सागर भस्मे
मागील लेखातून आपण उर्जास्त्रोतांबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण भारतातील वाहतूक व्यवस्थेबाबत जाणून घेऊया. वाहतूक व्यवस्थेमध्ये रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतूक, हवाई वाहतूक व जलवाहतूक यांचा समावेश होतो.
भारतातील रस्ते वाहतूक
भारतामध्ये सुमारे ६२.१६ लाख कि.मी. लांबीचे रस्त्यांचे जाळे आहे. रस्त्यांच्या जाळ्याच्या बाबतीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर असून, त्यापाठोपाठ अनुक्रमे भारत व चीन यांचा क्रमांक लागतो. भारतात प्रतिहजार लोकसंख्येमागे अंदाजे ५.१३ किमीचे रस्ते आहे. भारतातील एकूण रस्त्यांवर ७१% मालवाहतूक आणि सुमारे ८५% प्रवासी वाहतूक होते. घनतेच्या बाबतील पहिल्या चार देशांमध्ये अनुक्रमे अमेरिका, चीन, ब्राझील व रशिया यांचा समावेश होतो.
हेही वाचा – UPSC-MPSC : भारताचा भूगोल : गोदावरी नदी प्रणाली
राष्ट्रीय महामार्ग
२०२१ पर्यंत भारतातील राष्ट्रीय महामार्गांची एकूण लांबी सुमारे १,४४,६३४ किमी असून, भारतातील एकूण राष्ट्रीय महामार्गांची संख्या ५९९ आहे. देशातील एकूण रस्त्यांच्या लांबीच्या फक्त २.१९% राष्ट्रीय महामार्ग आहेत, मात्र, देशातील एकूण रस्ते वाहतुकीपैकी सुमारे ४०% वाहतूक राष्ट्रीय महामार्गाद्वारे केली जाते. महाराष्ट्र हे सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग असलेले राज्य असून, त्यानंतर अनुक्रमे उत्तर प्रदेश, राजस्थान व मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो. राष्ट्रीय महामार्ग केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत. म्हणजेच त्यांच्या बांधकाम आणि देखभालीची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग (CPWD) द्वारे केले जाते. भारतातील सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना १८५४ मध्ये लॉर्ड डलहौसीच्या काळात झाली.
सुवर्ण चतुर्भुज प्रकल्प (Golden Quadrilateral Project) –
सुवर्ण चतुर्भुज प्रकल्पांतर्गत, भारतातील दिल्ली, मुंबई, चेन्नई व कोलकाता ही महानगरे जोडली गेली आहेत. ही चार महानगरे जोडणाऱ्या सुवर्ण चतुर्भुज प्रकल्पाची एकूण लांबी ५,८४६ किमी असून, दिल्ली ते मुंबई – १४१९ कि.मी., मुंबई ते चेन्नई – १२८९ कि.मी., कोलकाता ते दिल्ली – १४५३ कि.मी. व चेन्नई ते कोलकाता महामार्गाची लांबी १६८४ कि.मी. आहे. गोल्डन चतुर्भुज प्रकल्पातील सर्वांत लांब महामार्ग चेन्नई ते कोलकाता असून, तो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-१६ म्हणून ओळखला जातो.
राज्य महामार्ग
२०२१ पर्यंतच्या आकडेवारीनुसार- राज्य महामार्गांची लांबी सुमारे १,७६,८१८ कि.मी. एवढी आहे. प्रत्येक राज्याचे स्वतःचे राज्य महामार्ग आहेत. राज्य महामार्ग राज्याच्या सर्व जिल्हा मुख्यालयांना राज्याच्या राजधानीशी जोडतात. १९५१ मध्ये महाराष्ट्रात राज्य महामार्गांची एकूण लांबी ७,५२५ किलोमीटर होती आणि ती आता जवळपास चार पट वाढून, ३१ हजार ९९७ किमी इतकी झालेली आहे. महाराष्ट्र हे राज्य महामार्गांची सर्वाधिक लांबी असलेले राज्य असून, त्यापाठोपाठ कर्नाटक व गुजरात अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत. २०१२-१३ पासून राज्य महामार्गांची विभागणी प्रमुख राज्य महामार्ग व राज्य महामार्ग अशा दोन भागांमध्ये केली जाते. त्यानुसार महाराष्ट्रात प्रमुख राज्य महामार्गांची लांबी २,९६७ किमी इतकी असून, राज्य महामार्गांची लांबी २९ हजार ३० कि.मी. आहे.
रेल्वे वाहतूक
गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीच्या काळात भारतातील पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणेदरम्यान धावली होती. त्याची एकूण लांबी ३४ किमी होती. भारतातील दुसरी रेल्वे लाईन १८५४ मध्ये कोलकाता व राणीगंजदरम्यान टाकण्यात आली. गव्हर्नर जनरल लॉर्ड रिडिंग यांच्या कारकिर्दीत मुंबई व कुर्लादरम्यान भारतातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे धावली. या रेल्वेला ‘दख्खनची राणी’ किवा ‘डेक्कन क्वीन’ म्हणून ओळखले जाते. भारतीय रेल्वे ही आशियातील सर्वांत मोठी (६८,१०३ कि.मी.) आणि जगातील तिसरी सर्वांत मोठी रेल्वे व्यवस्था आहे.
