सागर भस्मे
भूकवचाला पडलेल्या भेगेतून किंवा गोलाकार छिद्रातून भूपृष्ठावर येणाऱ्या लाव्हारसाच्या प्रक्रियेला ‘ज्वालामुखी’ असे म्हणतात. ज्या अरुंद भेगेतून किंवा छिद्रातून हा लाव्हारस भूपृष्ठावर येतो, त्यास ‘ज्वालामुखीचे मुख’ असे म्हणतात. ज्वालामुखीचे भूपृष्ठावरील मुख खोलगट असते. भूपृष्ठाला पडलेल्या लांब भेगेमधून ज्वालामुखीचा उद्रेक झाला असेल, तर त्यास ‘भ्रंशमूलक ज्वालामुखी’ असे म्हणतात; तर गोलाकार छिद्रातून बाहेर पडणाऱ्या ज्वालामुखीला ‘केंद्रीय ज्वालामुखी’ असे म्हणतात. ज्वालामुखीतून विविध प्रकारचे पदार्थ बाहेर फेकले जातात. त्यात कठीण खडक, शिलारस, राख, खडकांचे लहान तुकडे, वायू इत्यादींचा समावेश होतो. या सर्वांना लाव्हा (Lava), असे म्हणतात.
हेही वाचा – UPSC-MPSC : भारताचा भूगोल : यमुना नदी प्रणाली
ज्वालामुखीची कारणे
ज्वालामुखी म्हणजे भूकवचाला पडलेल्या भेगेतून किंवा गोलाकार छिद्रातून पृथ्वीच्या अंतरंगातून तप्त शिलारस, राख, वेगवेगळे वायू इत्यादी पृथ्वीच्या कवचातून पृष्ठभागावर येण्याचा मार्ग होय. हे उद्रेक मूलत भूपट्ट विवर्तनिकी व ऊर्ध्वगामी प्रावरणीय चक्रीय शिलारस स्वभ (Manile Plaine) अशा दोन प्रक्रियांतून होतात.
भूपट्ट विवर्तनिकी : जेथे दोन भूपट्ट एकत्र येत असतात तेथे त्यांपैकी जड व जास्त घनता असलेला भूपट्ट दुसऱ्या भूपट्टाखाली सरकतो व प्रावरणात शिरतो. सरकणारा भूपट्ट वितळतो आणि त्याचे शिलारसात रूपांतर होते. अशा रीतीने तयार झालेला शिलारस पुन्हा कवच वा पृष्ठभागाकडे येण्याचा प्रयत्न करत राहतो. परिणामतः आत्यंतिक दाबामुळे कवच भेदून शिलारस स्फोटकरीत्या पृष्ठभागावर येतो. या शिलारसाचा स्रोत साधारणतः ५०० ते ८०० किमी खोलीवर असतो. अशा प्रकारची ज्वालामुखीय उद्रेकाची प्रक्रिया पॅसिफिक महासागराच्या किनारी भागात व आल्प्स हिमालय पट्ट्यात घडत असते.
विलगीकरण सीमा : मध्य महासागरीय पर्वतरांगांना विलगीकरण सीमा म्हणतात. या भागात दोन भूपट्ट एकमेकांपासून दूर जात असतात. भूपट्ट दूर होत असताना शिलारस त्यांच्या मधील भेगेतून वर येतो. त्यापासून नवीन खडक बनत असतो. अशा रीतीने होणाऱ्या ज्वालामुखीस खचदरीय ज्वालामुखी म्हणतात. आइसलँड व आफ्रिकेतील खचदरी क्षेत्रातील ज्वालामुखी ही जमिनीवरील खचदरीय ज्वालामुखींची उदाहरणे आहेत.
तप्त स्थळ ज्वालामुखी : हे ज्वालामुखी भूपट्ट विवर्तनिकी प्रक्रियेशी संबंधित नसतात. त्यांचे स्थानदेखील भूपट्ट सीमांपासून दूरवर असते. प्रावरणात खोलवर तयार होणारे उर्ध्वगामी शिलारस स्तंभ थेट पृष्ठभागापर्यंत पोहोचण्याने हे उद्रेक होतात. या स्तंभांचे स्थान प्रावरण गाभा सीमेवर असते. त्यांना तप्त स्थळे, असे म्हणतात. भूपट्टांच्या हालचालींच्या तुलनेने ही तप्त स्थळे सापेक्षरीत्या स्थिर असतात. त्यामुळे जेव्हा एखादा भूपट्ट तप्त स्थळावरून जातो, तेव्हा त्या भूपट्टावर ज्वलामुखीचे उद्रेक होतात. पॅसिफिक महासागरातील हवाई बेटांची निर्मिती अशा तप्त स्थळ ज्वालामुखीमुळे झाली आहे.
ज्वालामुखीचे प्रकार
ज्वालामुखीच्या प्रकारांचे त्याचा उद्रेक व कालावधी यानुसार दोन भाग पडतात. ते म्हणजे १) उद्रेकाच्या स्वरूपावरून पडणारे ज्वालामुखीचे प्रकार आणि २) उद्रेकाच्या कालावधीवरून पडणारे ज्वालामुखीचे प्रकार.
