सागर भस्मे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Seasons in India : दक्षिण-पश्चिम मान्सून आणि ईशान्य मान्सूनच्या आधारावर हवामानशास्त्रज्ञांनी भारतातील ऋतूंचे वर्गीकरण केले आहे. दक्षिण-पश्चिम मान्सूनमुळे द्वीपकल्पाचा दक्षिण-पूर्व भाग वगळता देशाच्या बहुतेक भागात तर उत्तर-पूर्व मान्सूनमुळे द्वीपकल्पाच्या दक्षिण-पूर्व भागात पाऊस पडतो. या दोन ऋतूंमध्ये उन्हाळा आणि हिवाळा असतो. उन्हाळा हा नैर्ऋत्य मान्सून सुरू होण्यापूर्वीचा ऋतू आणि हिवाळा हा ईशान्य मान्सून सुरू झाल्यानंतरचा ऋतू आहे. आधुनिक हवामानशास्त्रज्ञांनी भारतातील ऋतूंचे खालीलप्रमाणे वर्गीकरण केले आहे.

  • उष्ण हवेचा उन्हाळा : मार्च ते मे
  • दमट व उष्ण पावसाळी : ऋतू जून ते सप्टेंबर
  • परतीच्या मान्सूनचा काळ : ऑक्टोबर ते नोव्हेंबर
  • थंड व कोरडा हिवाळा : डिसेंबर ते फेब्रुवारी

उष्ण हवेचा उन्हाळा : मार्च ते मे

मार्च महिन्यात सूर्याच्या कर्कवृत्ताकडे हालचालीमुळे भारतात तापमान वाढू लागते. तापमानात वाढ झाल्यामुळे मार्चमध्ये दक्षिणेकडील तापमान ३८° सेल्सिअसपर्यंत पोहोचते. उत्तर भारतात ही स्थिती मे महिन्याच्या मध्यात येत असून उत्तर भारतात जून महिन्यात तीव्र उष्णता जाणवते आणि तापमान ४७° सेल्सियसपर्यंत पोहोचते. तथापि, समुद्रालगतच्या भागात आणि डोंगराळ भागात तापमान तुलनेने कमी राहते. तापमान वाढले की हवेचा दाबही कमी होतो. या वेळी राजस्थान, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आणि छोटा नागपूरच्या पठारी भागात हवेच्या कमी दाबाचे केंद्र तयार होते. मार्च मे दरम्यान वाऱ्याची दिशा आणि मार्ग बदलल्यामुळे, पश्चिमी वारा या नावाचे वारे वाहतात. ज्याला लू वारे म्हणतात. ते खूप गरम आणि कोरडे असल्याने ओल्या व कोरड्या वाऱ्याच्या संयोगामुळे वादळे आणि पाऊस येतो. कोलकात्यातील कालबैसाखीचा पाऊस हे त्याचे उदाहरण आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारताचा भूगोल : हिमालय पर्वत; निर्मिती आणि विस्तार

दमट व उष्ण पावसाळी ऋतू (नैर्ऋत्य मान्सून हंगाम) : जून ते सप्टेंबर

या महिन्यात सूर्य कर्कवृत्तावर लंबवत असल्यामुळे हवामानात बदल होण्याची प्रक्रिया सुरू होते. याचे कारण मान्सूनच्या आगमनामुळे पडणाऱ्या पावसामुळे तापमान २° सेल्सिअस ते ३° सेल्सिअसपर्यत जूनच्या तुलनेत कमी होते. भारतात जून-जुलैमध्ये राजस्थान वगळता सर्व ठिकाणी तापमान जवळपास सारखेच राहते, त्यानंतरच्या महिन्यांत तापमानात आणखी घट होते.
जून महिन्यात सूर्याची किरणे थेट उष्ण कटिबंधावर म्हणजे कर्कवृत्तावर लंबवत पडतात, त्यामुळे पश्चिम मैदानी भागात वारे गरम होतात आणि कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. कमी दाबाचे क्षेत्र इतके मजबूत आहे की दक्षिण गोलार्धातील व्यापारी वारे कमी दाबाचे क्षेत्र भरण्यासाठी विषुववृत्त ओलांडतात. जेव्हा हे वारे विषुववृत्त ओलांडून भारतीय उपखंडाकडे सरकतात तेव्हा पृथ्वीच्या हालचालीमुळे त्यांची दिशा बदलते आणि ते दक्षिण- पश्चिम दिशेने वाहू लागतात. या कारणास्तव जून ते सप्टेंबर दरम्यान पडणाऱ्या पावसाला ‘नैर्ऋत्य मान्सून’ म्हणतात.