अमेरिकेची रेल्वे व्यवस्था ही जगातील सर्वांत मोठी रेल्वे व्यवस्था आहे. त्यानंतर रशिया व भारताची रेल्वे व्यवस्था ही अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण, रेल्वेच्या लांबीच्या बाबतीत अमेरिका, चीन, रशिया यांच्यानंतर भारताचा जगात चौथा क्रमांक लागतो. भारतातील रेल्वे विभाग व्यवस्थापन आणि संचालनासाठी वेगवेगळ्या प्रशासकीय घटकांमध्ये विभागला गेला आहे. त्याला ‘रेल्वे झोन’ म्हणतात. सद्य:स्थितीला भारतातील रेल्वे व्यवस्था १८ झोनमध्ये विभागली गेली आहे.
हेही वाचा – UPSC-MPSC : भारताचा भूगोल : पारंपरिक ऊर्जास्रोत
भारतीय जलवाहतूक
जलवाहतूक हे वाहतुकीचे सर्वांत स्वस्त आणि जुने साधन आहे. या वाहतुकीसाठी मोठ्या भांडवलाची आवश्यकता नसते. देशातील अंतर्गत जलमार्गांची सर्वाधिक लांबी उत्तर प्रदेशमध्ये आहे. कारण- तेथे बहुतेक नद्या आणि कालवे आढळतात. देशातील जलमार्गांच्या विकासासाठी १९८६ मध्ये भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाची (NIWA) स्थापना करण्यात आली. त्याचे मुख्यालय नोएडा येथे आहे. राष्ट्रीय जलमार्ग अधिनियम, २००६ अंतर्गत १११ अंतर्देशीय जलमार्ग राष्ट्रीय जलमार्ग म्हणून घोषित करण्यात आले आहेत. MMT (Multimodel Terminals) भारतातील पहिला अंतर्देशीय जलमार्ग वाराणसी येथे १२ नोव्हें. २०१८ ला गंगा नदीमध्ये सुरू झाला.
बंदरे (Ports)
भारताला सुमारे ७,५१७ किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. भारतामध्ये १३ मोठी बंदरे आणि २०० छोटी बंदरे आहेत. भारताचा ९५% परकीय व्यापार आणि मूल्यानुसार ७०% व्यापार हा सागरी मार्गाने होतो. भारतात १३ प्रमुख बंदरे आहेत. या बंदरांमध्ये चेन्नई, कोची, एन्नोर, कोलकाता, कांडला, मंगलोर, मार्मागोवा, मुंबई पोर्ट ट्रस्ट, जेएनपीटी, पॅराद्वीप, तुतिकोरिन, विशाखापट्टणम व पोर्ट ब्लेअर या यांचा समावेश होतो.
हवाई वाहतूक
भारतात ब्रिटिशांच्या कारकिर्दीत हवाई वाहतुकीला प्रारंभ झाला असून, भारतात नागरी हवाई वाहतूक खात्याची स्थापना १९२७ मध्ये झाली. १९५३ मध्ये हवाई वाहतुकीसाठी खासगी कंपन्यांना परवानगी देण्यात आली. विमाननिर्मितीच्या उद्योगास देशात सर्वप्रथम १९४० मध्ये सुरुवात झाली. डिसेंबर १९१२ मध्ये भारतीय राज्य हवाई सेवेद्वारे युनायटेड किंग्डम आधारित इम्पिरियल एअर सर्व्हिसच्या सहकार्याने लंडन-कराची-दिल्ली विमान सेवा सुरू करण्यात आली. हे भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय उड्डाण होते.
हेही वाचा – UPSC-MPSC : भारताचा भूगोल : भारतीय उद्योग
१९१५ मध्ये ‘टाटा सन्स लिमिटेड’ने कराची व मद्रासदरम्यान नियमित हवाई मेल सेवा सुरू केली आणि २४ जानेवारी १९२० रोजी ‘रॉयल एअरफोर्स’ने कराची व बॉम्बेदरम्यान नियमित हवाई मेल सेवा सुरू केली. जेआरडी टाटा यांनी स्थापन केलेल्या ‘टाटा एअरलाइन्स’चे १९४६ रोजी एअर इंडियामध्ये रूपांतर करण्यात झाले. पुढे १९५३ मध्ये इंडियन एअरलाइन्स या विमान कंपनीची स्थापना करण्यात आली. एअर इंडिया आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक; तर इंडियन एअरलाइन्स देशांतर्गत वाहतूक व्यवस्था पाहत होती.