सागर भस्मे
मागील लेखातून आपण पर्जन्य म्हणजे काय? त्याची कारणे कोणती? आणि त्याच्या प्रकारांबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण भूकंपाविषयी जाणून घेऊ. तसेच भूकंपाला कारणीभूत असणारे घटक आणि त्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम, तसेच भारतातील भूकंपग्रस्त क्षेत्र यावर सविस्तर चर्चा करू.
भूगर्भातील हालचालींमुळे प्रचंड प्रमाणात उर्जेचे उत्सर्जन होते आणि त्यामुळे भूकंप लहरी तयार होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल होते. परिणामी जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा, कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे या सारख्या घडना घडतात. यालाच भूकंप असे म्हणतात. भूकंपामुळे भूपृष्ठाचा भाग मागे-पुढे किंवा वर-खाली होतो. जमिनीखाली असलेल्या भूकंपाच्या उगमस्थानास भूकंपनाभी असे म्हणतात, तर भूकंपनाभीच्या अगदी वर म्हणजेच भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचा केंद्रबिंदू असे म्हणतात.
हेही वाचा – UPSC-MPSC : पर्जन्य म्हणजे काय? त्याचे प्रकार कोणते?
भूकंप हा सर्वांत वाईट नैसर्गिक धोक्यांपैकी एक आहे. भूकंपामुळे व्यापक प्रमाणात विनाश आणि मानवी जीवांचे नुकसान होते. भूकंप प्रामुख्याने पृथ्वीच्या कवचाच्या कोणत्याही भागामध्ये समतोल नसल्यामुळे होतो. पृथ्वीच्या कवचामध्ये समतोल किंवा समस्थानिक असंतुलन (Isostatic Imbalance) निर्माण करण्यासाठी अनेक कारणे आहेत, जसे की ज्वालामुखीचा उद्रेक, फॉल्टिंग व फोल्डिंग, प्लेटचे एकमेकांवर वर आणि खाली येणे, पृथ्वीच्या आत वायूचा विस्तार व आकुंचन, मानवनिर्मित हायड्रोस्टॅटिक दाब, जलाशय व तलाव यांसारखे जलस्रोत आणि प्लेट्सच्या हालचाली.
भूकंपांचे वर्गीकरण :
कारक घटकांच्या आधारे भूकंपाचे दोन भागांत वर्गीकरण केले जाते. एक नैसर्गिक भूकंप आणि दुसरा कृत्रिम किंवा मानवप्रेरित भूकंप.
नैसर्गिक भूकंप :
नैसर्गिक प्रक्रियांमुळे म्हणजेच एंडोजेनेटिक शक्तींमुळे जो भूकंप होतो, त्याला नैसर्गिक भूकंप म्हणतात. नैसर्गिक भूकंपाचे चार उपवर्गांत वर्गीकरण केले जाते.
१) ज्वालामुखीय भूकंप : हे स्फोटक आणि विदारक प्रकारांच्या ज्वालामुखी उद्रेकामुळे होतात. सामान्यतः ज्वालामुखीय भूकंप ज्वालामुखी क्षेत्रापुरते मर्यादित असतात. अशा भूकंपांची तीव्रता ज्वालामुखीच्या उद्रेकांच्या तीव्रतेवर अवलंबून असते. उदाहरण द्यायचे झाल्यास क्राकाटाओ ज्वालामुखी आणि एटना ज्वालामुखीच्या हिंसक स्फोटांमुळे तीव्र भूकंप होतात.
२) टेक्टोनिक भूकंप : हे मोठ्या प्रमाणात खडकांच्या विस्थापनेमुळे होतात. असे भूकंप खूप तीव्र आणि विनाशकारी असतात. उदाहरणार्थ १९०६ चा कॅलिफोर्निया (यूएसए), १९२३ चा सागामी बेचा भूकंप (जपान) आणि २००१ चा गुजरातचा भुज भूकंप इ.
३) समस्थानिक भूकंप : भूगर्भीय प्रक्रियांमधील असंतुलनामुळे प्रादेशिक स्तरावर समस्थानिक समतोल अचानक बिघडल्यामुळे समस्थानिक भूकंप सुरू होतात. साधारणपणे माउंटन बिल्डिंगच्या सक्रिय झोनचे भूकंप या श्रेणीमध्ये समाविष्ट केले जातात.
