सागर भस्मे
मागील लेखातून आपण त्सुनामी आणि दुष्काळाबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण पूर म्हणजे काय? आणि पूरस्थितीबाबत जाणून घेऊया. पूर ही नदीच्या किंवा समुद्राच्या किनार्यावर पाण्याची उच्च पातळीची स्थिती आहे, ज्यामुळे जमीन सामान्यतः पाण्याखाली जाते. पूर हा नदी बेसिनच्या (Drainage basin) जलविज्ञान चक्राचा (Hydrological cycle) एक महत्त्वाचा घटक आहे. खरं तर दुष्काळ आणि पूर ही जलविज्ञान चक्राची दोन टोके आहेत. नैऋत्य मान्सूनमुळे पाऊस न पडल्यामुळे दुष्काळ पडतो, तर जास्त पाऊस झाल्यास पूर येतो. पूर हा एक नैसर्गिक धोका आहे, जो मुसळधार पावसाच्या प्रतिसादात उद्भवतो. जेव्हा यामुळे जीवित आणि मालमत्तेचे मोठे नुकसान होते तेव्हा ते आपत्ती बनते.
हेही वाचा – UPSC-MPSC : पृथ्वीवरील महासागर आणि त्यांचे स्वरूप
पुराची कारणे (Causes of flood) :
सामान्यतः एक किंवा अधिक प्रतिकूल हवामानशास्त्रीय आणि भौतिक घटकांमुळे पूर येतो. प्रतिकूल हवामानशास्त्रीय आणि भौतिक घटक एकत्र काम केल्याने एक गंभीर पूर परिस्थिती उद्भवते, ज्यामुळे आपत्ती येते. अलीकडच्या काळात, अवांछित मानवी क्रियाकलापांमुळे हवामान आणि भौतिक घटकांचा प्रभाव वाढला आहे.
भारतातील पुराची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत.
१) हवामानशास्त्रीय घटक :
- मुसळधार पाऊस
- उष्णकटिबंधीय चक्रीवादळे
- ढग फुटणे
२) भौतिक घटक :
- मोठे पाणलोट क्षेत्र
- सांडपाण्याची (drainage) अपुरी व्यवस्था
३) मानवी घटक :
- जंगलतोड
- सदोष कृषी पद्धती
- दोषपूर्ण सिंचन पद्धती
- धरणे फुटणे
- जलद शहरीकरण
पुराचे परिणाम (Effects of flood) :
पुराचे मानवी जीवनावर बहुआयामी परिणाम होतात. अधिक भयावह वस्तूस्थिती अशी आहे की पूर अधिकच हानीकारक बनत आहेत. कारण त्यांची वारंवारता, तीव्रता कालांतराने वाढत आहे. पुराचा सर्वात घातक परिणाम म्हणजे प्रचंड जीवित आणि मालमत्तेची हानी. इतर नुकसानांमध्ये पिकांचे नुकसान, गुरांचे नुकसान, दळणवळण तुटणे, वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणे आणि अत्यावश्यक सेवा विस्कळीत होणे यांचा समावेश आहे. जंगलतोडीसारख्या पर्यावरणीय ऱ्हासामुळे पूर अधिक वारंवार आणि तीव्र होत आहेत. शिवाय, भारतातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे आणि पूरप्रवण क्षेत्रे, जसे की पूर मैदाने आणि अगदी नदीच्या पात्रातही लोक राहतात. यामुळे प्रभावित होणारी लोकसंख्या जास्त आहे. खरे तर इतर कोणत्याही आपत्तीपेक्षा पुरामुळे जास्त नुकसान होते. बांगलादेश खालोखाल भारत हा जगातील सर्वाधिक पूरग्रस्त देश आहे. जगभरातील पुरामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी २० टक्के मृत्यू भारतात होतात, तर मृत्यूमध्ये बांगलादेशचा एकूण वाटा ५ टक्के आहे. पुराचा सर्वाधिक फटका साधारणपणे गरीब लोकांना बसतो.
हेही वाचा – UPSC-MPSC : दुष्काळ म्हणजे नेमके काय? त्याची कारणे कोणती?