१) उद्रेकाच्या स्वरूपावरून पडणारे ज्वालामुखीचे प्रकार :
केंद्रीय ज्वालामुखी : जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक भूपृष्ठाला खोलवर पडलेल्या भेगेतून होतो, तेव्हा त्यास केंद्रीय ज्वालामुखी म्हणतात. ज्वालामुखीचे उद्रेक हानिकारक असतात. अशा उद्रेकाच्या वेळी लाव्हारस, राख, खडकांचे लहान-मोठे तुकडे आकाशात शेकडो मीटर उंचीपर्यंत वर फेकले जातात. तसेच त्या वेळी विविध प्रकारच्या वायूंच्या उद्रेकामुळे आकाशात कोबी-फ्लॉवरसारख्या आकाराच्या प्रचंड ढगांची निर्मिती होते. जपानमधील फुजियामा व इटलीतील व्हिस्युव्हियस हे या प्रकारचे ज्वालामुखी आहेत.
भ्रंशमूलक किंवा भेगीय ज्वालामुखी : भूपृष्ठाला पडलेल्या भेगेतून या प्रकारच्या ज्वालामुखीचा उद्रेक होतो. या प्रकारचे ज्वालामुखीचे उद्रेक शांत असून, ते व्यापक भूप्रदेशात येतात. अशा उद्रेकाच्या वेळी बाहेर आलेला लाव्हा घट्ट असेल, तर तो त्या भेगेच्या दोन्ही बाजूंना साचून सपाट मैदाने, पठारे तयार होतात. दख्खनचे पठार हे भ्रंशमूलक ज्वालामुखीचे उदाहरण आहे.
(२) उद्रेकाच्या कालावधीवरून पडणारे ज्वालामुखीचे प्रकार :
जागृत ज्वालामुखी : अशा ज्वालामुखीतून सतत लाव्हा, वायू, राख यांचा उद्रेक होत असतो. अशा ज्वालामुखींना दीपगृह, असेही म्हणतात. कारण- यातून बाहेर पडणाऱ्या लाव्हा, वायू यांमुळे सतत उजेड उपलब्ध होतो. जगातील असे जागृत ज्वालामुखी मध्य सागरीय जलमग्न पर्वतरांगेच्या क्षेत्रात प्रामुख्याने आढळतात. जपानचा फुजियामा, भूमध्य सागरातील स्टॉबोली ही जागृत ज्वालामुखीची उदाहरणे आहेत.
निद्रिस्त / सुप्त ज्वालामुखी : एखाद्या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर काही काळासाठी तो शांत होतो आणि पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो, अशा ज्वालामुखीला ‘निद्रिस्त ज्वालामुखी’ म्हणतात. अशा अचानक जागृत होणाऱ्या ज्वालामुखीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होते. इटलीतील व्हिस्युव्हियस, अलास्कातील काटमाई ही या प्रकारच्या ज्वालामुखीची उदाहरणे आहेत.
मृत ज्वालामुखी : ज्या ज्वालामुखींचा दीर्घ काळ उद्रेक झालेला नाही, अशा ज्वालामुखींना ‘मृत ज्वालामुखी’ असे म्हणतात. अशा ज्वालामुखीचा जागृत न होण्याचा कालावधी निश्चित नसला तरी किमान काही हजार वर्षे तरी त्याचा उद्रेक झालेला नसतो. भविष्यात त्या ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची लक्षणे न दिसणे हेही येथे अपेक्षित आहे. अशा ज्वालामुखींच्या मुखात पाणी साचून, तेथे सरोवरे तयार झालेली आहेत. उदा. आफ्रिकेच्या टांझानियातील माउंट किलिमांजारो हा ज्वालामुखी याचे उदाहरण आहे; तर काही मृत ज्वालामुखींच्या मुखात जंगले वाढलेली आहेत.
हेही वाचा – UPSC-MPSC : भारताचा भूगोल : वाहतूक व्यवस्था
ज्वालामुखीच्या मुखातून बाहेर पडणारे पदार्थ
घनरूप पदार्थ : ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी विविध प्रकारचे घनरूप पदार्थ बाहेर पडतात, त्यांना ‘पायरोक्लास्ट’ म्हणतात. त्यात राख, ज्वालामुखीय धूळ, खडकांचे लहान-मोठे तुकडे यांचा समावेश होतो.
द्रवरूप पदार्थ : ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी जे द्रवरूप पदार्थ बाहेर येत असतात, त्यांना ‘मॅग्मा’ म्हणतात. लाव्हा व मॅग्माचे वर्गीकरण त्यांच्यातील वाळू किंवा सिलिका या घटकांच्या प्रमाणावरून करतात. ॲसिड लाव्हामध्ये सिलिकाचे प्रमाण अधिक असल्याने तो घट्ट असतो आणि त्याचे ज्वालामुखीच्या मुखासभोवताली संचयन होते. त्यामुळे टेकड्यांची निर्मिती होते. बेसिक लाव्हामध्ये सिलिकाचे प्रमाण कमी असून, तो जास्त प्रवाही असतो. त्यामुळे भूपृष्ठावर तो दूरपर्यंत पसरत जातो आणि पठारांची निर्मिती होते.
वायुरूप पदार्थ : ज्वालामुखीच्या उद्रेकातून विविध प्रकारचे विषारी वायू, ज्वलनशील वायू बाहेर पडतात. त्यात नायट्रोजन, कार्बन डाय-ऑक्साइड, हायड्रोजन व सल्फर डाय-ऑक्साइड प्रमुख असतात. याशिवाय अशा वायुरूप पदार्थांत वाफेचे ६०-९० टक्के प्रमाण असते.