सागर भस्मे
‘एल निनो’ हा स्पॅनिश शब्द असून, या शब्दाचा अर्थ बाल येशू किंवा छोटा मुलगा असा होतो. ख्रिसमसदरम्यान दक्षिण अमेरिकेतील पश्चिम किनारपट्टी भागात प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान नेहमीपेक्षा अचानक वाढते. त्यामुळे होणाऱ्या हवामानबदलास ‘एल निनो’ म्हणतात. इ. स. १५०० च्या सुमारास पेरू देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर लहान बोटीतून मासेमारी करणाऱ्या कोळ्यांना प्रशांत महासागराचे तापमान दर काही वर्षांनी वाढत असल्याचे सर्वप्रथम लक्षात आले. पाण्याचे तापमान वाढण्याची घटना सहसा नाताळच्या सुमारास घडत असे. त्यामुळे त्या घटनेचे नामकरण ‘एल निनो’ असे केले गेले.
हेही वाचा – UPSC-MPSC : भारताचा भूगोल : गोदावरी नदी प्रणाली
एल निनो नसतानाचे हवामान
साधारणपणे दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याजवळून दुसरा प्रवाह वाहतो; ज्याला ‘पेरुव्हियन शीत प्रवाह’ म्हणतात. हा प्रवाह पृष्ठभागाखालील थंड पाण्याच्या वाढीमुळे निर्माण होतो. एल निनो नसताना उष्ण कटिबंधात सर्वाधिक उष्ण पाणी पॅसिफिक महासागराच्या पश्चिम बाजूला इंडोनेशियालगत असते. येथील पाण्यावर हवेचा दाब कमी; तर पॅसिफिकच्या पूर्व बाजूला दक्षिण अमेरिकेलगत हा दाब उच्च असतो.
उष्ण कटिबंधातील वारे उच्च दाबाच्या क्षेत्राकडून कमी दाबाच्या क्षेत्राकडे वाहतात. त्यामुळे उष्ण कटिबंधीय पॅसिफिकवरील वारे सामान्यपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. उष्ण कटिबंधीय पॅसिफिकवरील वाऱ्यांमुळे समुद्राच्या पृष्ठभागालगतचे पाणी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. पूर्वेला अधिक खोलवर असलेले थंड पाणी उसळून पृष्ठभागी येते आणि वाहून गेलेल्या गरम पाण्याची जागा घेते.
थंड पाण्यात खनिजे व इतर पोषक द्रव्ये विपुल प्रमाणात असतात. त्यामुळे पाण्याचा पृष्ठभाग व त्याच्याजवळ वाहत जाणाऱ्या पाण्यातील प्लवकांसारख्या सूक्ष्म जीवांना मुबलक खाद्य मिळते आणि त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. तसेच यामुळे माशांच्या संख्येतही मोठी वाढ होते. परिणामी इक्वेडोर, पेरू हे देश जगातील सर्वांत मोठे व प्रसिद्ध व्यापारी मासेमारी केंद्रांपैकी एक बनले आहेत. उष्ण सागरी पाण्याने पॅसिफिकच्या पश्चिम भागातील हवा तापते आणि येथील पाणी अधिक उष्ण होत जाऊन माशांची संख्या कमी होत जाते.
एल निनो असतानाचे हवामान
एल निनो असताना पॅसिफिकच्या पश्चिमेला हवेचा दाब नेहमीपेक्षा उच्च आणि पूर्वेस अतिशय कमी असतो. त्यामुळे पॅसिफिकच्या उष्ण कटिबंधीय भागातील पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे वारे कमजोर होत उलट्या दिशेने वाहू लागतात. या दोन्ही परिस्थितीत इक्वेडोर व पेरू यांच्या समुद्रकिनाऱ्यालगतचे पाणी अतिशय उष्ण होते. तेथे विपुल पोषक द्रव्ययुक्त थंड पाणी वर येत नाही. त्यामुळे माशांची संख्या खूप कमी होते. एल निनो असताना मुख्यतः पूर्व पॅसिफिकमधील अधिक उष्ण पाण्यावर ढग तयार होतात आणि तेथे जोराचा पाऊस पडतो. त्यामुळे दक्षिण अमेरिकेचा पश्चिम समुद्रकिनारा नेहमीपेक्षा अधिक आर्द्र होतो. याउलट पॅसिफिकच्या पश्चिम भागातील इंडोनेशिया व आग्नेय आशियातील इतर देशांत, तसेच ऑस्ट्रेलियामध्ये हवामान अतिशय शुष्क होऊन अवर्षणाची परिस्थितीही निर्माण होऊ शकते.
हेही वाचा – UPSC-MPSC : भारताचा भूगोल : यमुना नदी प्रणाली
एल निनोचा भारतातील मॉन्सूनवर होणारा परिणाम
एल निनो आणि भारतीय मॉन्सूनचा परस्पर संबंध आहे. १८७१ नंतर भारतात पडलेल्या दुष्काळांपैकी सहा दुष्काळ हे एल निनोचे दुष्काळ आहेत; ज्यात अलीकडील २००२ व २००९ मधील दुष्काळांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सर्वच एल निनो वर्षांमुळे भारतात दुष्काळ पडलेला नाही. उदाहरणार्थ- १९९७-९८ हे एक मजबूत एल निनो वर्ष होते; परंतु त्यावेळी दुष्काळ नव्हता.
एल निनोचा भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होतो. त्यामुळे तांदूळ, ऊस, कापूस व तेलबिया यांसारख्या उन्हाळी पिकांचे उत्पादन कमी होते. याचा अंतिम परिणाम उच्च चलनवाढ आणि देशांतर्गत उत्पादनवाढीच्या रूपात दिसून येतो. कारण- भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचे योगदान सुमारे १४ टक्के आहे.
ला निना
एल निनोच्या विरुद्ध आणि पूरक घटना दिसून येते; त्या परिस्थितीला ‘ला निना’ म्हणतात. ला निनाच्या घटनेदरम्यान मध्य व पूर्व प्रशांत महासागरातील पृष्ठभागाच्या पाण्याचे तापमान कमी होते. त्यामुळे या भागात दक्षिण-पूर्वेकडून जोरदार वारे वाहू लागतात. या वाऱ्याच्या प्रभावामुळे पूर्वेकडील प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे पाणी प्रवाहाच्या रूपाने पश्चिमेकडे वाहू लागते आणि खाली असलेले थंड पाणी वर येऊ लागते.