सागर भस्मे
मागील एका लेखातून आपण डॉ. त्रिवार्था यांच्या हवामान वर्गीकरणाविषयी माहिती घेतली होती. या लेखातून आपण डॉ. आर. एल. सिंग यांनी भारतीय हवामानाचे कोणत्या आधारावर व कसे वर्गीकरण केले हे जाणून घेऊ.
डॉ. आर. एल. सिंग यांचे हवामान क्षेत्राचे वर्गीकरण
डॉ. आर. एल. सिंग यांनी १९७१ मध्ये भारतीय हवामानाचे वर्गीकरण सादर केले. त्यांनी सर्वांत उष्ण व सर्वांत थंड महिने आणि सरासरी वार्षिक पर्जन्यमानाच्या तापमानाच्या आधारावर देशाची १० हवामान विभागांमध्ये विभागणी केली. ते विभाग पुढीलप्रमाणे :
१) प्रति आर्द्र उत्तर-पूर्व (Per Humid North-East) : नावाप्रमाणे यात सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, त्रिपुरा, मिझोराम व मेघालय यासह ईशान्येकडील राज्यांच्या बहुतेक भागांचा समावेश होतो. या भागात जुलैचे तापमान २५-३३ अंश सेल्सियस असते; जे जानेवारीत ११-२४ अंश सेल्सियसपर्यंत घसरते. या भागातील बर्याच ठिकाणी सरासरी वार्षिक पर्जन्यमान २०० सेंमी असते; तर काही ठिकाणी १००० सेंमीपेक्षा जास्त पावसाची नोंद होते.
हेही वाचा – UPSC-MPSC : भारतातील खारफुटीची वने कुठं आढळतात? या वनांची वैशिष्ट्ये कोणती?
२) दमट सह्याद्री आणि पश्चिम किनारा (Humid Sahyadri and West Coast) : या भागात सह्याद्री (पश्चिम घाट) आणि त्याच्या उत्तरेकडील नर्मदा खोऱ्यापासून दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या पश्चिम किनारपट्टीच्या पट्ट्याचा समावेश होतो. या भागात जानेवारीमध्ये तापमान १९-२८ अंश से. असते; जे जुलैमध्ये २६-३२ अंश से.पर्यंत वाढते. या पट्ट्यात सरासरी वार्षिक पर्जन्यमान सुमारे २०० सेंमी असते; परंतु काही ठिकाणी विशेषतः पश्चिम घाटाच्या पश्चिमेकडील उतारांवर ते जास्त असू शकते.
३) दमट दक्षिण-पूर्व (Humid South-East) : या भागात ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड व झारखंड या क्षेत्राचा समावेश होतो. इथे जानेवारी आणि जुलैचे तापमान अनुक्रमे १२-२७ अंश से. आणि २६-३४ अंश से. असते. तर, सरासरी वार्षिक पाऊस १००-२०० सें.मी. पडतो.
४) अर्धआर्द्र संक्रमण (Subhumid Transition) : या भागात उत्तर प्रदेशचा पूर्व भाग, बिहार व झारखंडचा उत्तर भाग येतो. इथे जानेवारीचे तापमान ९ ते २४ अंश से. असते आणि जुलैमध्ये २४-४१ अंश से.पर्यंत वाढते; तर सरासरी वार्षिक पाऊस १००-२०० सेंमी पडतो.
५) अर्धआर्द्र लिटोरल (Subhumid Littorals) : या भागात पूर्व तमिळनाडू आणि किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश या क्षेत्राचा समावेश होतो. या भागात आर्द्र हवामान असते. या भागात मे महिना सर्वांत उष्ण असतो. यावेळी तापमान २८-३८ अंश से.पर्यंत वाढते. जानेवारीत तापमान २०-२९ से.पर्यंत घसरते. उन्हाळा कोरडा असतो; पण हिवाळा ओला असतो. संपूर्ण क्षेत्रामध्ये वार्षिक ७५-१५० सेंटिमीटर पाऊस पडतो, त्यापैकी बहुतेक नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मान्सूनची माघार होताना पडतो.
६) अर्धआर्द्र खंडीय (Subhumid Continental) : हे हवामान प्रामुख्याने गंगा मैदानात आढळते. जेथे जानेवारी आणि जुलैचे तापमान अनुक्रमे ७-२३ अंश से. आणि २६-४१ अंश से. असते. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५ ते १५० सेंमीपर्यंत होते.
७) अर्धशुष्क आणि उपोष्ण कटिबंधीय (semi arid and subtropical) : हे वातावरण सतलज-यमुना नद्यांच्या खोऱ्यात आहे; ज्यात पंजाब, हरियाणा, पूर्व राजस्थान आणि केंद्रशासित प्रदेश दिल्ली व चंदिगड यांचा समावेश होतो. इथे सरासरी पर्जन्यमान २५ ते १०० सेंमी असते; ज्यापैकी बहुतेक पाऊस उन्हाळ्यात पडतो. हिवाळ्यात वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे काही पाऊस होतो. तर, जानेवारीचे तापमान ६-२३ अंश से. असते; जे मे महिन्यात २६-४१ अंश से.पर्यंत वाढते.
८) अर्धशुष्क उष्ण कटिबंधीय (Semi arid tropical) : गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक व तेलंगणाच्या मोठ्या भागांमध्ये अर्धशुष्क उष्ण कटिबंधीय हवामान आहे. इथे जानेवारीमध्ये तापमान १३-२९ अंश से. आणि जुलैमध्ये २६-४२ अंश से. पर्यंत वाढते. तर सरासरी वार्षिक पाऊस ५० ते १०० सेंमीपर्यंत पडतो.
हेही वाचा – UPSC-MPSC : भूकंप म्हणजे नेमके काय? भारतातील कोणत्या भागाला भूकंपाचा सर्वाधिक धोका असतो?
९) शुष्क (Arid) : हवामानाच्या या भागात थरचे वाळवंट समाविष्ट आहे. त्यात पश्चिम राजस्थान, दक्षिण-पश्चिम हरियाणा व गुजरातचा कच्छ प्रदेशही येतो. येथे अत्यंत कोरडे हवामान आहे; ज्यामध्ये वार्षिक पाऊस फक्त २५ सेंमी पडतो आणि काही ठिकाणी तो १० सेंमी इतकाच पडतो. इथे जानेवारीचे तापमान ५-२२ अंश
से. असते; जे जूनमध्ये २०-४० से. पर्यंत वाढते. तसेच दैनंदिन आणि वार्षिक तापमानाची कक्षा खूप मोठी असते.
१०) पश्चिम हिमालय (West Himalaya) : हे हवामान पश्चिम हिमालयीन प्रदेशात आढळते; ज्यात जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड यांचा समावेश होतो. जुलैचे तापमान ३० अंश से. असते; जे जानेवारीत ०-४ अंश से.पर्यंत घसरते. इथे वार्षिक पर्जन्यमान १५० सेंमी असते; तर पाऊस हा उन्हाळ्यात नैर्ऋत्य मान्सून आणि हिवाळ्यात पश्चिम विक्षोभामुळे (Western Disturbances) होतो.