भारतातील पूरप्रवण क्षेत्रांचे भौगोलिक वितरण खालीलप्रमाणे आहे :
१) गंगा नदीचा प्रदेश : उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये बलाढ्य गंगेला गोमती, घाघरा, गंडक आणि कोसी यांसारख्या उपनद्या डाव्या तीरापासून तसेच यमुना आणि सोन यासारख्या नद्या उजव्या तीराकडून मिळतात. यामुळे या भागात हिमालयीन प्रदेशातून आणि द्विपकल्पीय भारतातून प्रचंड प्रमाणात पाणी येते, ज्यामुळे विनाशकारी पूर येतो. कोसी नदी अनेकदा आपला मार्ग बदलत असल्या कारणास्तव नवीन क्षेत्रांना पूर येऊन सुपीक क्षेत्रांचे ओसाड जमिनीत रूपांतर होते. कोसी म्हणजे कोस्ना (शाप), दरवर्षी विस्तीर्ण भागात पुराचा प्रकोप आणते. याच कोसी नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात.
२) ब्रह्मपुत्रा नदी क्षेत्र : ब्रह्मपुत्र बेसिनमध्ये पूर जवळजवळ वार्षिक वैशिष्ट्य आहेत. पावसाच्या काळात २५० सें.मी.पेक्षा जास्त पाऊस पुराचे मुख्य कारण आहे. ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर गाळ जमा केला जातो, जो नदीचे चॅनेल उथळ करून तिची पाणी धारण व वाहून नेण्याची क्षमता कमी करतो. यामुळे खोऱ्यात आणि सभोवतालच्या विशाल भागात पूर येणे स्वाभाविक ठरते. भूकंप, भूस्खलन येथे खूपच सामान्य आहे. यामुळे नदीप्रवाह बदलून पूर स्थिती निर्माण होते. आसाम व्हॅली भारतातील सर्वात वाईट पूरग्रस्त भाग मानला जातो.
३) उत्तर पश्चिम नद्यांचा प्रदेश : गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या प्रदेशांच्या तुलनेत या प्रदेशातील पुराची समस्या कमी गंभीर आहे. मुख्य समस्या म्हणजे पृष्ठभागाच्या अपुर्या निचऱ्याची आहे, ज्यामुळे विस्तीर्ण भागात पूर आणि पाणी साचते. पंजाब-हरियाणातील सपाट भागात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचते. सतलज, बियास, घग्गर आणि मार्कंडा यांसारख्या मोठ्या आणि किरकोळ नद्यांना पावसाळ्यात पूर येतो आणि विस्तीर्ण भागात पूरपरिस्थिती निर्माण होते.
हेही वाचा – UPSC-MPSC : एल. डी. स्टॅम्पने केलेल्या भारताच्या हवामान वर्गीकरणाचा आधार नेमका काय होता?
४) मध्य भारत आणि दख्खन प्रदेश : आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, ओडिशा, झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशचा काही भाग ही दक्षिणेकडील राज्ये या प्रदेशात समाविष्ट आहेत. या प्रदेशात पूर गंभीर समस्या निर्माण करत नाही, कारण बहुतेक नद्यांचे प्रवाह स्थिर आहेत. तथापि, महानदी, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी नदीच्या डेल्टास मोठ्या प्रमाणात गाळ आणि परिणामी नदीच्या प्रवाहात बदल झाल्यामुळे अधूनमधून पूर येतो. प्रमुख नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात अंदाधूंद वृक्षतोडीमुळे पूर समस्या गुंतागुंतीची झाली आहे. गुजरातमधील नर्मदा आणि तापीच्या खालच्या प्रवाहांनाही पुराचा धोका आहे. केरळच्या छोट्या नद्या, पश्चिम घाटातून उगम पावतात आणि अरबी समुद्राला मिळतात. या नदीप्रणालीमध्येसुद्धा पुरामुळे प्रचंड नुकसान होते. वरील वर्णनावरून असे दिसून येते की, पूर येणे ही जवळजवळ वार्षिक घटना आहे.