सागर भस्मे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मागील लेखातून आपण गाळाचे खडक म्हणजे काय? ते भारतात कुठे आढळतात? याबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण मैदान म्हणजे काय? आणि त्याचे प्रकार कोणते? याबाबत जाणून घेऊया.
मैदान म्हणजे काय?
सपाट व सखल भूपृष्ठास मैदान असे म्हणतात. त्यात अधूनमधून थोडाफार उंचसखलपणा असू शकतो, पण बहुधा ती सपाट असतात. त्यापैकी काही तर टेबलाच्या पृष्ठभागाइतकी समतल आणि काही मैदाने थोडीफार उंचसखल असतात. समुद्रसपाटीपासून सामान्यतः ती फार उंच नसतात. तरीपण उंचीच्या बाबतीत निश्चित अशी मर्यादा सांगता येणार नाही. उदाहरणार्थ- मिसिसिपी नदीच्या पूर्वेकडील ॲपेलेशियन पर्वतालगतच्या मैदानांची उंची ३० मीटर आहे; तर मिसिसिपी नदीच्या पश्चिमेकडील ग्रेट प्लेन्सची या विशाल मैदानाची उंची समुद्रसपाटीपासून १५०० मीटर आहे. निर्मितीनुसार मैदानांचे तीन ठळक प्रकार पडतात : १) झिजेची मैदाने, २) संचयन निर्मित मैदाने आणि ३) भू हालचालीमुळे निर्मित मैदाने
हेही वाचा – UPSC-MPSC : गाळाचे खडक म्हणजे काय? हे खडक भारतातील कोणत्या भागात आढळतात?
झिजेची मैदाने
भूपृष्ठ उंचावून एखादा पर्वत, टेकडी किंवा पठारी प्रदेश निर्माण झाल्यावर त्यावर बाह्यकारक शक्तीचे कार्य घडून त्या उंचवट्यांची झीज घडून येते आणि तो प्रदेश सखल व सपाट होऊन त्याला मैदानी स्वरूप प्राप्त होते. असा मैदानी प्रदेश संपूर्णतः सपाट व समतल नसतो, म्हणूनच त्याला ‘समप्राय मैदान’ असेही म्हणतात. कॅनेडियन शील्ड व पश्चिम सैबेरियाचे मैदान, फिनलँडचा मैदानी भाग अशा प्रकारच्या मैदानांची उदाहरणे होत.
नद्यांच्या अपक्षयन कार्यामुळे त्यांच्या उगमापासून मुखापर्यंतचा प्रदेश त्या प्रदेशांतील उतार व उंचवटे जवळपास नाहीसे झालेले असतात व संपूर्ण प्रदेश त्या प्रदेशातील उतार व उंचवटे जवळपास समुद्रसपाटीला आलेला असतो. अशी मैदाने ही नदीच्या अपक्षयन चक्राची पूर्णावस्था दर्शवितात, पण जगातील फारच थोड्या नद्या अपक्षयन चक्राच्या पूर्णावस्थेला पोहोचलेल्या असतात. त्यामुळे अशी मैदाने जगात फारच थोड्या ठिकाणी आढळतात.
संचयन कार्यामुळे निर्माण होणारी मैदाने
नदी, हिमनदी व वारा यांच्या वहन व संचयन कार्यामुळे त्यांनी वाहून आणलेल्या गाळाचे संचयन भृपृष्ठावरील सरोवरे, समुद्र व खाचखळगे यांत होऊन गाळाची किंवा भरीची मैदाने निर्माण होतात. निर्मितीस्थानानुसार अशा मैदानांचे बरेच प्रकार पडतात. उदाहरणार्थ, पर्वतपदीय मैदाने, पूर मैदाने. त्रिभूज प्रदेश, हिमानी मैदाने, वारानिर्मित मैदाने इत्यादी. नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाचे संचयन होऊन निर्माण झालेल्या मैदानांची उदाहरणे म्हणजे गंगा-सिंधूचे विस्तीर्ण मैदान, उत्तर चीनमधील हाँग-होचे मैदान, उत्तर इटलीतील पो नदीचे मैदान ही आहेत.
नद्यांच्या मध्य प्रवाहात त्यांच्या काठांवर पुराचे पाणी पसरून पुराबरोबर वाहत आलेला गाळ साचल्याने काठांवर निर्माण झालेल्या मैदानांना पूर मैदाने म्हणतात. नद्यांच्या उत्तर प्रवाहातही वर्षानुवर्षे गाळ साचून नद्यांची मुखे गाळांनी भरून येतात आणि नद्यांना विभाजिका निर्माण होतात. नदी मुखाजवळच्या सर्वच प्रदेशांत गाळाचे संचयन होऊन एक त्रिकोणाकृती मैदानी प्रदेश तयार होतो, त्याला त्रिभूज प्रदेश म्हणतात. जगातील सर्वच मोठ्या नद्यांच्या मुखाशी असे त्रिभूज प्रदेश किंवा गाळाची मैदाने निर्माण झालेली आहेत. उदाहरणार्थ- गंगा, सिंधू, यांगत्सिकँग, नाईल, मिसिसिपी इत्यादी.
हेही वाचा – UPSC-MPSC : पर्वत म्हणजे काय? पर्वतांचे प्रकार कोणते?
हिमनद्यांनीदेखील स्वत:च्या संचयन कार्यामुळे गाळाची मैदाने निर्माण केलेली आहेत. त्यांना ‘हिमानी मैदाने’ किंवा ‘हिमोढ मैदाने’ असे म्हणतात. वारादेखील आपल्या संचयन कार्यामुळे मैदानांची निर्मिती करतो, त्यांना ‘लोएसची मैदाने’ असे म्हणतात. वारा आपल्या वहनाबरोबर मातीचे सूक्ष्म कण दूरवर वाहून नेतो व वाऱ्याचा वेग मंदावला की या मातीच्या सूक्ष्म कणांचे संचयन होते. अशा मातीचे थरांवर थर साचून मैदानांची निर्मिती होते. वायव्य चीनमधील लोएसचे विस्तीर्ण मैदान हे याचे उदाहरण होय. तुर्कस्तानातही असे मैदान निर्माण झाले आहे. सरोवरांमध्येही गाळाचे संचयन होऊन सरोवरे गाळाने भरून येतात व मैदानांची निर्मिती होते.