सागर भस्मे
मागील लेखातून आपण सागरी लाटांच्या अपक्षरण कार्यामुळे निर्माण होणाऱ्या भूरूपांविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण पर्वत म्हणजे काय? आणि त्याच्या प्रकारांबाबत जाणून घेऊ या.
पर्वत म्हणजे काय?
भूशास्त्रीय भाषेत ६०० मीटरपेक्षा उंच असलेल्या उंचवट्याला पर्वत, असे म्हणतात. भूपृष्ठावरील भूरचनेच्या विविध प्रकारांपैकी पर्वत हा ठळक प्रकार होय. पर्वत हे भूपृष्ठावरील उंचवटे असून, सभोवतालच्या जमिनीच्या पातळीपेक्षा ते उंच असतात. पृथ्वीवरील बहुतांशी पर्वत गाळाच्या किंवा जलजन्य खडकांपासून निर्माण झाले असून, त्यांचा विस्तार सामान्यतः पूर्व-पश्चिम किंवा उत्तर-दक्षिण या दिशांनी झालेला आहे. उदाहरणार्थ सातपुडा, हिमालय, आल्प्स्, विंध्य यांचा विस्तार पूर्व-पश्चिम दिशांनी आणि अँडिज, ग्रेट डिव्हायडिंग रेंज यांचा विस्तार उत्तर-दक्षिण दिशांनी झालेला आहे.
हेही वाचा – UPSC-MPSC : सागरी लाटांच्या निक्षेपणामुळे भूरूपे कशी निर्माण होतात?
पर्वतांचे प्रकार
पर्वतांचे वर्गीकरण कालखंडानुसार किंवा निर्मिती प्रक्रियेनुसार केले जाते. त्यापैकी पर्वत कालखंडानुसार केलेल्या वर्गीकरणापेक्षा निर्मिती प्रक्रियेनुसार केलेली वर्गीकरण हे महत्त्वाचे मानले जाते. निर्मिती प्रक्रियेनुसार पर्वतांचे चार मुख्य प्रकार पडतात. १) घडीचे किंवा वळीचे पर्वत, २) ठोकळ्यांचे किंवा गट पर्वत, ३) ज्वालामुखीचे किंवा संचयित पर्वत आणि ४) अवशिष्ट पर्वत
१) घडीचे किंवा वळीचे पर्वत (Folded Mountains) : सद्य:स्थितीत जगातील सर्व प्रमुख पर्वत या प्रकारात समाविष्ट होतात. या प्रकारचे पर्वत हे क्षितिजसमांतर पातळीत घडणाऱ्या हालचालींमुळे निर्माण होतात. आल्प्स, रॉकी व अँडिज हे सर्व पर्वत अलीकडच्या काळात घडलेल्या अंतर्गत हालचालींमुळे निर्माण झालेले असल्यामुळे त्यांना घडीचे पर्वत, असेही म्हणतात. याउलट उराल, ॲपेलेशियन, तिएनशान व नानशान हे पर्वत यापूर्वी पडलेल्या भूहालचालींमुळे निर्माण झालेले आहेत. या हालचालींपूर्वी स्कॉटलंड नॉर्वेतील उंचवटे, रशियातील सायन व स्टॅनोव्हाय पर्वत निर्माण झाले होते.
अरवली पर्वत हा जगातील सर्वांत प्राचीन पर्वत समजला आतो. प्राचीन घडी पर्वताची झीज हवा, नद्या, हिमनद्या व समुद्राच्या लाटांमुळे दीर्घ काळ घडून आली आहे. अर्वाचीन पर्वतांपेक्षा या अपक्षरण कार्यामुळे त्यांची उंचीदेखील कमी झालेली आहे. पृथ्वीवरील तुलनेने अरुंद व लांब असलेल्या खळग्यांना Geosynclines म्हणतात. अशा खळग्यांमध्ये आजूबाजूच्या प्रदेशांची झीज होऊन निर्माण झालेल्या गाळाचे संचयन झाले आणि त्यांचे थरांवर थर साचून, त्यापासून गाळाच्या खडकांची निर्मिती झाली. हेच स्तर बहुतांशी घडी पर्वतांत आढळून येतात. क्षितिजसमांतर पातळीतील हालचालींमुळे आणि दोन्ही बाजूंनी निर्माण झालेल्या दाबामुळे खळग्यांतील संचयित गाळाच्या खडकांना घड्या पडल्या आणि त्यांची उंची वाढून घडीच्या पर्वतांची निर्मिती झालेली आहे.
