सागर भस्मे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील लेखातून आपण महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानांबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्थेविषयी जाणून घेऊया. कोणत्याही विस्तीर्ण प्रदेशात वाहतूक व संदेशवहनाची व्यवस्था त्याचा विकास होण्यासाठी जास्त आवश्यक ठरते. सर्वसाधारणपणे भौगोलिक परिस्थिती अनुकूल असली की, भूपृष्ठाची रचना आणि हवामान अडथळा निर्माण न करत; पायाभूत सुविधा व वाहतूक सुविधांचा विकास होतो. आधुनिक अर्थव्यवस्थेत पायाभूत सुविधांमध्ये वाहतूक व संदेशवहन हे मूलभूत घटक आहेत.

सक्षम वाहतूक यंत्रणा ही दुर्गम, मागास व नागरी क्षेत्रांना जोडून जीवनमान उंचावण्यामध्ये आणि उत्पादकता वाढविण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. या क्षेत्रातील विकासामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतात. महाराष्ट्रातसुद्धा अनुकूल भौगोलिक परिस्थितीनुसार वाहतूक दळणवळणाचा विकास झालेला दिसतो. परंतु, महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टीस समांतर असलेला सह्याद्री पर्वत पश्चिम-पूर्व दिशेने म्हणजेच कोकण आणि देश यांच्यात वाहतूक संदेशवहन सुलभतेने निर्माण होण्यास मर्यादा घालीत आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्रातील वनक्षेत्रांचे प्रकार कोणते? त्यांचे वर्गीकरण कसे केले जाते?

महाराष्ट्रातील वाहतुकीचे प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे आहेत –

  • रस्ते
  • रेल्वे
  • विमानमार्ग
  • जलमार्ग

त्यांपैकी रस्ते वाहतुकीची माहिती आपण आजच्या लेखातून थोडक्यात पाहू.

महाराष्ट्राचे क्षेत्रफळ विचारात घेता, महाराष्ट्र राज्याच्या रस्ते विकास कार्यक्रमाचा उद्देश राज्यमार्गातील दुवे पूर्ण करणे, जिल्ह्यात मोठे रस्ते बांधणे; त्याचप्रमाणे वर्गीकृत विभाग, अविकसित विभाग आणि डोंगराळ दुर्गम विभाग यांच्या औद्योगिक विकासासाठी आवश्यक असलेल्या रस्त्यांची तरतूद करणे हा आहे.

महाराष्ट्रात १९५१ साली सुमारे ३० हजार किलोमीटर लांबीचे रस्ते होते. ज्यांची लांबी वीस वर्षांत दुपटीपेक्षा जास्त झाली, म्हणजेच १९७१ साली ६५ हजार कि.मी. झाली. महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यावार रस्त्यांच्या एकूण साध्य लांबीनुसार विचार केल्यास पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये सर्वांत पहिला क्रमांक पुणे जिल्ह्याचा असून रस्त्यांची एकूण साध्य लांबी ६,५८७ कि.मी. आहे. या खालोखाल सोलापूर ६,१७२ कि.मी., अहमदनगर ६,०९३ कि.मी., नाशिक ४,८५३ कि.मी. तर जळगाव ४,५६० कि.मी. या जिल्ह्यांचा समावेश होतो. याउलट महाराष्ट्रामध्ये रस्त्यांच्या एकूण साध्य लांबीनुसार सर्वांत शेवटच्या पाच जिल्ह्यांमध्ये शेवटचा क्रमांक ठाणे जिल्ह्याचा असून रस्त्यांची एकूण साध्य लांबी ८८९ कि.मी. आहे. यानंतर हिंगोली १,२०१ कि.मी. वाशीम १,२५५ कि.मी. भंडारा १,२८४ कि.मी. पालघर १,४४८ कि.मी. या जिल्ह्यांचा समावेश होतो.

रस्त्यांचे प्रकार :

रस्त्यांची रुंदी, त्यांचे महत्त्व, प्रादेशिक स्थान इत्यादी घटकांनुसार रस्त्यांचे प्रकार पडतात.

