पर्वताला निलगिरी पर्वत म्हणतात. दोडाबेट्टा हे निलगिरी पर्वताचे सर्वोच्च शिखर असून पश्चिम घाटातील निलगिरी टेकड्या सुमारे २५०० चौ. कि. मी. क्षेत्र व्यापतात. निलगिरी पर्वत तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक राज्यांमध्ये पसरलेला आहे. दोराबेटा हे दक्षिण भारतातील दुसरे सर्वोच्च शिखर आणि उटी किंवा उटकमंड हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ तामिळनाडू राज्यात निलगिरी टेकड्यांवर वसलेले आहे. सायलेंट व्हॅली केरळचे प्रसिद्ध सदाहरित जंगल निलगिरी टेकड्यांवर वसलेले असून सायलेंट व्हॅली जैवविविधता आणि घनदाट जंगलासाठी ओळखली जाते.

पूर्व घाट पर्वत

पूर्व घाटाची सरासरी उंची ही ६०० मी. असून पूर्व घाट हे पश्चिम घाटाप्रमाणे पद्धतशीर आणि अखंड नसून ते अनेक ठिकाणी विखंडित झालेले आहे. द्वीपकल्पीय भारताच्या पठाराचा उतार पूर्वेकडे असलेल्याने द्वीपकल्पीय भारतातील बहुतांश नद्या पश्चिम घाटातून उगम पावतात आणि पूर्व किनाऱ्याकडे वाहतात. उदा. महानदी, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी नद्या. महानदी, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी नद्यांच्या पूर्वेकडील प्रवाहामुळे पूर्व घाट छाटला किंवा विखंडित झालेला आहे. गोदावरी आणि कृष्णा नद्यांच्या डेल्टाच्या मध्यभागी पूर्व घाट जवळपास सपाट झालेला असून याचे मुख्य कारण नद्यांचे क्षरणकार्य सांगता येईल.

पूर्व घाट पर्वत वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्थानिक नावाने ओळखले जातात. जसे आंध्र प्रदेशात नल्लामलाई, पालकोंडा आणि तेलंगणा – वेलिकोंडा, शेषाचलम, तामिळनाडू- जावाडी, शेवराया, पांचाललाई आणि सिरुमलाई. तामिळनाडूच्या टेकड्या चारकोनाइट खडकापासून बनलेल्या आहेत. पूर्व घाटातील सर्वोच्च शिखर अरोयाकोंडा हे आंध्र प्रदेश राज्यात आहे. निलगिरी पर्वतासह तामिळनाडूच्या टेकड्यांवर चंदन आणि सागवानाची झाडे मुबलक प्रमाणात आढळतात.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc indian geography peninsular plateau and its expansion mpup spb
Show comments