४) प्लुटोनिक भूकंप : हे खरे तर खोल-केंद्रित भूकंप आहेत; जे जास्त खोलीवर होतात. या भूकंपांचे केंद्र सर्वसाधारणपणे २४० किमी ६७० किमी खोलीच्या आत असतात.
हेही वाचा – UPSC-MPSC : चक्रीवादळ म्हणजे काय? ते कसे तयार होते?
कृत्रिम किंवा मानवप्रेरित भूकंप
मानवाच्या एखाद्या कृतीमुळे होणाऱ्या भूकंपाला कृत्रिम किंवा मानवप्रेरित भूकंप असे म्हणतात. भूगर्भातील जल आणि तेलसाठ्यांमधून अनुक्रमे पाणी आणि खनिज तेल पंप करणे, खोल भूमिगत खाणकाम, बांधकामाच्या उद्देशाने डायनामाइट्सद्वारे खडकांचा स्फोट (उदा. धरणे आणि जलाशय, रस्ते आदी), अणुस्फोट इत्यादी कारणांमुळे हे भूकंप होतात. उदाहरणार्थ १९३१ मध्ये मॅरेथॉन धरणामुळे ग्रीसचा भूकंप, १९३६ चा हूवर धरणाचा (यूएसए) लेक मीडमुळे झालेला भूकंप, कोयना जलाशयामुळे १९६७ चा कोयना भूकंप (महाराष्ट्र, भारत) इ.
भूकंप केंद्राच्या आधारावर वर्गीकरण :
गुटेनबर्गने जागतिक भूकंपांना त्यांच्या केंद्रस्थानाच्या खोलीच्या आधारावर तीन प्रकारांमध्ये विभागले आहे. १) मध्यम भूकंप केंद्र, २) मध्यवर्ती भूकंप केंद्र व ३) खोल केंद्रित भूकंप. मध्यम भूकंप केंद्र हे भूपृष्ठापासून ० ते ५० किमी खोलीवर स्थित असते. मध्यवर्ती भूकंप केंद्र हे ५० किमी व २५० किमी दरम्यान खोलीवर असते आणि खोल केंद्रित भूकंपाचे केंद्र हे २५० किमी व ७०० किमीदरम्यानच्या खोलीवर असते. मध्यम व मध्यवर्ती भूकंपांना अनुक्रमे उथळ फोकस व मध्यवर्ती फोकस भूकंप, असेही म्हणतात.
भारतातील भूकंपाचे धोके
भारताला भूकंपाचा फार मोठा इतिहास आहे. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी (NDMA) आणि बिल्डिंग मटेरियल अँड टेक्नॉलॉजी प्रमोशन कौन्सिल (BMTPC) यांनी तयार केलेल्या आणि सप्टेंबर २०१६ मध्ये जारी केलेल्या नवीनतम भूकंपाच्या नकाशानुसार भारतातील सुमारे ५९ टक्के भूभाग मध्यम किंवा तीव्र भूकंपामुळे असुरक्षित आहे. या भागातील ९५ टक्के कुटुंबे वेगवेगळ्या प्रमाणात भूकंपांना बळी पडतात.
भूकंपाच्या विविध अंशांवर अवलंबून, संपूर्ण देश खालील भूकंपीय प्रदेशांमध्ये विभागला जाऊ शकतो :
- काश्मीर आणि पश्चिम हिमालय : या प्रदेशात जम्मू व काश्मीर राज्ये, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधील उपपर्वतीय भाग समाविष्ट आहेत.
- मध्य हिमालय : या प्रदेशात उत्तराखंड, उत्तर प्रदेश व पंजाबमधील पर्वतीय व उपपर्वतीय भागांचा समावेश होतो.
- ईशान्य भारत : हा प्रदेश उत्तर पश्चिम बंगालच्या पूर्वेकडील संपूर्ण भारतीय भूभागाचा समावेश करतो.
- इंडो-गंगेचे खोरे आणि राजस्थान : या प्रदेशात राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार व पश्चिम बंगालचा मैदानी भाग आहे.