  • राष्ट्रीय महामार्ग
  • प्रमुख राज्य महामार्ग
  • राज्य महामार्ग
  • प्रमुख जिल्हा मार्ग
  • ग्रामीण रस्ते
  • इतर जिल्हा मार्ग

राष्ट्रीय महामार्ग :

भारतातील महत्त्वाची राज्ये एकमेकांशी प्रमुख शहरांच्या आधारे जोडली जातात, त्यांना ‘राष्ट्रीय महामार्ग’ असे म्हणतात. राज्यानुसार त्याची विभागणी पाहिल्यास राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. भारतातील एकूण राष्ट्रीय महामार्गांपैकी फक्त ९.२ टक्के महामार्ग महाराष्ट्रात आहेत. राज्याची लोकसंख्या व क्षेत्रफळ विचारात घेता सर्वसाधारणपणे बरोबर आहे. परंतु, महाराष्ट्राचे औद्योगिक उत्पादन देशाच्या एकूण उत्पन्नाच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्या मानाने पाहिल्यास राष्ट्रीय महामार्गाची लांबी बरीच कमी आहे. राज्यामध्ये १९५१ साली राष्ट्रीय महामार्गांची लांबी २,२१६ कि.मी. होती, तर २०१८ मध्ये १२,२७५ कि.मी.पर्यंत लांबी वाढली आणि राज्य महामार्गाची लांबी ३,२५८ कि.मी. आहे.

भारत सरकारने सोयीसाठी सर्व राष्ट्रीय महामार्गाांना क्रमांक दिलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये प्रमुख राष्ट्रीय महामार्ग मुंबई-नाशिक-आग्रा महामार्ग क्रमांक १६० व ६० (जुना क्र.३ होता) असून एकूण लांबी १,१६१ कि.मी.पैकी महाराष्ट्र राज्यामधील लांबी ३९१ कि.मी. आहे.
मुंबई-ठाणे-भिवंडी-नाशिक-धुळे या शहरांमधून हा महामार्ग आग्र्याकडे जातो. मुंबई-पुणे-बेंगळुरू-चेन्नई महामार्ग क्र. ४८ (जुना क्र.४) असून एकूण लांबी २,५३३ कि.मी. आहे. याची राज्यामधील लांबी ३७१ कि.मी. हा महामार्ग मुंबई-पुणे-सातारा-कराड-कोल्हापूर मार्गाने बेंगळुरूला जातो. या महामार्गाला प्रामुख्याने पुणे-बंगलोर या नावाने ओळखतात.

जलद वाहतुकीचे रस्ते (Express Highways) : जलद वाहतुकीचे रस्ते मार्गावरील अंतर कमी करण्याच्या दृष्टीने बांधले आहेत. महाराष्ट्रात दोन जलद वाहतुकीचे रस्ते आहेत.

१) पूर्व राजमार्ग (Eastern Express Highways) : हा रस्ता शीवपासून सुरू होतो व मध्य रेल्वेच्या पूर्वेला जवळजवळ समांतर रेषेत जात पूर्व राजमार्ग चेंबूर -घाटकोपर-विक्रोळी-भांडुप-मुलुंड आणि नंतर ठाण्यास वळसा घालून मुंबई-आग्रा रस्त्याला मिळतो. या राजमार्गाची लांबी सुमारे २४ कि.मी. आहे.

२) पश्चिम राजमार्ग (Western Express Highways) : हा राजमार्ग माहीमच्या खाडीपासून सुरू होतो आणि पश्चिम रेल्वेलाइनला समांतर दहिसरपर्यंत जातो. याची लांबी सुमारे २५ कि.मी. आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्रातील कोणत्या भागांत सर्वाधिक पावसाची नोंद होते? राज्यातील पर्जन्याचे प्रकार कोणते?

