सागर भस्मे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तापी नदीचा उगम मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगेमध्ये मुलताईजवळ झाला आहे. या नदीची एकूण लांबी ७२४ किलोमीटर असून, त्यापैकी महाराष्ट्रामध्ये तिचे २०८ किमी लांबीचे क्षेत्र आहे. तापी नदी ही मध्य प्रदेश-महाराष्ट्र-गुजरात या तीन राज्यांमधून जात शेवटी अरबी समुद्राला जाऊन मिळते. तापी नदीखोऱ्याचे एकूण क्षेत्रफळ ६५,१५० चौ.किमी असून, महाराष्ट्रात ते ३१,६६० चौ. किमी आहे. तापी नदी ही महाराष्ट्रातील सर्वांत मोठी पश्चिम वाहिनी नदी असून, तिला ‘खानदेश कन्या’ म्हणून ओळखले जाते.

हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : महाराष्ट्रातील खनिज संपत्ती

तापी नदीखोऱ्यामध्ये महाराष्ट्रातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश होतो. तापी नदीच्या उत्तरेस कालीभीतचे डोंगर; तर दक्षिणेस मेळघाट व गाविलगडचे डोंगर आहेत. तापी नदीला समांतर अशी सातपुडा पर्वतरांग असून, तापी-पूर्णा खोऱ्याची साधारण रुंदी ही २४० किमी आहे. तापी नदी मध्य प्रदेशच्या बऱ्हाणपूर खिंडीतून जळगाव जिल्ह्यातील रावेर शहराजवळ पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश करते. त्यानंतर ती नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशे शहराच्या जवळून पश्चिमेस गुजरातच्या सुरत शहराजवळ खंबाटच्या आखातातून अरबी समुद्राला जाऊन मिळते.

  • तापी नदीच्या उजव्या किनाऱ्यावर चंद्रभागा, भुलेश्वरी, नंद, वान व गोमाई नद्या येऊन मिळतात.
  • तापी नदीच्या डाव्या किनाऱ्यावर पिढी, काटेपूर्णा, मोरणा, नळगंगा, गिरणा, पांजरा व पूर्णा या नद्या येऊन मिळतात.

हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : सह्याद्री पर्वतातील प्रमुख डोंगररांगा

तापी नदीच्या काही महत्त्वाच्या उपनद्या खालीलप्रमाणे :

पूर्णा : पूर्णा नदीचा उगम अमरावती जिल्ह्यातील गाविलगड डोंगराच्या दक्षिण उतारावर होतो. अमरावती जिल्ह्यामधून बुलढाणा, अकोला व जळगाव जिल्ह्यात श्री क्षेत्र चांगदेवजवळ पूर्णा तापी नदीला मिळते. पूर्णा नदीच्या उपनद्यांमध्ये प्रामुख्याने पिढी, काटेपूर्णा, ????मान,???नळगंगा, मोरणा या नद्यांचा समावेश होतो. तापी व पूर्णा नदीचा संयुक्त प्रवाह जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांतून वाहतो.

पांजरा : पांजरा नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील गाळण डोंगररांगेत होत असून, या नदीची एकूण लांबी १६० किलोमीटर आहे. कान व बुराई या दोन नद्या पांजरा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. पांजरा नदी थाळनरेपासून सुमारे आठ कि.मी. अंतरावर धुळे जिल्ह्यात असलेल्या मुडावद येथे तापी नदीस मिळते. नदीच्या पूर्व प्रवाहाच्या भागात तिच्या डाव्या तीराला समांतर पसरलेल्या लांबट आकाराच्या अनेक डोंगररांगा आढळतात.

बुराई : बुराई नदीचा उगम नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात कोंडाईबारी येथे झाला आहे. ही नदी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर आणि धुळे जिल्ह्यातील साक्री व सिंदखेडराजा या तीन तालुक्यांमधून वाहत असून, पुढे ती सुलवाडे येथे तापीला जाऊन मिळते. साखरी तालुक्यातील आखाडे व शिंदखेडामधील वाडी, शेवाडे या दोन ठिकाणी धरण बांधण्यात आले आहे. नदीच्या प्रमुख उपनद्यांमध्ये पान, शेवरी, रोडी या नद्यांचा समावेश होतो.

चंद्रभागा : चंद्रभागा ही पूर्णा नदीची उपनदी आहे. ही नदी महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातून वाहते. चंद्रभागा नदीचा उगम अमरावती जिल्ह्यातील गाविलगड टेकड्यांमध्ये होत असून, या नदीची एकूण लांबी २८ किलोमीटर आहे. ही नदी रामतीर्थ येथे पूर्णा नदीत जाऊन मिळते.

काटेपूर्णा : काटेपूर्णा नदीचा उगम वाशिम जिल्ह्यातील गावाजवळ टेकड्यांमध्ये काटा गावाजवळ झालेला आहे. या नदीची एकूण लांबी ९७ किलोमीटर असून, ही नदी महाराष्ट्रातील अकोला, वाशिम या दोन जिल्ह्यांमधून वाहते आणि शेवटी मूर्तिजापूर तालुक्यात भटोरी या गावाजवळ पूर्णा नदीला जाऊन मिळते.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc indian geography tapi river system mpup spb
Show comments