परतीच्या मान्सूनचा काळ : ऑक्टोबर ते नोव्हेंबर

२३ सप्टेंबरपासून सूर्याचे दक्षिणायन सुरू होते आणि उत्तर गोलार्धात तापमान कमी होऊन वायुदाब वाढतो, परिणामी उत्तर भारतात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रभाव कमी होऊन ते आग्नेय व दक्षिणेकडे प्रवास करू लागतात. यालाच मान्सूनचे निर्गमन असे म्हणतात.
परतीच्या मान्सूनमध्ये तापमान आणि आर्द्रतेत किंचित वाढ होते, याला ऑक्टोबर हीट असेही म्हणतात. खरं तर, मान्सून परतल्यावर आधी तापमान वाढते पण काही वेळातच तापमान कमी होण्यास सुरुवात होते आणि नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारीमध्ये कडाक्याची थंडी असते.
तापमान कमी होण्याचे कारण म्हणजे या काळात सूर्याची किरणे कर्कवृत्ताकडून विषुववृत्ताकडे जातात आणि सप्टेंबरमध्ये थेट विषुववृत्तावर पडतात. तसेच उत्तर भारतातील मैदानी भागात कमी दाबाचे क्षेत्र हे मान्सूनचे वारे आकर्षित करण्याइतके मजबूत नसतात म्हणून मान्सूनचे वारे मध्य भारतात ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या आठवड्यात दक्षिण भारतात पाऊस पाडू शकतात. अशा प्रकारे नोव्हेंबरच्या अखेरीस मान्सून भारतीय उपखंडातून निघून जातो. हे निर्गमन टप्प्याटप्प्याने केले जाते, म्हणून याला नैर्ऋत्य मान्सूनची माघार असे म्हणतात. शरद ऋतूत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळे उद्भवतात, ज्यामुळे भारत आणि बांगलादेशमध्ये प्रचंड विनाश होतो. चक्रीवादळामुळे पूर्व किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडतो.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारताचा भूगोल : उत्तर भारतीय मैदानी प्रदेश

थंड व कोरडा हिवाळा : डिसेंबर ते फेब्रुवारी

या दरम्यान सूर्याची किरणे मकरवृत्तावर लंबरूप पडतात. हिवाळ्यात सरासरी तापमान २४८ ते २५० पर्यंत तर उत्तरेकडील मैदानात ते १०० ते १५८ पर्यंत असते. हिवाळ्यात कमाल तापमानाचा सर्वाधिक फरक राजस्थानमध्ये आढळतो. हिवाळ्यात दिवस सामान्यतः रात्रीच्या तुलनेत उबदार असतात आणि रात्री थंड असतात. हिवाळ्यात तापमान दक्षिणेकडून उत्तरेकडे कमी होते. हिवाळ्यात, पश्चिमी अडथळ्यांमुळे म्हणजे पश्चिमी विक्षोभामुळे पाऊस पडतो. पश्चिमी अडथळ्यांचा उगम पूर्व भूमध्य समुद्रात होतो, जो पश्चिम आशिया, इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान ओलांडून पूर्वेकडे सरकतो आणि भारतात पोहोचतो आणि या मार्गावर कॅस्पियन समुद्र आणि पर्शियन गल्फमधून मिळालेल्या आर्द्रतेद्वारे उत्तर भारतात पाऊस पडतो. भारतात एकूण पावसाच्या प्रमाणापैकी उन्हाळ्यात फक्त १० टक्के पाऊस पडतो. केरळ आणि कर्नाटकच्या किनारी भागात पावसाळ्याच्या शेवटी मान्सूनपूर्व सरी येतात. या सरींना आम्रसरी आणि चेरी ब्लॉसम म्हणतात. या पावसामुळे आंब्याच्या बागांमध्ये नुकसान होते आणि चहाच्या बागांमध्ये चहाची पाने उघडण्यास मदत होते.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc indian geography seasons in india and their classification mpup spb
Show comments