मुंबई-पुणे सहा पदरी रस्ता वाहनांची कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने बांधलेला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विषम प्रमाणात आहे. राष्ट्रीय महामार्गाची जिल्ह्यानुसार आकडेवारी पाहता असे आढळते की, पुणे जिल्ह्यात सर्वांत जास्त लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत. त्या खालोखाल रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. या जिल्ह्यांतून एकमेव मुंबई-कोकण-गोवा रस्ता जातो. ठाणे, नाशिक व नागपूर जिल्ह्यांत सुमारे २०० कि.मी.पेक्षा जास्त लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत. इतर जिल्ह्यांमध्ये त्याची लांबी सुमारे १०० ते १५० कि.मी.दरम्यान आहे. संभाजीनगर, उस्मानाबाद, बुलढाणा, अमरावती व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये १०० कि.मी.पेक्षा कमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत. याउलट मराठवाड्यात विशेषतः परभणी, हिंगोली, नांदेड व लातूर या जिल्ह्यात एकही राष्ट्रीय महामार्ग नाही. त्याचप्रमाणे विदर्भात वाशीम व चंद्रपूर जिल्ह्यातही एकही राष्ट्रीय महामार्ग नाही. राज्यात सर्वात जास्त वाहतुकीचा राष्ट्रीय महामार्ग पुणे-बेंगळुरू असून त्या खालोखाल मुंबई-दिल्ली हा आहे.

प्रमुख राज्य महामार्ग :

महाराष्ट्रात प्रमुख शहरे जोडलेल्या रस्त्यांना ‘राज्य महामार्ग’ असे म्हणतात. त्याची देखरेख महाराष्ट्र सरकार करते. २०१२-१३ पासून या रस्त्यांची वर्गवारी करण्यात येते. महाराष्ट्रात १९५१ साली ७,५२० कि.मी. लांबीचे राज्य महामार्ग होते. सध्या राज्यात सुमारे २९,१३२ कि.मी. लांबीचे राज्य महामार्ग आहेत.

महाराष्ट्रात राज्य महामार्गांची एकूण संख्या १२९ आहे. त्यातील बरेच रस्ते राष्ट्रीय महामार्गास जोडले जातात. उदाहरणार्थ, बांद्रा घोडबंदर ठाणे रस्ता कापूर बावडी येथे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाला मिळतो. वसई-कल्याण-अहमदनगर-भूम रस्ता गोळेगाव येथे मलकापूर-सोलापूर रस्त्याला मिळतो. मुंबई-पनवेल रस्ता गोवा महामार्गास मिळतो. धुळे-चाळीसगाव-दौलताबाद रस्ता नाशिक-औरंगाबाद-नांदेड रस्त्याला मिळतो. विदर्भामध्ये यवतमाळ- बडनेरा रस्ता धुळे-नागपूर-कोलकता या राष्ट्रीय महामार्गाला मिळतो.

प्रमुख जिल्हा मार्ग :

जिल्ह्या जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणे रस्त्यांनी एकमेकांना जोडली जातात. अश्या रस्त्यांना जिल्हा मार्ग म्हणतात. जिल्ह्यातील उत्पादन केंद्रे आणि बाजारपेठा महामार्गांनी आणि रेल्वेने जोडण्याचा प्रयत्न केला जातो. महाराष्ट्रात या बाबतीतही तशी बरीच प्रगती करण्यात आली आहे. १९५१ साली प्रमुख जिल्हा मार्गाची लांबी ९,९३६ कि.मी., तर सध्या प्रमुख जिल्हा मार्गांची लांबी ५५,३८४ कि.मी. आहे.

ग्रामीण रस्ते :

खेड्यांचा संपर्क तालुक्याची ठिकाणे व जवळच्या जिल्ह्यातील रस्त्यांशी साधण्यासाठी ग्रामीण रस्ते विकसित केले जातात. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी ग्रामीण भागातील संदेशवहनाच्या पद्धतीत सुधारणा करण्याची अतिशय निकड आहे. १९५१ साली ग्रामीण भागात ५,७२६ कि.मी. लांबीचे ग्रामीण रस्ते होते. तर, सन २०१७-१८ नुसार ग्रामीण रस्त्यांची लांबी १,४५,८८१ कि.मी. आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी वाहतूक परिवहन आवश्यक असते. यामध्ये महाराष्ट्राने स्वातंत्र्यानंतर प्रगती केलेली दिसून येते. परंतु, देशाला विकसित बनविण्यासाठी अजूनही लांब पल्ला गाठण्याची गरज आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc indian geography road transportation in maharashtra and types of highway mpup spb
First published on: 17-10-2023 at 20:29 IST