- खंबात आणि कच्छचे रण
- लक्षद्वीप बेटांसह द्वीपकल्पीय भारत
- अंदमान आणि निकोबार बेटे
हेही वाचा – UPSC-MPSC : ‘हिंदी महासागरातील द्विध्रुव’ ही संकल्पना काय आहे? त्याचा मान्सूनवर कसा परिणाम होतो?
संपूर्ण देश भूकंपांची वारंवारता आणि तीव्रता यावर अवलंबून तीन विस्तृत भूकंपीय क्षेत्रांमध्ये विभागला जाऊ शकतो–
१) हिमालय क्षेत्र : भारतातील भूकंपाचा सर्वाधिक धोका असलेल्या भागात हिमालय पर्वतरांगा आहेत. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहार, बिहार-नेपाळ सीमा आणि ईशान्येकडील राज्ये विशेषतः आसाम ही राज्ये या झोनमध्ये येतात. या झोनमधील भूकंप प्रामुख्याने प्लेट टेक्टोनिक्समुळे (Plate Tectonics) होतात. भारतीय प्लेट हिमालयाच्या बाजूने युरेशियन प्लेटला धडकून ५ सेंमी वार्षिक दराने उत्तर आणि ईशान्य दिशेने ढकलत आहे.
हिमालयाने अद्याप समस्थानिक समतोल (Isostatic Equilibrium) साधलेला नाही आणि त्याची उंची वाढत आहे. हिमालयालगतचा प्रदेश जिथे दोन प्लेट्स एकत्र येतात, तो भूकंपप्रवण आहे. त्याला कमाल तीव्रतेचे क्षेत्र (Zone of Maximum intensity) असे म्हणतात. भूकंपप्रवण क्षेत्रांच्या यादीतून नेपाळची अनुपस्थिती हे दर्शवते की, संपूर्ण हिमालय धोकादायक नाही. माउंट एव्हरेस्ट आणि बद्रीनाथमधील हिमालय जवळजवळ स्थिर आहे. प्रचंड उंची आणि रुंदीचा प्रचंड मोठा भूभाग असलेला हा भाग परिपूर्ण शांततेने टिकून आहे. मसुरी, शिमला, कांगडा, डलहौसी, गुलमर्ग व बिहार, आसाम, दक्षिण-पूर्व नेपाळ, सिक्कीम, भूतान, अरुणाचल प्रदेश व नागालँडचा पश्चिम भाग, मणिपूर या भागांना जोडणारे उत्तर-पूर्वेकडील भाग उच्च तीव्रतेच्या भूकंपांसाठी संवेदनशील आहेत.
२) इंडो-गंगा क्षेत्र : हिमालय क्षेत्राच्या दक्षिणेस आणि त्याच्या समांतर इंडो-गंगा क्षेत्र आहे. या क्षेत्रात होणारे बहुतेक भूकंप ६ ते ६.५ तीव्रतेच्या रिश्टर स्केलचे असतात. या क्षेत्राच्या पायथ्याशी असलेले भूकंप मध्यम ते उच्च तीव्रतेचे असतात. या भागात लोकसंख्येची घनता जास्त असल्याने या क्षेत्रातील भूकंपांमुळे मोठ्या प्रमाणात हानी होते.
३) द्वीपकल्पीय झोन : द्वीपकल्पीय भारत हा पुन्हा एक स्थिर भूभाग राहिला आहे. या प्रदेशाला किमान तीव्रतेचे क्षेत्र म्हणतात. परंतु, या क्षेत्रात तीव्र भूकंप झाल्याचेही बघायला मिळतात. उदा. कोयना (१९६७), लातूर (१९९३) व जबलपूर (१९९७) येथे झालेले भूकंप.
कोयना नदीला बंधारा बांधून तयार झालेल्या शिवाजी सागर जलाशयात पाण्याचा अतिरेक झाल्यामुळे कोयना भूकंप झाला; तर लातूरला झालेला भूकंप हा त्याचाच परिणाम असावा, असे मानले जाते. हे भूकंप प्लेट टेक्टॉनिकमुळे झाले जसे, भारतीय प्लेटच्या उत्तरेकडील प्रवाहाने तिबेटी प्लेटवर दबाव निर्माण केला होता; ज्यामुळे भारतीय प्लेटच्या मध्यभागी दबाव वाढला आणि त्यामुळे भूकंप झाला. जबलपूरचा भूकंपही अशाच परिस्थितीत झाला होता.