हेही वाचा – UPSC-MPSC : वाळवंटी प्रदेशात पाण्यामुळे भूरूपे कशी निर्माण होतात?
२) ठोकळ्यांचे किंवा गट पर्वत (Block Mountains) : ठोकळ्यांचे किंवा गट पर्वत हे सामान्यतः क्षितिजसमांतर पातळीतील प्रस्तरभंगामुळे निर्माण होत असतात. प्रस्तरभंगामुळे भूकवचावर ताण पडून, त्याला घड्या पडण्याऐवजी त्यांत स्तरभ्रंश निर्माण होतात. दोन समोरासमोरच्या समांतर स्तरभ्रंशांतील भूकवचाचा भाग वर उचलला जातो किंवा तो खाली खचतो. वर उचललेल्या भागाची उंची सभोवतालच्या भागापेक्षा जास्त होते आणि अशा रीतीने तो पर्वतासारखा दिसतो. याच भागास ‘हॉर्स्ट’ म्हणतात. जेव्हा दोन समोरासमोरील स्तरभ्रंशांमधील भाग खाली खचला जातो, तेव्हा त्या भूरूपास ‘खचदरी’ म्हणतात. या दरीच्या दोन्ही बाजूंना निर्माण झालेले भूभाग हे पर्वतासारखे दिसतात. बहुधा अशा पर्वतांचे माथ्याचे भाग सपाटच असतात आणि स्तरभ्रंशाकडील बाजू तीव्र उताराच्या असतात. जर्मनीतील ब्लॅक फॉरेस्ट व फ्रान्समधील व्हॉस्जेस हे गट पर्वत असून, त्यांमधील खचदरीतून हाईन नदी वाहते.
३) ज्वालामुखीचे किंवा संचयित पर्वत (Volcanic Mountains.) : ज्वालामुखीच्या उद्रेकातून लाव्हा किंवा शिलारस, अर्धवट वितळलेले खडक, राख, पाण्याची वाफ, वायू, इत्यादी पदार्थ बाहेर पडतात. भूकवचाला असलेल्या भेगेतून हे पदार्थ बाहेर पडून ते ज्वालामुखीच्या शेजारीच साचतात आणि त्यामुळे निर्माण झालेल्या उंचवट्यास ज्वालामुखीचे पर्वत, असे म्हणतात. बाहेर पडलेल्या पदार्थांच्या संचयनामुळे या पर्वतांची निर्मिती होते. म्हणून यांना संचयित पर्वतसुद्धा म्हणतात.
उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या लाव्हारसाच्या प्रकारावर यांचा प्रकार अवलंबून असतो. आम्ल लाव्हा व भस्मिक लाव्हा असे लाव्हारसाचे दोन प्रकार असतात. जर लाव्हा हा आम्लधर्मीय असेल, तर त्यात सिलिकाचे प्रमाण जास्त असते. हा लाव्हा अधिक घट्ट व कमी प्रवाही असतो. त्यामुळे तो जास्त दूर वाहत जात नाही. तो मुखाशेजारीच साचतो आणि त्यामुळे त्याचा आकार उभट शंकूसारखा तयार होतो. हे शंकू घुमटाकार व तीव्र उताराचे असतात.
जर उद्रेकातून बाहेर पडणारा लाव्हा भस्मिक स्वरूपाचा असेल, तर तो पातळ व प्रवाही असून, त्यात मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. हा लाव्हा पातळ व जास्त प्रवाही असल्यामुळे उताराच्या दिशेने दूरवर वाहत जातो. त्यामुळे अशा लाव्हापासून निर्माण झालेले शंकू व उंचवटे कमी उंचीचे व मंद उताराच्या बाजूंचे निर्माण होतात.
हेही वाचा – UPSC-MPSC : पठार म्हणजे काय? त्याचे प्रकार कोणते?
४) अवशिष्ट पर्वत (Residual Mountains) : नद्या, हिमनद्या, वारा, पर्जन्य यांसारख्या जमिनीची झीज घडवून आणणाऱ्या शक्तींमुळे आधी अस्तित्वात असलेल्या पर्वतांची किंवा पठारे व उंच भूपृष्ठाची झीज होऊन जे पर्वतसदृश स्वरूप शिल्लक राहते, त्यास ‘अवशिष्ट पर्वत’ म्हणतात. भारतातील निलगिरी पर्वत, पारसनाथ व राजमहाल टेकड्या, अरवली पर्वत, अमेरिकेतील न्यूयॉर्क राज्यातील कॅटस्कील पर्वत ही अशा अवशिष्ट पर्वतांची उदाहरणे होत.